आदिजीव संघातील काही प्राणी

सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वप्रथम हे प्राणी निर्माण झाले. हे प्राणी अत्यंत सूक्ष्म व एकपेशीय असून खार्‍या वा गोड्या पाण्यात, ओल्या जमिनीत अथवा दमट रेतीमध्ये आजही आढळून येतात. अभ्यासक त्यांना आदिजीव म्हणून ओळखतात. हे प्राणी सहसा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. काचपट्टीवर घेतलेले आदिजीव सूक्ष्मदर्शकातून पाहिले असता त्यांचे शरीर पेशीद्रव्याच्या थेंबाप्रमाणे दिसते. आदिजीवांचा एक स्वतंत्र संघ मानला जातो.
थेंबासारख्या दिसणार्‍या त्यांच्या शरीराच्या आकारामध्येही खूप विविधता आढळते. अमीबासारख्या आदिजीव प्राण्याच्या शरीराचा निश्चित असा आकार सांगता येत नाही, कारण तो सतत हालचाल करीत राहतो. हालचालीसाठी तो पेशीद्रव्याचा छोटा दंडगोलासारखा भाग पसरतो आणि त्याच्या साहाय्याने जागा बदलतो. या भागाला छद्मपाद म्हणतात. काही आदिजीवांच्या शरीरावर केसले (केसांसारखी दिसणारी अंगके) असतात (उदा., पॅरामेशियम), तर काहींच्या शरीरावर प्रकेसले ( चाबकाच्या दोरीसारख्या दिसणार्‍या अनेक अंगिका) असतात. (उदा., यूग्लिना) या अंगिकांच्या हालचालीमुळे हे प्राणी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. हे प्राणी एकपेशीय असून अन्नरिक्तिकेमार्फत अन्नग्रहण करतात व त्याचे पचनही करतात. संकोचशील रिक्तिका जीवद्रव्यातील पाण्याचे नियमन करते आणि न पचलेल्या अन्नाचे उत्सर्जन करतात.

आदिजीवांच्या शरीरात, शरीरातील किंवा शरीराबाहेरील संवेदनांचे ग्रहण, वहन वा नियंत्रण करण्यासाठी मज्जासंस्था नसते. मात्र, सर्व शरीरभर पेशीद्रव्याचे संवेदनक्षम तंतुंमय जाळे असते. त्याच्या साहाय्याने शरीरातील आणि शरीराबाहेरील क्रियांवर नियंत्रण साधले जाते. या प्राण्यांची वाढ पूर्ण झाली की, पेशीकेंद्रकांसह शरीराचे दोन पूर्णपणे विभाजन होते. विभाजित झालेल्या दोन भागांची वाढ होऊन नंतर त्यांचे रूपांतर होते. संकटकाळात हे फलित बीजांडाद्वारा प्रजनन करतात.

काही आदिजीव एकएकटे राहतात, तर काही समूहाने राहतात. काहींच्या बाबतीत सहजीवनही आढळते काही आदिजीव परोपजीवी असतात. यातील काही मानवांमध्ये आजार निर्माण करतात. उदा., प्लास्मोडियम, एंटामीबा इत्यादी.

आर्. एच्. व्हिटाकर यांच्या आधुनिक पद्धतीच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीप्रमाणे आदिजीव संघाचा समावेश प्राणिसृष्टीत न करता सृष्टी प्रोटिस्टा सामध्ये करण्यात आला आहे.