पठ्ठे बापूराव : (११ नोव्हेंबर १८६६–२२ डिसेंबर १९४५).प्रसिद्ध मराठी शाहीर. मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सांगली) ह्या गावी. शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत. बापूराव ब्राह्मण असून त्यांच्याकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होता ; परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. त्यांच्या फडात पवळा नावाची, महार जातीची एक सुंदर स्त्री होती. तिच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत (१९५८).तथापि त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात. बापूरावांच्या आयुष्यातून पवळा निघून गेल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला. पुणे येथे ते निधन पावले.
- Post published:29/07/2019
- Post author:म. वा. धोंड
- Post category:लोकसाहित्य - लोकसंस्कृती
- Post comments:0 Comments
Tags: मराठी शाहीर