डेलिया पिन्नाटा

अ‍ॅस्टरेसी कुलातील (सूर्यफूल कुल) एका प्रजातीच्या वनस्पतींना डेलिया म्हणतात. डेलिया प्रजातीत सु. ३६ जाती आहेत. सूर्यफूल, डेझी, शेवंती या वनस्पतीही अ‍ॅस्टरेसी कुलातील आहेत. डेलिया वनस्पतीला वेगवेगळ्या रंगांची आकर्षक फुले येतात. त्यामुळे उद्यानांत या फुलांची मोठ्या प्रमाणावर शोभेसाठी लागवड केली जाते. या प्रजातीतील वनस्पती मूळच्या मेक्सिको, दक्षिण अमेरिका आणि कोलंबिया येथील आहेत. डेलिया हे मेक्सिकोचे राष्ट्रीय फूल आहे.

डेलिया प्रजातीतील वनस्पती कंदीय, शाखीय, बहुवर्षायू व झुडूप प्रकारच्या आहेत. त्यांचे खोड सर्वसाधारणपणे ३० सेंमी. ते २ मी.पर्यंत उंच वाढते. पाने संयुक्त, पिसासारखी व समोरासमोर असतात. मुळे फुगीर व इन्युलीनयुक्त (एक प्रकारची शर्करा) असतात. फुलांचा आकार ५—३० सेंमी. व्यासाचा असतो. फुले वेगवेगळ्या आकर्षक रंगांची परंतु गंधहीन असतात. शुष्क फळ साधारणपणे आयताकृती किंवा अंडाकृती, एका बाजूस सपाट व टोकाला गोलाकार असते. फळांत एकच बी असते. एकदा फुले येऊन गेली की खोड वाळून जाते. पुढच्या हंगामात याच खोडाच्या वाळविलेल्या कंदापासून लागवड केली जाते.

बागेत फुलांसाठी लावण्यात येणाऱ्या डेलिया पिन्नाटा या जातीच्या २,००० पेक्षा अधिक प्रकारांची लागवड करण्यात येते. डेलियाच्या फुलांचा रंग लाल, पांढरा, पिवळा किंवा जांभळा असतो. काही फुले दोन रंगी असतात.