कंकोळ ही वनस्पती पायपरेसी या कुलातील आहे. हिचे शास्त्रीय नाव क्युबेबा ऑफिसिनॅलिस असे आहे. कंकोळाला कबाबचिनी किंवा सितलचिनी असेही म्हणतात. काळी मिरी याच कुलातील असल्याने त्यांच्यात साम्य आढळते. ही वेल मूळची इंडोनेशियातील असून तिची लागवड थायलंड, श्रीलंका व वेस्ट इंडीज या देशांतही होते. भारतात कंकोळाची लागवड प्रामुख्याने कर्नाटक राज्यात केली जाते.
कंकोळ ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची खोडे व फांद्या किंचित राखाडी असतात. पाने साधी, अंडाकार-लांबट व मऊ असून ती टोकाला टोकदार असतात. फुले लहान, एकलिंगी असून खवलेदार कणिशात येतात. मादी-फुलांची कणिशे बहुधा बाकदार असतात. फळे आठळीयुक्त व मिरीसारखी मात्र लांब देठाची असतात. फळे पिकण्यापूर्वी काढून सुकवितात. या फळांत बाष्पनशील तेल व क्युबेबीन नावाचे अल्कलॉइड असते.
कंकोळाची सुकी फळे विड्याच्या पानात घालतात. पाश्चिमात्य देशांत ते सिगारेटमध्ये वापरले जाते. कफ व परमा यांवर औषध म्हणून त्याचा वापर केला जातो. मसाले व सुगंधी पदार्थांमध्येही त्याचा वापर होतो.