लोखंड व पोलाद यांच्या वस्तूंचे गंजण्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर जस्ताचा लेप (मुलामा) देण्याची पद्धती. छपरांचे पन्हाळी पत्रे, सपाट पत्रे, सांडपाण्याच्या गटाराचे नळ, कुंपणाच्या तारा, खिळे इ. विविध वस्तूंसाठी गॅल्व्हानीकरण पद्धती वापरली जाते. गॅल्व्हानीकरणासाठी वितळलेल्या जस्तात वस्तू बुडवून काढणे (द्रव जस्त बुचकळी) व विद्युत् विलेपन या दोन पद्धतींचा प्रामुख्याने उपयोग करतात. द्रवबुचकळीची पद्धती नरम पोलादाचे पत्रे, छपरांचे पन्हळी पत्रे, लोखंडी नळ्या, कुंपणाच्या तारा इत्यादींसाठी विशेष वापरतात.
पूर्व तयारी : वस्तूवर जस्तलेपन करण्यापूर्वी तिच्या पृष्ठाचे निर्मलन करावे लागते. पृष्ठावर असलेले तेल, ग्रीज इ. योग्य विद्रावकाच्या (विरघळणाऱ्या पदार्थाच्या) मदतीने काढून टाकावी लागतात. यासाठी नॅप्था, टोल्यूइन, झायलीन, ॲसिटोन वगैरे विद्रावक उपयुक्त असतात. मग धातुपृष्ठ क्षारयुक्त (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणा ऱ्या पदार्थाने युक्त, अल्कलीयुक्त) गरम पाण्याने धुऊन घेतात. या पाण्यात एखादा आर्द्रकारक टाकल्यास पृष्ठावर लेपन जास्त चांगले होते. घट्ट चिकटलेला कचरा व ऑक्साइडाचे पापुद्रे काढण्यासाठी बोथट छिन्न्या, सुऱ्या, तारांचे ब्रश यांचा उपयोग होतो. इतर सर्व निर्मलन पद्धतींपेक्षा अम्लमार्जनाची (अम्लात बुडवून निर्मलन करण्याची) पद्धत सोपी व स्वस्त असते. महोत्पादनात (मोठ्या प्रमाणावरील उत्पादनात) तर तीच वापरली जाते. अम्लमार्जन ॲल्युमिनियमाशिवाय सर्व धातूंना चालते. पोलादाकरिता कोमट सल्फ्यूरिक अम्ल किंवा थंड हायड्रोक्लोरिक अम्ल वापरतात. ऑक्साइड विरघळवून राहिलेले अम्ल क्षाराने धुऊन काढतात. क्षाराऐवजी फॉस्फोरिक अम्लाने धुणे जास्त चांगले कारण क्षारांश मागे राहिल्यास तो लेपाचे आयुष्य कमी करतो. नंतर पाण्याने धुतल्यावर वस्तूला अभिवाह (लेप चांगला बसण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ उदा. झिंक अमोनियम क्लोराइड) लावतात. अशा प्रकारे वस्तू लेप देण्यास योग्य स्थितीत येते.
लेपनाची पद्धती : वितळलेल्या जस्तात वस्तू बुडविल्यावर जस्त व लोखंड यांची विक्रिया होऊन त्यांची ठिसूळ मिश्रधातू पृष्ठावर तयार होते. तापमान नियंत्रित केल्यास व जस्ताबरोबर थोडे ॲल्युमिनियम वापरल्यास ही मिश्रधातू तयार होण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे अधिक तन्य (ताणला जाणारा) लेप तयार होतो. सागरी उपयोगाच्या वस्तूंसाठी ॲल्युमिनियमाऐवजी मॅग्नेशियम वापरतात.
विद्युत् विलेपन पद्धतीला थंड गॅल्व्हानीकरण असेही म्हणतात. ही पद्धत लोखंडी तारांकरिता तसेच खोलगट वस्तूंकरिता वापरतात. या पद्धतीला जस्त कमी लागते, पण वेळ अधिक लागतो व दिलेला लेप कमी काळ टिकतो. मात्र या पद्धतीत मिश्रधातू निर्माण होत नाही व त्यामुळे तार ओढताना गुळगुळीत लेपाचे तुकडे पडत नाहीत. तिरप्या आसावरील फिरत्या पिपात जस्त-चूर्ण तापत ठेवून त्यात खिळ्यासारख्या लहान वस्तू मिसळल्या, तर काही तासांनंतर त्यांचे चांगले गॅल्व्हानीकरण होते. जस्ताच्या लेपात कालमानानुसार सच्छिद्रता आल्यास किंवा त्यात खंड पडल्यास विद्युत् रासायनिक क्रिया (जस्त-धनाग्र व पोलाद-ऋणाग्र) सुरू होऊन गंज चढतो. गॅल्व्हानीकरण योग्य प्रकारे झालेले असल्यास गंजरोधकता १५ ते ३० वर्षे किंवा अधिक काळही टिकू शकते.
पहा: गंजणे धातूंचे मुलामे विद्युत् विलेपन.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.