महाराष्ट्रातील भक्तिनाट्य. अभिनीत भारूडे म्हणजेच लळित. सोंग आणून केलेले कीर्तन अशाही लळिताची व्याख्या केली जाते. दशावताराचे लळित,सांप्रदायिक लळित,कीर्तनाचे लळित,नामसप्ताहाचे लळित, काल्याचे लळित आणि क्रीडास्वरूपी लळित असे लळिताचे सहा प्रकार अभ्यासकांनी सांगितले आहेत.मथुरेची ब्रजविहार परंपरा, बंगालची कृष्णलीला नाट्ये, कर्नाटकी भागवत नाटके आणि महाराष्ट्रातील लळिते यात साम्य आहे.संत तुकारामांच्या अभंगांमध्ये लळितासंदर्भात उल्लेख सापडतात.तुकाराम गाथेत लळित हे स्वतंत्र प्रकरणच आहे. आत्मभानाचा विसर पडून ईश्वराचे सोंग घेऊन त्याच्या संकीर्तनात तल्लीन होणे म्हणजे लळित होय,अशी लळितामागची भूमिका संत तुकारामांनी मांडली आहे.लळिताचा महिमा म्हणजेच नामसंकीर्तनाचा महिमा असे रामदासस्वामीनी त्यांच्या पदरचनेतून सांगितले आहे.महाराष्ट्रात दासोपंत (आंबेजोगाई), रामानंद स्वामी (गोंदी), एकाशिवराम (तलावडा),जगन्नाथस्वामी (कसबे तळवडे) नित्यानंद स्वामी (सारंगखेडा) गणपती मंदिर (सांगली), हरिभाऊ भोंडवे यांच्याकडील वारकरी लळित (पुणे – उंब्रज, नारायणगाव, पिंपळगाव) अशा लळिताच्या परंपरा आढळतात.
लळिताचा मूळ उद्देश वेद आणि त्यांचे तत्त्वज्ञान हलक्या फुलक्या करमणूक साधनांद्वारे लोकांपर्यत पोहचविणे हा आहे.धार्मिक उत्सवाच्या शेवटी लळित सादर केले जाते.त्यात छडिदार,भालदार,चोपदार,वासुदेव,दंडीगान,गोंधळी,वाघ्या मुरळी,बहिरा,मुका,आंधळा इ. पात्रांद्वारा सादरीकरण केले जाते.याद्वारे गावभाट,गाववाघ्या,गावदंडीगाण,वासुदेव,जोशी अशा अनेक ईश्वरी उपासकांचे आणि जातमांगल्यांचे दर्शन लळितात होते. समाजातील विविध वैगुण्यावर बोट ठेवून सामाजिक कुरीतीचे,जातीय-धार्मिक वर्चस्वाचे, अहंकाराचे दर्शन लळितातून घडविले जाते.
वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली असणा-या लळिताच्या प्रारंभी ‘रूप पाहता लोचनी’ हा ध्यानाचा अभंग तसेच ’सुंदर ते ध्यान। उभे विटेवरी’ हा रूपाचा अभंग म्हटला जातो.विठ्ठल विठ्ठल अशा गजरात सोंगाचे आगमन आणि निर्गमन होत राहते. लळिताचे पहिले सोंग निघण्याची तयारी होते,तेव्हा मंगलाचरण आणि प्रसादाचा अभंग म्हटला जातो.‘सद्गुरू देवा प्रसाद देई झडकरी’असे प्रसादाचे गाणे प्रारंभी लळितात म्हटले जाते.मंगलाचरणाचा अभंग झाल्यावर विठ्ठल विठ्ठल असा गजर होतो व लळितात सोंगांच्या रूपाने प्रारंभ होतो.रात्र थोडी सोंगे फार या उक्तिप्रमाणे लळितात सोंगे सुरू राहतात.गावगाड्याचे बदलते स्वरूप आणि जागतिकीकरण,शहरीकरण आणि प्रबोधनाचे बदललेले स्वरूप यामुळे लळिताची परंपरा अलीकडे संदर्भहीन वाटू लागली आहे.
संदर्भ :
- मांडे,प्रभाकर,लोकरंगभूमी (परंपरा,स्वरूप,आणि भवितव्य ),पुणे,२००७.