उष्ण कटिबंधातील समुद्रकिनार्‍यावर सागरी लाटांचा प्रभाव असणार्‍या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ वनस्पती) हा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह (वनश्री) आहे. खार्‍या पाण्यात साधारण भरतीच्या पाण्याच्या पातळीपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या पातळीपर्यंतच्या पट्ट्यात ही वनश्री आढळते. भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये खारफुटी वाढलेली दिसते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा राज्याच्या दक्षिण भागापासून ते मध्य अमेरिकेच्या किनारी भागापर्यंत प्रामुख्याने तांबडी खारफुटी आढळते. याशिवाय कॅलिफोर्नियाचा किनारा, पूर्व आफ्रिका व इंडोनेशिया यांच्या किनारी भागांत ती आढळते.

खारफुटी क्वचित १२ मी.पेक्षा अधिक उंच वाढते. या वृक्षाच्या जाळीदार फांद्या फुलांच्या झुबक्यांनी बहरतात. पाने अंडाकृती व चिवट असतात. फुले लहान, चार पाकळ्यांची, पिवळ्या रंगाची व शंक्वाकृती असतात. फळे लालसर तपकिरी व २५ मिमी. लांबीची असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. झाडावर लटकत असतानाच त्यांच्या बीजांना अंकुर फुटतात. अंकुर २५-३० सेंमी. लांब वाढतात. ते झाडावर भाल्यासारखे लोंबत राहून खाली पडतात. पाण्यावर तरंगत ते वाहत जातात. खार्‍या व मऊ चिखलात रुतून त्यांच्यापासून नवीन झाडांची निर्मिती होते. या झाडाच्या खोडातून काही मुळ्या बाहेर वाढतात आणि पुन्हा जमिनीकडे वळून मातीत जातात. त्यामुळेही नवीन वनस्पतींची निर्मिती होते. खारफुटीमधील अनेक वनस्पतींमध्ये जाड व मांसल पाने, टेकूप्रमाणे आधार देणारी मुळे आणि जमिनीतून बरीच वर वाढणारी काही श्वसनमुळे ही वैशिष्ट्ये आढळतात. एकदा तोडल्यावर पुन्हा जलद वाढण्याबद्दल ही झाडे प्रसिद्ध आहेत.

या वृक्षांची मुळे व फांद्या यांच्या जाळीदार अडथळ्यामुळे सागराकडून वाहत आलेला गाळ व लाकडे अडविली जातात. त्यामुळे तेथे घट्ट जमीनयुक्त नैसर्गिक बांध निर्माण होतात.

खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते. कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो. आग्नेय आशियात या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी, लोणारी कोळसा तयार करण्यासाठी आणि सरपण म्हणून केला जातो.

खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनार्‍याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पतीसमुहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते.

खारफुटीच्या चार जाती अमेरिका व आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर प्रामुख्याने आढळतात. पूर्व आफ्रिका, आशिया व पश्चिम पॅसिफिक भागांत दहा जाती मिळतात. सुंदरबनातील खारफुटीत बारा कुलांतील सु. एकवीस जाती सापडतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा