मुखवटा नृत्ये. जगभरात धर्मधारणांसह सर्वदूर मुखवटा नृत्य उत्सव सादर होतो. महाराष्ट्रातील आदिवासी भागात ‘बोहाडा’ नावाने मुखवट्यांचा किंवा स्वांगांचा (सोंगाचा) उत्सव होतो. विशेषतः ठाणे, नगर व नासिक जिल्ह्यात साधारण चैत्र-वैशाखात हा उत्सव आयोजित करण्यात येतो. तीन, पाच, किंवा सात दिवस चालणार्या या उत्सवास ‘आखाडा’ किंवा ‘आखाडी’ असेही नाव आहे. हा उत्सव देवीची यात्रा म्हणूनही साजरा केला जातो. या उत्सवात देव, देवी, दैत्य, हिंस्त्र श्वापदे, ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंगे घेत पुराणकथा सादर केल्या जातात. गणपती, सरस्वती, रक्तादेवी, कालिका, दैत्य, राम, रावण, हनुमान अशी कितीतरी सोंगे घेतली जातात. मुखवटे व त्यांबरोबरच प्रभावळी बांधून ही सोंगे नाचत मंडपात, दरबारात येऊन सूत्रधार, गाडीवान यांच्या सहकार्याने पुराणकथा सादर करतात. या उत्सवांत सामान्यतः उत्सव सांगतेच्या आदल्या रात्रभर सोंगे नाचविण्याची प्रथा आहे. या उत्सवास भवाडा, लळीत असेही म्हणतात. देवीच्या आवाहनापासून सांगतेपर्यंत पूजाअर्चा, वारी घेणे (अंगात संचार होणे) यांबरोबरच विधिनाट्यात्मधारणेसह लोकनाट्य तमाशा सादर करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी गोंधळीसमूहांची हजेरी असते. ‘रात्र थोडी सोंगे फार’ ही म्हण या उत्सवातूनच आकारली जाते.
भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या दाक्षिणात्य भागांत यक्षगान स्वरूपात, तसेच श्वापदे, देवीदेवता यांच्या मुखवट्यांसह हा उत्सव होतो. दादरा नगर हवेली, सिक्कीम, आसाम, नागालँड, मिझोराम, हिमाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा अशा आदिवासीबहुल पूर्वांचलात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. लाकूड,कागद,बांबू यांपासून मुखवटे तयार केले जातात. उत्तराखंड, बिहार एवढेच काय अखंड भारतातील सर्व प्रदेशात वेगवेगळ्या स्वरूपात हे उत्सव साजरे होतात. सर्वत्र मुखवट्यांसह नृत्योत्सवांना महत्त्व असते. पुराणकथा, भूतकथा, उत्पत्तिकथा यांचे उद्धरण यात होते. चिनी बोहाडा डी ऑपेरा म्हणून प्रसिद्ध आहे. तिबेट, भूतान, नेपाळ या देशांमध्ये भारतीय प्रथेशी साम्य पाहावयास मिळते.
जगभरात विविध प्रकारे मुखवटा नृत्ये सादर होतात.मात्र सर्वदूर पौराणिक व धर्मधारणात्मकतेने हे उत्सव साजरे होतात, हे लक्षणीय आहे. यात अफ्रिका, यूरोप हे खंड मागे नाहीत.‘डेल आर्ट इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिजिकल थिएटर’ यांनी जगभरातील दहा उत्सवांचा निर्देश केला आहे. (१) व्हेनेशियन कारनिवल मास्क्स, (२) मेक्सीकन डे ऑफ द डेड मास्क्स, (३) चायनीज न्यू इयर मास्क्स, (४) ब्राझीलियन कारनिवल मास्क्स, (५) फिलिपिनिओ डिनाग्यान मास्क्स, (६) अफ्रिकन फेस्टिवल मास्क्स, (७) बहामनियन जुनकानु मास्क्स, (८) ऑस्ट्रीयन करमपसनॉट फेस्टीवल डान्स, (९) व्हेनेझेलेयन डान्सिंग डेवीट्स ऑफ इयर मास्क्स, (१०) जापनीज शिमोकिटा टेन्यू मॅटसन मास्क्स अशा या दहा नोंदी होत.
संदर्भ :
- राणे, सदानंद, लोकगंगा : महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये, डिंपल पब्लिकेशन, पुणे, २०१२.
अतिशय महत्वपूर्ण माहीती मिळाली, धन्यवाद.