खनिज तेल विविध हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असते. ही रसायने ऊर्ध्वपातन पध्दतीने वेगळी केली जातात.

खनिज तेलातील  एक किंवा दोन कार्बनच्या अणूने युक्त असलेली  रसायने बाहेर काढली की, त्यातून नैसर्गिक वायू मिळतो. त्यात मिथेन आणि इथेन ही वायुरूप संयुगे असतात. हा वायू दाबाखाली साठविला जातो म्हणून त्याला  संपीडित नैसर्गिक वायू (कॉम्प्रेस्ड  नॅचरल गॅस, सी.एन.जी.)  म्हणतात. हा  वायू इंधन म्हणून, वीजनिर्मिती करून घरेदारे ऊबदार ठेवण्यासाठी, खते तयार करण्यासाठी वापरला जातो.

तीन ते चार कार्बन असलेल्या हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणाने स्वयंपाकघरात वापरायचा द्रवीभूत खनिज तेल वायू (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस, एल.पी.जी.) मिळतो. हा वायू प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या संयुगाच्या मिश्रणाने बनलेला असतो. त्याच्यावर दाब देऊन त्याचे द्रवामध्ये रूपांतर करतात व त्यास टाकीत बंद करतात.

पाच ते दहा कार्बन अणू  समाविष्ट असलेल्या हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणातून खते आणि खनिज तेल रसायने तयार करण्यासाठी लागणारे नॅप्था हे द्रावण, पेट्रोलसारखे वाहनांचे इंधन तसेच बेंझीन, टोल्युइन, झायलीनसारखी उपयुक्त रसायने प्राप्त केली जातात.

दहा ते तेरा कार्बनच्या हायड्रोकार्बनपासून विमानात वापरले जाणारे वैमानिकी टरबाइन इंधन (एव्हिएशन टरबाइन फ्युएल, ए.टि.एफ.) मिळते.

तेरा ते सोळा कार्बनच्या संयुगातून दिव्यात व स्टोव्हमध्ये वापरावयाचे केरोसीन मिळते.

रेल्वे, जहाजे, ट्रक-बसगाड्यांसाठी लागणारे डिझेल हे इंधन सोळा ते बावीस कार्बनयुक्त  हायड्रोकार्बनच्या रसायनांच्या मिश्रणातून तयार होते.

तर यंत्रामधील घर्षण कमी करणाऱ्या वंगण तेलात बावीस ते अठ्ठावीस कार्बनपासून बनलेली हायड्रोकार्बन रसायने आढळतात.

शेवटी जो चोथा उरतो, त्याला डांबर म्हणतात. डांबर हा बहुउपयोगी पदार्थ असून रस्ते, विमानतळावरील धावपट्ट्या, धरणे बांधताना त्याचा प्रामुख्याने वापर होतो.

संदर्भ :

  • Fuels and Lubes International, Vol.9, Issue 2, Philipines.
  • Hydrocarbon Asia, AP Energy Business publication Pvt. Ltd., Singapore.
  • Horizon (Dec 2006, Aug 2006 and Nov 2006) BP House Journal, UK Auto Fuel policy, MOP&G., Govt. of India (Oct 2003).

समीक्षक – भालचंद्र भणगे

प्रतिक्रिया व्यक्त करा