व्हॅनिलीन  हा मूलत: वनस्पतिजन्य पदार्थ आहे. व्हॅनिला प्लॅनिफोलिया  वनस्पतीच्या ऑर्किडपासून व्हॅनिलाची निर्मिती होते. या वनस्पतीच्या शेंगा असतात. त्यातील  अर्कामध्ये  व्हॅनिलासह अनेक इतर रसायने असतात. त्यापैकी एक रसायन व्हॅनिलीन (४- हायड्रॉक्सी-३-मिथॉक्सीबेंझाल्डिहाइड) हे असून खाद्यान्नप्रक्रिया उद्योगात त्याचा स्वादासाठी  मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. हे संयुग मिथिल व्हॅनिलीन  किंवा व्हॅनिलिक आल्डिहाइड या नावाने सुध्दा ओळखले जाते. त्याला व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्‍त्व आहे. कारण खाद्यान्नप्रक्रिया उद्योगामध्ये त्याची सतत मागणी असते.  मागणीच्या मानाने नैसर्गिक व्हॅनिलाचे उत्पादन पुरेसे होत नाही. शिवाय नैसर्गिक व्हॅनिलीनचे विक्रीयोग्य उत्पादन करताना जास्त खर्च होतो.  यामुळे रासायनिक पद्धतीने व्हॅनिलीनची निर्मिती केली जाते.  आइसक्रीम, पुडिंग, चॉकलेट, केक आणि कस्टर्डमध्ये कृत्रिम व्हॅनिलीन आणि एथिल व्हॅनिलीन  वापरले जाते.

व्हॅनिलीन

भौतिक आणि रासायनिक गुणधर्म : रासायनिक सूत्र   C8H8O3; रेणवीय भार  १५२.१४९;  घनता १.०६८ ग्रॅ. /सेंमी. ; विलय बिंदू  ८१ – ८३ से.; उत्कलन बिंदू २८५ से.; विद्राव्यता   १० ग्रॅ./लि. (२५ से.).

व्हॅनिलीनचे  स्फटिक सफेद असतात परंतु त्याची विक्री बहुतांशी  भुकटीच्या स्वरूपात होते. व्हॅनिलीन  एथिल अल्कोहॉल, डायएथिल अल्कोहॉल, ॲसिटोन आणि बेंझिनमध्ये विरघळते.

उत्पादन पध्दती :  रासायनिक दृष्टीने व्हॅनिलीन  हे एक फिनॉलिक आल्डिहाइड आहे. व्हॅनिलीनच्या रासायनिक संरचनेमधील आल्डिहाइड,  हायड्रॉक्सिल आणि ईथर हे भाग क्रियाशील आहेत.

निकोलस-थिओडोर गॉब्ली (Nicolas-Theodore Gobley) यांनी १८५८ मध्ये प्रथम व्हॅनिलाच्या अर्कापासून व्हॅनिलीन  अलग करून दाखवले. दोन वेळा त्यांनी ते गरम पाण्यात विरघळवून त्याचे स्फटिकीकरण केलेले होते. यूजेनॉल (Eugenol) पासूनही व्हॅनिलीन  तयार करता येते.

व्हॅनिलीनचे उत्पादन करण्याच्या दोन पद्धती पुढीलप्रमाणे आहेत :

(१) सेल्युलोजची निर्मिती करताना लिग्निनमिश्रित सल्फाइट हा पदार्थ तयार होतो. त्यामध्ये अल्कली पदार्थाचे आणि ऑक्सिडीकारक पदार्थांचे मिश्रण केले जाते. त्यावर उच्च तापमानात जर दाब वाढवला तर व्हॅनिलीनयुक्त रसायने तयार होतात. त्यातील ॲसिटोव्हॅनिलोन ४- हायड्रॉक्सी -३-मिथॉक्सीॲसिटोफिनोन विलग केले जाते. त्यानंतर त्याचे ऊर्ध्वपातन आणि स्फटिकीकरण केले जाते.

(२) कार्ल रायमर (Karl Reimer) यांनी १८७६ मध्ये ग्वाएकॉल आणि ग्लायॉक्झॅलिक अम्ल या दोन रसायनांमध्ये ऑक्सिडीकरण प्रक्रिया घडवून आणली. यामुळे मँडेलिक आणि फिनिल ग्लायॉक्झॅलिक अम्ल तयार झाले. नंतर विकार्बॉक्सिलीकरण प्रक्रिया घडवून व्हॅनिलीन तयार करण्यात येते.

उपयोग : गोड पदार्थांना उत्तम स्वाद यावा म्हणून खाद्यान्न-प्रक्रियांमध्ये व्हॅनिलीनचा उपयोग होतो. विशेषत: औद्योगिक क्षेत्रात आइसक्रीम, चॉकोलेट, पुडिंग, कस्टर्ड, केक आदी खाद्यप्रकारांमध्ये तसेच काही थंड पेयांमध्ये व्हॅनिलीन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. काही औषधांमध्येही स्वादासाठी त्याचा वापर होत आहे. सौंदर्यप्रसाधने, सुगंधी तेले आणि सफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रवरूप मिश्रणांमध्येही व्हॅनिलीन वापरले जात आहे.

 

संदर्भ  :

  • Hocking, Martin B. (September 1997) Vanillin: Synthetic flavoring from sulfite liquor, Journal of Chemical Education, 74(9) 1055-1059.
  • Walton, Nicholas J., Melinda J. Mayer, Arjan Narbad (July 2003) Phytochemistry 63 (5):505

समीक्षक – भालचंद्र भणगे

प्रतिक्रिया व्यक्त करा