एखाद्या देवतेच्या उत्सवासाठी अथवा एखाद्या सत्पुरुषाच्या पुण्यतिथी वा जयंती उत्सवासाठी अथवा एखाद्या तीर्थक्षेत्री वर्षातून ठराविक दिवशी वा ठराविक कालानंतर गावोगावच्या लोकांचा जो धार्मिक मेळावा जमतो, त्यास जत्रा वा यात्रा असे म्हणतात. इस्लामधर्मीय सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त जो उत्सव होतो, त्यास उरूस  वा  ‘जुलूस’ म्हणतात. त्या त्या देवतेविषयी किंवा तीर्थक्षेत्रांतील एक वा अनेक देवतांविषयी पूज्यभाव वा सत्पुरुषाविषयी आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी भाविक लोक जत्रेला येतात. देवता वा सत्पुरुष यांच्या आराधनेकरीता तेथे स्नान, दर्शन, पूजाअर्चा, श्राद्ध, भजन, क्रीडा, नृत्य, मेळा, मिरवणूक, शर्यती, भोजन इ. सत्कर्मे करतात.

जत्रेच्या काळात त्या त्या देवतेचे विशेष पूजोपचार होतात. त्यांत देवतेची रथात बसवून वा पालखीत बसवून मिरवणूक काढतात. प्रथा असेल, तर त्या देवतेचा विवाहसमारंभही जत्रेच्या काळात सर्व भक्त गणांच्या उपस्थितीत साजरा होतो. जत्रा हा प्रामुख्याने देवतेचा वा सत्पुरुषाचा धार्मिक उत्सव असल्यामुळे त्यात भाविकांनी त्या देवतेचे दर्शन घेणे, पूजोपचार करणे, नवस करणे वा फेडणे, प्रसादग्रहण करणे इ. गोष्टींना विशेष महत्त्व आहे. नवस फेडताना त्या त्या देवतेच्या सात्विक वा तामस प्रकृतीनुसार तसेच रूढ संकेतानुसार साखर, गूळ, खोबरे, मिठाई इ. वाटणे  नारळ, खण, पूजाद्रव्ये, पशु-पक्ष्यांचे बळी अर्पण करणे बगाडादी आत्मक्लेशकारक प्रकार करणे इ. प्रकारे भाविक लोक देवतेस संतुष्ट करतात. बंगालमध्ये नवरात्रात कालीस पशुबली देण्याची चाल आहे. महाराष्ट्रातही कही देवींपुढे रेडा, बोकड, कोंबडे इत्यादींचा बली देण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतातही पोलेरम्म देवीची जत्रा महत्त्वाची असून तिला रेड्याचा बली देतात. पंढरपूरच्या विठोबाची यात्रा आषाढी व कार्तिकी एकादशीस मोठ्या प्रमाणावर भरते. सर्व महाराष्ट्रातून दिंड्यासोबत वारकरी, भजनी मंडळी पायी चालत वा वाहनात बसून या जत्रेस येते. यास वारी म्हणतात. ओरीसात पुरी येथेही जगन्नाथाची मोठी  रथयात्रा  होते व तेथे सर्व भारतातून लोक जमतात. हरद्वार, प्रयाग (अलाहाबाद), उज्जैन व नासिक येथे दर बारा वर्षांनी भरणारा  कुंभमेळा  किंवा दर सहा महिन्यांनी भरणारा अर्धकुंभमेळा ह्याही भारतातील विशेष महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर लोकसमुदाय जमणाऱ्या जत्राच होत. लक्षावधी लोक ह्या कुंभमेळ्याला जमतात व पवित्र तीर्थात स्नान करतात. कुंभपर्व हे अतिशय पुण्यकारक मानले जात असल्यामुळे त्याला हिंदूच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.

जत्रेच्या ह्या प्रधान धार्मिक अंगासोबतच तिला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशीही अंगे आहेत. जत्रेत आजूबाजूच्या खेडोपाडी तयार होणाऱ्या वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होऊन, त्यांवर खेड्यांतील कारागिरांचा चरितार्थ चालतो. जत्रेत आबाल-वृद्ध, स्त्रीपुरुष सणाप्रमाणे यथाशक्ती वेशभूषा करून मोठ्या सख्येने सहभागी होऊन सामाजिक जीवनाचा उत्साहपूर्ण अनुभव घेतात. प्राचीन काळी दळणवळणाची साधने कमीच असल्यामुळे जत्रांमधून त्या त्या परिसरात तयार होणाऱ्या वस्तूंना व मालाला चांगलीच मागणी असे. म्हणूनच जत्रेलाही एक उत्कृष्ट बाजारपेठ म्हणून महत्त्व होते आणि आजही काही प्रमाणात ते आहे. कापड, भांडी कुंडी, खाद्यपदार्थ, मिठाई, बैलगाड्या व दमण्या, जनावरे, खेळणी इ. वस्तूंचा व्यापार जत्रांमधून विशेष प्रमाणावर चालतो. महाराष्ट्रातील काही जत्रा तर विशिष्ट जनावरांच्या व्यापारांसाठीच प्रसिद्ध आहेत. उदा., नगर जिल्ह्यातील कानिफनाथाची जत्रा गाढवांच्या व खेचरांच्या व्यापारांसाठी, तर नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील खंडोबाची जत्रा घोड्यांच्या व्यापारांसाठी प्रसिद्ध आहे. या जत्रेला खंडोबाची जत्रा म्हणण्याऐवजी लोक ‘घोड्याची जत्रा’ म्हणूनच ओळखतात.

जत्रांतून तमाशा, दशावतारी नाटके, कुस्त्यांचे फड, बैलगाड्यांच्या शर्यती, सर्कस, चित्रपट, आकाशपाळणे, फिरते लाकडी घोडे, जादूचे खेळ इ. करमणुकीच्या कार्यक्रमांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध स्तरांतील लोक एकत्र जमल्यामुळे त्यांच्यात होणारी विचारांची व कल्पनांची देवाणघेवाण यांमुळे त्यांचे सांस्कृतिक उद्‌बोधनही जत्रेत होते व सामाजिक एकात्मता दृढ होण्यास मदत होते.

हिंदू व्यक्तीने जसे आयुष्यात एकदा तरी काशीची यात्रा करावी असे म्हटले जाते  तसेच प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने मक्केची हाज (हज) यात्रा करावी असे म्हटले जाते. जगातील सर्वच इस्लाम–धर्मीय लोक जमेल तेव्हा हजची यात्रा करण्यात कृतकृत्यता मानतात. याशिवाय मदीना व करबला येथील यात्रांनाही इस्लाम धर्मात महत्त्व आहे. अजमीर येथील  चिश्ती ख्वाजा मुइनुद्दीन  यांच्या प्रसिद्ध उरूसास भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील मुस्लिम मोठ्या संख्येने येतात. दिल्ली येथील निजामुद्दील औलियाचा उरूसही प्रख्यात आहे. बहुतेक उरूसांत मुस्लिमांप्रमाणेच हिंदू धर्माचे लोकही मोठ्या संख्येने भाग घेतात. शीख धर्मात शीख गुरूंची जन्म व निधनस्थाने पवित्र मानली जातात व तेथे शीख धर्माचे लोक ठराविक दिवशी एकत्र जमतात. अमृतसर, नांदेड, आनंदपूर (पंजाब), पाटणा (बिहार) इ. ठिकाणचे गुरुद्वारा त्यांची पवित्र तीर्थस्थाने होत. ख्रिस्ती व ज्यू धर्मात जेरूसलेमला आगळे महत्त्व आहे. जेरूसलेमची यात्रा करणे हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे धार्मिक कर्तव्य मानले जाते. ख्रिस्ती धर्मात बेथलीएम, नाजरेथ, रोम इ. पवित्र स्थानांच्या यात्रांनाही महत्त्व आहे. बौद्ध धर्मात लुंबिनी, बोधगया (गया), सारनाथ, कुशिनगर इ. ठिकाणच्या यात्रा करणे विहित मानले जाते. जैन धर्मात तीर्थकरांची जन्म, निष्क्रमण, ज्ञान, निर्वाणादी स्थाने तसेच संमेदशिखर, मंदारगिरी, गिरनार, पावापुरी, इ. सिद्ध क्षेत्रे आणि अब्रू, शत्रुंजय पर्वत, श्रवणबेळगोळ, चंपापूर इ. पवित्र ठिकाणच्या यात्रा करणे श्रेयस्कर मानले आहे. आदिवासी लोकांतही त्यांच्या देवांच्या तसेच आदिपुरुषांच्या जयंति-पुण्यतिथीनिमित्त यात्रा भरतात.

जगातील सर्वच धर्म, पंथ, जाती, जमातींत काही ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी एकत्र जमून त्या देवतेविषयीचा, सत्पुरुषाविषयीचा, नदी, तलाव इ. जलाशयाविषयीचा वा पर्वत, ग्राम तसेच अवतारी पुरुषांच्या समाधी, जन्म-मृत्यू इत्यादिकांच्या स्थानांविषयीचा आपला आदरभाव व्यक्त करण्याची प्रवृत्ती आढळते आणि म्हणूनच जत्रा वा यात्रा ह्या सर्वच धर्मांत व समाजांत आढळतात. ह्या जत्रांच्या स्वरूपात, कर्मकांडात व जमणाऱ्या लोकसमुदायांच्या लहानमोठ्या संख्यामानात फरक पडणे स्वाभाविक आहे.

भारतातील बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर व द्वारका ही चार धामे; काशी, प्रयाग व गया ही त्रिस्थळी; अयोध्या, मथुरा, माया इ. सप्तपुऱ्या; बारा ज्योतिर्लिंगे; बावन्न  शक्तिपीठे  तसेच नेपाळातील पशुपतिनाथ दक्षिणेतील कांचीपुरम्, पक्षितीर्थ, तिरुपती, उत्तर भारतातील हरद्वार, हृषीकेश, वृंदावन, पुष्कर इ. पवित्र स्थाने होत. त्या ठिकाणी यात्रा करणे हिंदू धर्मात विशेष पुण्यप्रद मानले जाते.

भारतातील प्रत्येक प्रांतात हजारो जत्रा वर्षभर कुठेनाकुठे भरत असतात. महाराष्ट्रातही लहानमोठ्या हजारो जत्रा दरवर्षी भरतात. त्यांतील काही महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमणाऱ्या जत्रांची गावे, नावे व जिल्हे (कंसात) पुढीलप्रमाणे : पंढरपूर–श्री विठोबा (सोलापूर), आळंदी–श्रीज्ञानेश्वर (पुणे), देहू–श्री तुकाराम महाराज (पुणे), जेजुरी–श्री खंडोबा (पुणे), वाडी रत्नागिरी–श्री जोतिबा (कोल्हापूर), तुळजापूर–श्री तुळजाभवानी (उस्मानाबाद), वाडी–हाजीमलंग उरूस (ठाणे), भिवंडी–बाबा दिवाणसाहेब उरूस (ठाणे), अंबरनाथ–श्री अंबरेश्वर (ठाणे), महालक्ष्मी–श्री महालक्ष्मी (मुंबई), वडाळा–श्री विठोबा (मुंबई), माहीम–हजरत मख्दुम फकीर अलीसाहेब उरूस (मुंबई), वांद्रे–माऊंट मेरी (मुंबई), सप्तशृंगगड–श्री सप्तशृंगीदेवी (नासिक), त्र्यंबकेश्वर–श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (नासिक), नासिक–श्रीरामनवमी व रथोत्सव (नासिक), तळोदा–श्री कालिकादेवी (धुळे), कोथली–श्री मुक्ताबाई (जळगाव), शिर्डी–श्री साईबाबा (नगर), मढ–श्री कानिफनाथ (नगर), करंजा–श्री सोमेश्वर (पुणे), वीर–श्री नाथ म्हस्कोबा महाराज (पुणे), मांढरदेव–श्री काळुबाई (सातारा), शिंगणापूर–श्री शंभुमहादेव (सातारा), पाली–श्री खंडोबा (सातारा), खरसुंडी–श्री सिद्धनाथ (सांगली), जत–श्री यल्लमादेवी (सांगली), वैराग–संत नाथ (सोलापूर), मोहोळ–श्री नागनाथ (सोलापूर), सोलापूर–श्री गद्दा (सोलापूर), पैठण–श्री नाथ षष्टी (औरंगाबाद), औंढा–श्री नागनाथ (परभणी), परभणी–शाह तुराब उल् हक उरूस (परभणी), परळी–श्री परळी वैजनाथ (बीड), माहूर–श्री दत्त (नांदेड), मालेगाव–श्री खंडोबा (नांदेड), धानोरा–श्री महासिद्ध बाबा (बुलढाणा), देऊळगाव राजा–श्री बालाजी (बुलढाणा), लोणी–श्री सखाराम महाराज (अकोला), बहेरम–श्री बहिरम (अमरावती), सालबर्डी–श्री महादेव (अमरावती), कौंडिण्यपूर–श्री विठ्ठल–रुक्मिणी (अमरावती), वणी–श्री रंगनाथस्वामी (यवतमाळ), कापसी–श्री नानाजीमहाराज (वर्धा), रामटेक–श्रीराम (नागपूर) इत्यादी.

संदर्भ : 

  • Government of India, Census of India, 1861, Vol. X, Part VII-B, Fairs and Festivals of Maharashtra, Delhi, 1969.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा