लोक हा शब्द मानव, मानवी समूह,अखिल मानवजात या अर्थाने, भारतीय परंपरेत, अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय वैदिक वाङ्मयापासून या शब्दाचे उल्लेख सर्वत्र आढळतात. मौखिक परंपरेत हा शब्द वरील सर्व अर्थांनी रूढ आहे. पारंपरिक जीवनात,लवचीकतेने वर्तमानातील जाणिवा समजावून घेत, तरीही पारंपरिक जीवनसरणी समान मनस्कतेने अनुसरणारा संघमनस्क, मानवी समूह म्हणजे लोक होय. इंग्लंडमधील जे थॉम्स तथा अँम्ब्रोस मर्टन यांनी जर्मनीतील ग्रीमप्रणीत VolksKunde या शब्दाला Folk-lore हा पर्यायी शब्द वापरला. या क्षेत्रातील Popular Antiquity हा शब्द तेव्हापासून मागे पडला. Folk-lore मधील ‘Folk’ या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून भारतीय अभ्यासकांनी लोक, जन, ग्राम असे शब्द वापरले. त्यांतील Folk ला उचित पर्याय म्हणून लोक हा शब्द रूढ झाला.

सुरुवातीच्या काळात लोक या शब्दाचे, ग्रामीण, मागासलेले, अडाणी,आदिवासी, वन्य, शूद्र, सामान्य, बहुजन, अनार्य, काळे, डोंगरी, वन्य इ.अर्थ मांडले गेले. त्यांच्या मौखिक परंपरांचा ; म्हणजे शाब्द, साधन व वर्तनपरंपरांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न झाला.त्यातूनच लोक आणि नागर, अभिजन किंवा वैदिक असा मानवी समूहातील भेद निर्देशित झाला. अजूनही विविध अभ्यासक याच भेदमूलकतेने अभ्यासक्षेत्रात परंपरांचे संकलन, वर्गीकरण,स्पष्टीकरण करतात. जागतिक अभ्यासक्षेत्रातील विविध अभ्यासपद्धती व अभ्यासपरंपरा यांनी वरील भेदमूलकता अभ्यास व संशोधनाधारे दूर केली आहे. केवळ लोकसांस्कृतिक प्रवाहात,एकूण मानवी समूहातीलच सामान्यतः अनुकरण स्वीकारणारे लोक आणि शहाणपणाने परंपरांमध्ये उचित बदल करून; धुरीणपणे परंपरांमध्ये स्थल काल परिस्थितीनुसार बदल करून परंपरांना वळण लावणारे लोक; असे तात्कालिक भेद असतात हे या अभ्यासपद्धतींनी लक्षात घेतले. लोक आणि लोकधुरीण हे एकाच मानवीसमूहात संघमनाने असतात, हे स्पष्ट केले. संस्कृतीसारणीमध्ये, सतत वर्तमान सापेक्षता ठेवण्याच्या प्रक्रियेत, लोक आणि लोकधुरीण यांचा सारखाच सहभाग असतो.

भारतीय परंपरेत लोक हा शब्द व्यक्ती (घटकलोक,An individual), विशिष्टसमूह (अंगस्वरूप लोक,A group with same cultural aspects), विश्वात्मक मानवजात (विराटपुरुष लोक,The whole mankind in the Universe) या तीनही अर्थांनी लोक शब्द वापरला आहे. या तीनही स्तरांवरील जाणिवेसह प्रत्येक व्यक्ती जगत असते; असे स्पष्टपणे निवेदित केलेले दिसते.लोक धारणा करणारी शाब्द, साधना आणि वर्तन परंपरेची; सर्व प्रकारच्या जीवन अंगाविषयीची सूत्रे परंपरागत असतात, त्यांना ‘लोकबंध’ किंवा ‘लोकतत्व’ (Folk Element) असे म्हणतात. लोकची त्रिविधता (A person, A group with same cultural aspects and The whole mankind in the universe) लोकजीवनात प्रकट होत असते. भारतीय परंपरेतील ही लोककल्पना आता अभ्यासक्षेत्रात जागतिक पातळीवर स्वीकृत झालेली दिसते.

लोक म्हणजे प्राथमिक, अविकसित अवस्था आणि नागर, अभिजन किंवा वैदिक ही शास्त्रीय स्वरूपातील विकसित अवस्था. यांचे अस्तित्व हा सांस्कृतिक विकास प्रक्रियेतील भाग असतो. लोकमधूनच अभिजन प्रकटतात आणि अभिजनाचे अनुकरण सामान्य लोक मध्ये केले जाते हे आता सर्वमान्य संशोधित सत्य पुढे आले आहे. लोकचा अभ्यास, या दृष्टिने, सर्व अभ्यास परंपरात उदा – भाषाशास्त्रीय, ऐतिहासिक इ.मध्ये केला जात आहे.‘लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती’ या अभ्यासक्षेत्रात, ‘अंगस्वरूप लोक’चा (A group of same cultural aspects)अभ्यास केंद्रवर्ती स्वरूपात केला जातो. त्यामुळे प्रादेशिक, स्तरीय, वांशिक, जातीय, भाषिक, धार्मिक अशा प्रकारचे पृथक लोक विचारात घेऊन; त्यांचा अभ्यास जीवनांगाच्या सर्व वैशिष्ट्यांसह स्वतंत्रपणे केला जातो. तसाच तो अन्य लोकशी तुलनात्मकतेने केला जातो. धर्माधर्म, दैवते, भाषा, कलाकुसर, क्रीडा,कसरत, खाणेपिणे, लेणे,वेषभूषा, केशभूषा, घरेदारे, जत्रायात्रा, बाजारहाट, व्यवहार, विवाहप्रथा, मर्तिक प्रथा, शेतीभाती, गुरेढोरे, आरोग्यवैद्यक, इ. सर्व जीवनांगाच्या संबंधात पारंपरिक साम्य व एकात्मता असते. लोकचा अभ्यास सर्व ज्ञानक्षेत्रांना प्राथमिक सामग्री पुरविणारा असतो. लोकप्रज्ञेतून प्रकटलेले अनुभवजन्य असे शाब्द, साधन आणि वर्तन विषयक विशेष ज्ञान प्राथमिक किंवा ढोबळ स्वरूपात लोकमध्ये परंपरागत झालेले असते.

संदर्भ :

  • सहस्रबुद्धे, अनिल, लोकबंधात्मक चिकित्सा, नितीन प्रकाशन, पुणे, २०१२.

प्रतिक्रिया व्यक्त करा