महाराष्ट्रातील काही कुळांत प्रचलित असलेला एक कुलाचार. घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा विधी असतो. रेणुका, अंबाबाई व तुळजाभवानी या कुलदेवतांच्या नावाने गोंधळ घालण्याचा विधी महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये व देशस्थ ब्राह्मणांमध्ये प्रचलित आहे. गोंधळी जातीचे लोक यजमानाच्या सांगण्यावरून गोंधळ घालण्याचा विधी पार पाडतात. गोंधळ घालण्यात कमीत कमी चारजण भाग घेतात. साथीसाठी व तुणतुणे वाजविण्यासाठी प्रत्येकी एक, गीत व कथा निरूपण करणारा एक मुख्य गोंधळी (नाईक) आणि अधूनमधून लोकांना हसविणारा त्यांचा एक साहाय्यक. पूर्वी गोंधळ्यांच्या अंगांत मलमलीचे अंगरखे, गळ्यात कवड्यांच्या माळा व डोक्यावर कंगणीदार पगड्या असत. एका पाटावर नवे वस्त्र ठेवून गोंधळी त्यावर कलशादी वस्तूंची विधिपूर्वक मांडणी करतो व गोंधळ बोलवणाऱ्या यजमानाच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना व पूजा करतो. गोंधळासाठी आवश्यक असलेली ‘बुधली’ व ‘दिवटी’ ह्या वस्तू गोंधळी स्वतःच्या घरूनच सोबत आणतो. मुख्य गोंधळी गण म्हणून जगदंबेचे स्तवन करतो व नंतर अनेक देवतांना नावे घेऊन ‘गोंधळासी यावे’ असे आवाहन करतो. नंतर तो पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागांत देवीचे गुणगान व एखादे संगीत आख्यान सांगतो. देवीच्या आरतीने गोंधळ संपतो. गोंधळात म्हटली जाणारी पदे, कथागीते व कथा ह्या लोकसाहित्यातीलच असतात. मीठ—मिरचीचे भांडण, मांगिणीचे शिर, कोल्ह्याचे लगीन इ. आख्याने व कथा त्यांत प्रमुख होत.
गोंधळाच्या उगमाबाबतची कथा रेणुकामाहात्म्यात दिलेली आहे. रेणुका आणि तुळजाभवानी या देवतांच्या उपासनेत गोंधळाला केव्हा प्राधान्य मिळाले, हे सांगता येत नाही. प्राचीन वाङ्मयात येणाऱ्या गोंधळाच्या उल्लेखांवरून असे दिसते, की मुळात गोंधळाचा संबंध ‘भूतमाता’ नावाच्या देवतेशी असावा व नंतर ही भूतमाता लोकप्रिय असलेल्या रेणुकेत व तुळजाभवानीत समाविष्ट झाली असावी. अनेक पुराणांतून भूतमातेच्या उत्सवाची वर्णने आढळतात. ‘गोंधळ’ हा शब्द भूतपिशाच या अर्थी ज्ञानेश्वरी, दासोपंतकृत गीतार्णव व प्रारंभीच्या महानुभाव वाङ्मयात आलेला आहे. यावरून गोंधळ हा उपासनाप्रकार सुरुवातीस भूतमातेशी संबंधित असावा असे दिसते. तसेच भूतवेश परिधान करून भूतचेष्टांचे अनुकरण करणे अशा प्रकारचे नृत्य गोंधळात केले जाई, असे काही ग्रंथांतील माहितीवरून दिसते. ‘गोंधळ’ शब्दाचे पर्याय ‘गौंडली नृत्य’, ‘गौंडली’, ‘गुंडली’, ‘कुंडली’ असेही आढळतात. गोंधळाचा कुलाचार अलीकडे कमी होत चालला आहे.
संदर्भ :
- ढेरे, रा. चिं. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.