लोकबंध म्हणजे (folk type). लोकधारणेची अधिक व्यापक जाणीव घडविणारी संज्ञा. ती आदिबंध आणि कल्पनाबंध या संज्ञाना जवळची आहे. लोक ही संज्ञा विविध स्वरूपात जाणवते. १) व्यक्ती घटक लोक २) समूह अंगस्वरूप लोक ३) अखिल मानवजात विराटपुरुष लोक असे हे त्रिविध स्वरूप होय.लोक ही संज्ञा व्यक्तीपासून समष्टीपर्यंत सर्वव्यापक आहे.या सर्वव्यापक लोकांचे जगणे लोकबंधात्मक असते. म्हणूनच जगण्याचे दृश्यरूप म्हणजे लोकबंधाचे प्रकटीकरण. बंध म्हणजे सूत्र असा पारंपरिक अर्थ आहे. यादृष्टीने लोकबंधाची पुढीलप्रमाणे व्याख्या आढळते. अनुभूतीतून तयार होत गेलेला, लोक धारणेसाठी कार्यान्वित झालेला, परंपरेत लवचिकतेने परंतु मूलभूततेने  राहणार सनातनातून आलेला, वर्तमानात जाणवणारा, भविष्यकाळात प्रगटण्याची क्षमता असणारा, लोकमानातील जाणिवेचा आनंद किंवा सौंदर्यभावना प्राप्त कल्पनाप्रवाह म्हणजे लोकबंध होय. लोकबंध वर्तनपद्धतीतून, चिन्हे, प्रतीके, प्रतिमा आणि भाषिक रूपातून प्रकट होतो.

संदर्भ :

  • देवरे रमेश,(संपा ),लोकसाहित्य दर्शन, कर्मवीर प्रकाशन, पुणे, २००९.

प्रतिक्रिया व्यक्त करा