खंडोबाचे जागरण हा खंडोबा या कुलदैवताचा संकीर्तन प्रकार असून कुळधर्म-कुळाचार म्हणून खंडोबाचे जागरण घातले जाते. हे जागरण विधिनाट्य म्हणूनही ओळखले जाते. आंबेचा गोंधळ, भैरवनाथाचे भराड तसेच खंडोबाचे जागरण.खंडोबा हे कुलदैवत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात पूजनीय आहे. महाराष्ट्रात खंडोबाला मल्हारी असेही म्हटले जाते. तर कर्नाटकात मैलार आणि आंध्रप्रदेशात मल्लाणा या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खंडोबाची एकूण 11 ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर मंदिरात वाघ्या-मुरळयांकरवी जागरण घातले जाते. लग्न, मुंजीनंतर घराच्या अंगणातही जागरण घातले जाते. वाघ्ये आणि मुरळया हे खंडोबाचे उपासक असून ते दिमडी, तुणतुणे, घाटी आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने रात्रभर खंडोबाचे संकीर्तन करतात. रा.चिं .ढेरे यांच्या मताप्रमाणे खंडोबा हा ज्यांचा कुलदेव आहे, अशा अनेक कुटुंबात लग्न मुंजीसारख्या संस्कारांनंतर बटूला अथवा वधू-वरांना देवदर्शनाला घेऊन जाणे आणि वाघ्या-मुरळीचे जागरण करविणे हा कुळाचार रूढ आहे. जागरणाचे स्वरूप अगदी गोंधळासारखेच असते. पाच उसांच्या मखरात प्रतीकात्मक देवस्थापना करून वाघ्यामुरळयांचा समूह तुणतुणे, घोळ व खंजिरी या वाद्यांच्या साथीने खंडोबाची गाणी गाण्याचा जो कार्यक्रम करतो त्यास जागरण करणे किंवा जागरण घालणे असे नाव आहे. जागरणास पुरातनकाळचे नाटक म्हणूनही संबोधले जाते. देवगिरीच्या यादवांच्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात खंडोबाची पूजा लोकप्रिय होती. बाराव्या शतकातील महानुभाव वाड्:मयात खंडोबाविषयी उल्लेख आढळतो. गुन्थर सोन्थायमर यांनी King of Hunter, Warriors, and Shepherds: Essays on Khandoba या ग्रंथात खंडोबा या दैवताचे उन्नयन यक्षापासून खंडोबा असे झाले. आणि खंडोबा देव म्हणून सुप्रतिष्टीत झाला. मुस्लिम आणि मराठा राजांच्या राजवटीत खंडोबा, मैराळ / मैलार आणि काळभैरव या दैवतांची प्रतिष्ठापना झाली असे विवेचन केलेले आहे खंडोबा देवता, खंडोबाचे जागरण, खंडोबाची उपासना पद्धती, खंडोबाचे वाघ्या-मुरळी हे उपासक यासंबधीचे उल्लेख संत साहित्यात तेराव्या शतकापासून आढळतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत तुकाराम, संत एकनाथ, संत शेख महमद बाबा श्रीगोंदेकर, बसवेश्वर, निरंजन माधव, निरंजन रघुनाथ अशा अनेक संतांच्या वाड्मयात हे उल्लेख आढळतात. खंडोबाच्या उपासना पद्धतीतील अनिष्ट गोष्टींचा अधिक्षेप करतानाच ‘अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ’ असे संतानी म्हटले आहे. चैतन्य महाप्रभू यांनी जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे. तेव्हा त्यांनी मुरळी सोडण्याच्या रूढी परंपरेचा अधिक्षेप केला होता. संत रामदासांच्या यात्रा वर्णनात खंडोबाच्या मुरळ्या जागरण सादर करताना जणू कोकीळेसारख्या गातात असे म्हटले आहे.
खंडोबाचे जागरण कुळधर्म-कुळाचार, विधिनाट्य म्हणून सादर होते. खंडोबाचे जागरण घालण्याविषयीचा नवस अठरा पगड जाती धर्मातील लोक बोलतात. पाच पावली, तळी भरणे, कोटंबा पूजन, घटस्थापना, लंगरतोड आणि ओझ उतरणे हे विधी जागरणामध्ये केले जातात. तळी भरताना खंडोबाचा उदोकार करण्यात येतो. तळी आरती करण्यात येते. ‘कैलास राणा शिवचंद्र मौळी’ या शंकरस्तुतीने जागरणाचा प्रारंभ होतो. देवतांना आवाहन, गण, गौळण, खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचे वर्णन करणारी संकीर्तनपर पदे आणि नाट्यरूपी कथा सादरीकरण आणि नंतर भैरवी, आरती असा जागरणाचा स्थुल आविष्कारक्रम असतो. स्फुट पदांपर्यंतचा भाग हा जागरणाचा पूर्वरंग म्हणून ओळखला जातो. तर नाट्यरूपाने सादर होणारी खंडोबाची कथा अथवा रामायण, महाभारत पुराणांमधील कथा हा उत्तररंग म्हणून ओळखला जातो. खंडोबाने मणि-मल्ल दैत्यांचा केलेला संहार, खंडोबा म्हाळसेचे लग्न, खंडोबा बाणाईचे लग्न, खैरे भक्ताची कथा अशा कथा नाट्यरूपाने सादर होतात. नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती, सत्यवान-सावित्री, निळावंती अशा कथा नाट्यरूपाने जागरणात सादर होतात.

पदाच्या चौकाचे गायन, या चौकातील नाट्यात्म प्रसंगाचे संवाद, चौकाचे निरूपण व पुन्हा पुढच्या चौकाचे गायन असे खंडोबाच्या जागरणाच्या सादरीकरणाचे व्यामिश्र स्वरूप असते. वादन, गायन, नृत्य आणि अभिनय जागरणात एकजीनसी स्वरूपात सादर होतात. शंकराने खंडोबाचा अवतार घेतला आणि मणि-मल्ल दैत्यांचा संहार केला या युद्धाची कथा सांगताना जागरणातील पदांची रचना ही पोवाड्यासारखी वीररसप्रधान असते. म्हाळसा, बाणाई यांच्या रूपाचे वर्णन करणारी तसेच म्हाळसा, बाणाई आणि खंडोबा यांच्यातील प्रणयप्रसंगांचे अथवा विरहाचे वर्णन करणारी पदे ही लावणीसारखी शृंगाररसप्रधान असतात. खंडोबाचे गुणवर्णन करणारी पदे ही अभंगांसारखी भक्तिपर असतात. खंडोबाच्या जागरणात विविध रसांचे दर्शन घडते आणि भक्ति हा स्थायी भाव असणारे जागरण रंजकही होते. खंडोबाच्या जागरणात देवाचे दैवीरूप आणि मानवीरूप यांचा सुंदर समन्वय कथेतून आणि कथा पुढे नेणाऱ्या कथांमधून प्रकट करण्यात येते.
खंडोबाचे जागरण सादर करणारे वाघ्ये व मुरळया उपासक असतात तसेच कलावंतही असतात. खंडोबाची घटस्थापना ही पूजनीय असते तशीच ती रंगवस्तुही होते. खंडोबा हे आराध्यदैवत असते तसेच तो कथेचा नायकही असतो. जागरण पाहाणारे आणि ऐकणारे खंडोबा भक्तही असतात आणि सश्रद्ध प्रेक्षकही असतात. ‘जागरण सादर करणारे वाघ्या-मुरळी हे यजमानांच्या दृष्टीने खंडोबाचे दूत असतात. या श्रद्धेतून जागरण उभे राहताना व ते समाप्त होताना यजमान वाघ्या-मुरळयांच्या पाया पडतात. पण प्रत्यक्ष जागरण सादर होताना वाघ्ये व मुरळया त्यात रंगून जातात, व कळत-नकळत उपासकांसोबत कलावंताची भूमिका बजावतात.
जागरण घालणाऱ्या यजमानांची मनोभूमिका खंडोबाचे भक्त अशी असते. खंडोबाच्या संकीर्तन भक्तीत तल्लीन झालेले हे भक्त ‘भाविक’ असतात आणि जागरणातील रंजकता जसजशी वाढत जाते तसे ते रसिकही होतात. म्हणजेच जागरण घालणाऱ्या यजमानाची व जागरण स्थळी हजर असणाऱ्या भक्तांची मनोभूमिका एकाच वेळी भाविक आणि रसिक-आस्वादक अशी असते. म्हणूनच जागरणाच्या प्रयोगरूपाचा अभ्यास करताना उपासकः कलावंत आणि मूळ भक्तः रसिक-आस्वादक अशा चारही पातळयांवर विचार करावा लागला.’3 जागरणाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून संकीर्तन प्रकाराऐवजी जागरण रंजनप्रकार म्हणून लोकप्रिय होऊ लागला आहे. असे झाले तरी जागरणाची मूळ श्रद्धायुक्त भूमिका बदललेली नाही. खंडोबाच्या जागरणातील वाघ्या मुरळयांचे नृत्य अलीकडे एक लोकनृत्य प्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

संदर्भ :

  • ढेरे, रा.चिं. लोकसंस्कृतीचे उपासक, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, , 1996..2. खांडगे ,प्रकाश, खंडोबाचे जागरण, लोकवाङ्मय गृह, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा