वाईकर ,यमुनाबाई (जन्म : ३१ डिसेंबर १९१५ – मृत्यू : ७ मे २०१८) मराठीतील सुप्रसिद्ध लावणी गायिका. मूळ नाव यमुना विक्रम जावळे. आईचे नाव गीताबाई. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील वाई गावामध्ये कोल्हाटी जमातीतील एका गरीब आणि अतिमागास कुटुंबात यमुनाबाईंचा जन्म झाला. भटक्या-विमुक्त जमातीत जन्मलेल्या यमुनाबाईंचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी कसरतीचे खेळ दाखविणे, फण्या-कंगवे विकणे, तमाशा बारीत काम करणे असे विविध उद्योग करत असत. त्यामुळे त्या लहानपणापासून डोंबाऱ्याचे खेळ करणे, तुणतुण्याच्या तालावर गाणी म्हणणे, पायाला बाभळीच्या शेंगा बांधून नाच करणे, गाढवे-डुकरे पाळणे, दारोदार भीक मागणे इत्यादी मार्गांनी थोडे-फार पैसे मिळवून गृहकामास हातभार लावत असत.

यमुनाबाईंना जन्मतःच नृत्य, गायन आणि अभिनय कलेची देणगी मिळाली होती. यमुनाबाईंचा सुरेल आवाज ऐकल्यावर त्यांच्या चुलतभावाने त्यांना मुंबईच्या रंगू-गंगू सातारकरांच्या संगीत बारीत दाखल केले. तेथे हिराबाई बडोदेकरांच्या गुरूंजवळ गायकी शिकलेल्या शेवंता नावाच्या लावणी गायिकेने यमुनाबाईंना गायनकला, अदाकारी आणि लिखापढी शिकविली. त्यानंतर इ. स. १९३५-३६च्या दरम्यान तारा, हिरा ह्या बहिणींच्या मदतीने यमुनाबाईंनी स्वतःची संगीत बारी सुरु केली. ह्या बारीने पुणे, मुंबई, नाशिक, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, नागपूर ते थेट बेळगाव आणि कोकण अशा विविध ठिकाणी गायकीच्या बैठका केल्या. तेव्हा गोड व भावपूर्ण आवाज आणि अदाकारीकारीतील जिवंतपणा ह्यांमुळे यमुनाबाईंचे महाराष्ट्रभर कौतुक झाले.

इ. स. १९४२-४३च्या सुमारास यमुनाबाई मुंबईतील भोईवाड्यात स्थिरावल्या. तेथे उस्ताद फकीर अहमद व अब्दुल करीम ह्या शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील जाणकार मंडळींनी यमुनाबाईंना शास्त्रीय संगीत आणि अभिनयाच्या अदाकारीशी संबंधित विविध बाबी शिकविल्या. त्यानंतर पन्नाशीपर्यंत यमुनाबाईंची गायकी विविध अंगांनी बहरत राहिली. मध्यंतरी त्यांनी ढोलकी-तमाशाचा फडही काढून पाहिला. पण व्यवहारापेक्षा कलेला महत्त्व देण्याच्या वृत्तीमुळे हा फड फारसा चालला नाही.

लावणी-तमाशातून कलामूल्य काळवंडू लागल्याचे समजल्यानंतर इ. स. १९७४-७५च्या सुमारास यमुनाबाईंनी आपली कला थांबविण्याचा निर्णय घेतला. यमुनाबाई वाईस परतल्यावर वाईतील प्रसिद्ध विद्वान असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी त्यांना संगीत नाटकांतून काम करण्याची विनंती केली. तेव्हा तर्कतीर्थांची विनंती मान्य करून यमुनाबाईंनी ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत भावबंधन’, आणि ‘संगीत मानापमान’ ह्या गाजलेल्या नाटकांतून विविध भूमिका वठविल्या. गायकीप्रमाणेच अभिनयातही नैपुण्य दाखविल्याने यमुनाबाई पुन्हा प्रकाशझोतात आल्या. त्यांची ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या पसंतीस उतरली. यमुनाबाईंनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ ह्या नाटकांमध्येही भूमिका केल्या होत्या. एकदा ‘महाराची पोर’ नाटकाचा प्रयोग पहायला साने गुरुजी आले होते. तेव्हा प्रयोगाचे सर्व उत्पन्न गुरुजींच्या समाजकार्याला देऊन यमुनाबाईंनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले होते.

यमुनाबाई अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस येत असताना हनुमान थिएटरचे मालक असलेल्या मधुकरशेठ नेराळे ह्यांनी त्यांना पुन्हा गायकीचे कार्यक्रम सुरु करण्याची गळ घातली. त्यानंतर मुरलीधर मास्तर, शंकरमामा जवळकर, पांडुरंग घोटकर ह्यांच्या साथीने यमुनाबाई पुन्हा गायकीकडे परतल्या. शाहीर अमर शेख, समीक्षक म. वा. धोंड, लोकसाहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे, लोककलेचे अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश खांडगे ह्या दिग्गजांचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर यमुनाबाईंची गायकी पुन्हा बहरली. एकदा हनुमान थिएटरमध्ये यमुनाबाईंची मंत्रमुग्ध करणारी गायकी ऐकल्यावर प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे ह्यांनी यमुनाबाईंच्या कलेला मानाचा मुजरा केला होता.

पुढे महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने लोककलावंतांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. तेव्हा पंचतारांकित हॉटेलांमध्ये परदेशी पाहुण्यांपुढे यमुनाबाईंनी अत्यंत नजाकतीने लावण्या सादर केल्या आणि परकियांच्या मनात मराठी लावणीला मानाचे स्थान मिळवून दिले. अशोक रानडेंनी सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या वतीने यमुनाबाईंचे कार्यक्रम भारतभर नेले. तेव्हा दिल्ली, कोलकाता, भोपाळ, रायपूर, बिलासपूर येथील हिंदी रसिकांनी बाईंच्या लावणीला मनमोकळी दाद दिली. इ. स. १९७७मध्ये दिल्लीच्या कथ्थक फेस्टिवलमध्ये देशभरातील मोठमोठ्या कलावंतांसमोर यमुनाबाईंनी मराठी लावणीचा सहजसुंदर आविष्कार पेश केला. तेव्हा ‘क्या लय पायी हे आपने | बडी मुश्कील से ये चीज देखने को मिलती है | मै तो आज अपने आपको बडा खुश नसीब समझता हूँ  ||’ ह्या शब्दांमध्ये जागतिक कीर्तीचे कथ्थक नर्तक व शास्त्रीय गायक असलेल्या पंडित बिरजू महाराजांनी यमुनाबाईंचा सन्मान केला होता, ह्यावरून बाईंच्या गायकीचा उच्च दर्जा लक्षात येतो.

यमुनाबाईंनी अंगभूत गुणांच्या आधारे भारतभर असंख्य कार्यक्रम करून मराठी लावणीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. शासनाच्या तमाशा शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लावणी कलावंत घडविल्या. तसेच वेलीवर फुले उमलावीत तशी यमुनाबाई वाईकरांनी शब्दांना रूप देणारी लावणी आजरामर केली. त्यामुळे रसिकजनांनी यमुनाबाईंना ‘लावणीसम्राज्ञी’ असे बिरूद बहाल केले.

राज्यशासन व केंद्र सरकारनेही यमुनाबाईंच्या कलाविषयक योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार दिलेले दिसतात. लावणीकलेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९७७-७८), मध्यप्रदेश सरकारचा देवी अहिल्या पुरस्कार (१९९९-२०००), पश्चिम बंगाल सरकारचा रवींद्रनाथ टागोर पुरस्कार (२०१२) इत्यादी श्रेष्ठ प्रतीचे पुरस्कार यमुनाबाईंना मिळाले होते. इ. स. १९९५मध्ये संगीत नाट्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार यमुनाबाईंना मिळाला होता. त्यानंतर संगीत नाटक अकादमीतफे॔ टागोर पुरस्कार देऊन त्यांना गौरिवण्यात आले.यमुनाबाईंच्या सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने इ. स. २०१३मध्ये ‘पद्मश्री’ हा बहुमोलाचा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला होता.

थोर कलावंत असलेल्या यमुनाबाईंनी समाजबांधवांसाठी धर्मशाळा, विठ्ठल मंदिर ह्यांची उभारणी करून आणि सरकारी मदतीच्या माध्यमातून उपेक्षितांना घरकुले मिळवून देऊन सामाजिक कार्यही केले होते.

इ. स. २०१८मध्ये वयाच्या १०२व्या वर्षी यमुनाबाई वाईकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • ओव्हाळ प्रभाकर, ‘लावणीसम्राज्ञी’, पारस प्रकाशन, कोल्हापूर, इ. स. २००७.

प्रतिक्रिया व्यक्त करा