नांदवळकर , साहेबराव : ( १ ऑक्टोबर १९३८ -२५ नोव्हेंबर २०११ )ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारीचा तमाशा या दोन्ही लोककला प्रकारात प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील तमाशा कलावंत. काव्य रचणारा शाहीर,ते सादर करणारा गायक, वगनाट्याकार, सोंगाड्या , सरदार, पेटीवादक, नाच्या अशा वेगवेगळ्या भूमिकेत त्यांनी तमाशा सृष्टीची कला सादर केली . मूळ भराडी समाजातील सातारच्या नांदवळ हे त्यांचं गाव .जन्म सातारमध्ये .नांदवळकरांनी जेमतेम तिसरी, चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे बंधू प्रतापराव तमाशात नाच्या म्हणून काम करायचे. भराडी गाणी गात फिरणाऱ्या साहेबरावांचा ओढा तमाशाकडे वाढला. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी तमाशात पदार्पण केले. तमाशात येण्यापूर्वी दारोदार भिक्षा मागणाऱ्या साहेबरावांनी संत सखुबाई, नाथांची गाणी म्हणत आपल्या गात्या गळ्याचा जणू रियाजच केला. रावसाहेब भाऊसाहेब आकलेकर हे साहेबराव नांदवळकरांचे थोरले मामा. त्यांच्या तमाशात साहेबरावांनी प्रथम सोंगाड्याचे काम केले. पाचगणीला तमाशा सादर करताना एकदा नर्तकीला गाणं म्हणत नाचता येत नव्हतं तेव्हा साहेबरावांनी पदर घेतला आणि गाणं सादर केलं.मामा खुष झाले त्यांनी साहेबरावांना केस वाढवायला सांगितले. नाच्या म्हणून काम करायला सांगितले. त्यांना केसांचा टोप देण्यात आला. मग टोपाचा कंटाळा आला आणि साहेबरावांनी केस राखले. मुंबईत त्यांचा नाच्या पोरांचा जलसा प्रसिद्ध झाला. पुढे साहेबराव नाच्या चे काम सोडून हार्मोनियम वाजवू लागले. त्यानंतर ते हरणा घोडनदीकरणीच्या पार्टीत पेटी वाजवू लागले. पुढे साहेबराव यमुनाबाई वाईकरांच्या संगीतबारीत गेले. पुढे चंद्रकांत ढवळपुरीकरांच्या तमाशात साहेबराव पेटीमास्तर झाले.१९६५ साली साहेबराव नांदवळकर पांडुरंग मुळेंच्या तमाशात गेले आणि तिथे १९६५ लाच पाच तोफांची सलामी ,महारथी कर्ण अशी मोठी वगनाट्यो बसवली. पाच तोफांची सलामी या वगनाट्यात तर त्यांची भूमिका बाजीप्रभू देशपांडे ही होती. रायगडची राणी या वगात त्यांनी राजारामची मुख्य भूमिका केली. त्या भूमिकेला सुद्धा बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर शिवाजी, संभाजी या भूमिका देखील साहेबरावांनी केल्या. गड आला पण सिंह गेला या वगात त्यांनी शेलारमामाची भूमिका केली. वगामध्ये काम करीत असताना त्यांनी काव्यलेखन पण सुरू ठेवलं होतं. त्यांनी लिहिलेल्या दुष्काळावरच्या गाण्याच्या `१००० जाहिराती छापल्या गेल्या आणि त्या हातोहात संपल्या देखील. १९७६ ला साहेबराव नांदवळकरांनी स्वतंत्र तमाशा काढला. हे सगळ करत असताना त्यांनी एका बाजूला शासनाच्या तमाशा शिबिरातून लोकांना मार्गदर्शन केलं. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत विद्यार्थ्यांना  गौळणी शिकवल्या. शास्त्रीय संगीतातील कुणाही पंडिताचा गंडा न बांधताही साहेबराव नांदवळकरांना शास्त्रीय संगीताचा बाज होता आणि त्या बाजातून त्यांनी वेगळ्या प्रकारचा तमाशा उभा केला. त्यांना राज्यपुरस्कारही प्राप्त झाला होता.
पुण्यात अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा