फुलोऱ्यासह करडई वनस्पती

करडई ही वर्षायू वनस्पती अ‍ॅस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरथॅमस टिंक्टोरियस असे आहे. या वनस्पतीचे मूलस्थान अ‍ॅबिसिनियाचा डोंगराळ प्रदेश व अफगाणिस्तान असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. फुलांपासून मिळणार्‍या लाल रंगाकरिता बहुतेक पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांत या वनस्पतीची लागवड करतात. भारतात जवळजवळ सर्व राज्यांत करडईची लागवड बियांतील तेलाकरिता केली जाते. या बियांपासून प्रामुख्याने खाद्यतेल मिळवितात.

करडईचे झुडूप ३०-६० सेंमी. उंच वाढते. पाने साधी, एकाआड एक, लांबट व बिनदेठाची असून कडांवर मऊ काटे असतात. फुलोरा स्तबक प्रकारचा असतो. तो पिवळा, नारिंगी वा लाल असून तो फांद्यांच्या टोकाशी येतो. एका फुलोर्‍यात १५-२० फुले असतात. फळे मऊ, लांबट व चौधारी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते.

करडईची पाने चवीला कडवट असून ती पाचक आहेत. कोवळ्या पानांची भाजी करतात. पानांमध्ये ‘’ जीवनसत्त्व, फॉस्फरस व कॅल्शियम असते. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात. प्राचीन काळी करडईची लागवड तिच्या बियांमधील कॅरथॅमीन हा रंजक पदार्थ मिळविण्यासाठी केली जात असे. त्याचा वापर खाद्यपदार्थांना रंग व चव येण्यासाठी करीत असत. प्राचीन ईजिप्शियन राजघराण्यातील ममीवरच्या कपड्यांना हाच रंग दिलेला आहे, हे रासायनिक चाचणीत सिद्ध झाले आहे. हल्ली करडईची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते.

करडईच्या बियांपासून चवहीन व रंगहीन, परंतु भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. या तेलात वेगवेगळी मेदाम्ले असतात. करडईच्या तेलात ओलेइक आम्ल व लिनोलिइक आम्ल असतात. ही आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सूर्यफूल, सोयाबीन व ऑलिव्ह यांच्या तेलाबरोबरच करडईच्या तेलापासूनही मार्गारीन (एक प्रकारचे लोणी) तयार करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा