सॅपोनिन एक रासायनिक संयुग आहे.  हे संयुग वनस्पतींच्या  भागातच मिळते असा समज होता परंतु ते समुद्री जीव जसे समुद्री काकडीमध्येही मिळते. सॅपोनिन म्हणजे जलस्नेही आणि मेदस्नेही (किंवा जलविरोधी) असलेले टर्पिन किंवा स्टेरॉइडाचे अस्फटिकी ग्लायकोसाइड.  सोपवर्ट (सॅपोनेरिया)  वनस्पतींची पाने, रिठ्याची फळे आणि शिकेकाईच्या शेंगा या भागात सॅपोनिन आढळते. सॅपोनिन पाण्यात मिसळून घुसळले असता साबणासारखा फेस तयार होतो. प्राचीन काळात या वनस्पतींच्या भागांचा साबणासारखा वापर करीत असत. अजूनही तलम कपडे धुण्यासाठी रिठ्याचा वापर केला जातो. शिकेकाईचा वापर केस धुण्याच्या  उत्पादनांमध्ये केला जातो. बहुतेक सॅपोनिन चवीला कडवट असतात.

रासायनिक संरचना : सॅपोनिनमध्ये अग्लायकोन म्हणजेच सॅपोजेनिन  आणि एक किंवा अनेक शर्करांच्या साखळ्या जोडलेल्या असतात. सॅपोजेनिनचे दोन प्रकार असतात : तीस कार्बन अणू असलेली ट्रायटर्पिनॉइड  सॅपोजेनिन व सत्तावीस कार्बन अणू असलेली स्टेरॉइड सॅपोजेनिन.  जलस्नेही आणि जलविरोधी (मेदस्नेही) असे दोन भाग असलेले रेणू असल्यामुळे  सॅपोनिन पाण्यात मिसळल्यावर, पाण्याचा पृष्ठीय ताण कमी होतो आणि फेस किंवा पायस तयार होतो.

रासायनिक संरचनेवरून सॅपोनिनची विभागणी

 

अग्लायकोनच्या (सॅपोजेनिनच्या) रासायनिक संरचनेवरून सॅपोनिनची दोन प्रकारात विभागणी करता येते;  उदासीन सॅपोनिन आणि अम्लधर्मी  सॅपोनिन. सॅपोनिन पाण्यात मिसळल्यावर सॅपोजेनिन तयार होते. स्टेरॉइड असलेले सॅपोनिन उदासीन तर ट्रायटर्पिनॉइड  असलेले सॅपोनिन अम्लधर्मी असते.

उपयोग : सॅपोनिन वनस्पतींचे सूक्ष्मजीव आणि बुरशी तसेच कीटकांपासून संरक्षण करते. सॅपोनिन शरीरातील कोलेस्टेरॉलच्या चयापचयावर परिणाम करते आणि  कोलेस्टेरॉल शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे  कीटक, प्राणी यांनी सॅपोनिन असलेल्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो. पाण्यात सहज विरघळणारे सॅपोनिन माशांसाठी आणि पाण्यातून ऑक्सिजन घेणाऱ्या अनियततापी (cold blooded) प्राण्यांसाठी हानिकारक असते. मानवाच्या श्लेष्मपटलावर सॅपोनिनचा परिणाम होतो त्यामुळे त्याचा वापर शिंक येणाऱ्या पावडरी, वांतिकारक आणि खोकल्याच्या औषधांमध्ये करतात. बहुतेक सॅपोनिन मूत्रवर्धकही असतात. अल्फाअल्फा सॅपोनिनचा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोग केला जातो. सॅपोनिन सस्तन प्राण्याच्या रक्तात  गेले तर लाल रक्त पेशींचे विघटन करते.  अपवाद आहे ते ज्येष्ठमध आणि कारंदा (Dioscorea – याम) या वनस्पतीतील सॅपोनिनचा, हे सॅपोनिन शरीरातील कॉर्टिसोन आणि प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन (संप्रेरक)  तयार करण्यात प्राथमिक द्रव्य म्हणून उपयोगी ठरतात.

कर्करोगात पेशींची वाढ रोखण्याचे कार्य सॅपोनिन करते. हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य सॅपोनिन करते. अर्थात विशिष्ट वनस्पतींपासून मिळालेले सॅपोनिनच आरोग्यासाठी हितकारक असते.

ओट, पालक, लसूण, सोयाबीन, शतावरी अशा बऱ्याच अन्नपदार्थांमधे सॅपोनिन आढळते. बीअर यांसारख्या फेस येणाऱ्या पेयांमध्येही सॅपोनिनचा वापर करतात. कवकरोधी, प्रतिजैविक, कीटकनाशक गुणधर्म असलेले सॅपोनिन औषधांमध्ये वापरले जाते तसेच औद्यौगिक क्षेत्रातही सॅपोनिनचा वापर केला जातो. साबण,निर्मलक(detergent), अग्निशमन यंत्र, छायाचित्रण आणि सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातही सॅपोनिन वापरले जाते.

 

संदर्भ :

समीक्षक – भालचंद्र भणगे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content