कर्दळ वनस्पती

कर्दळ ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीज आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात.

कर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड ०.९-१.२ मी. उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार व छर्‍यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात.

कर्दळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते. हिला उष्ण हवामान लागते. जमिनीखाली वाढणार्‍या मूलक्षोडापासून अभिवृद्धी करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या, निरनिराळ्या रंगछटांच्या व मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात.

कर्दळीचे मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), उत्तेजक व स्वेदकारी (घाम आणणारे) असते. बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत. दागिने बनविण्यासाठी कर्दळीच्या बियांचा वापर होतो.