देवताविश्वातील एक शिवगण. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. महाभारत, पुराणे इ. प्राचीन साहित्यातून वेताळाची जी वर्णने आढळतात, त्यांनुसार तो क्रूर डोळ्यांचा आणि महाकाय आहे. तो रक्तमांस खातो सदैव युद्धोद्यत आणि शस्त्रधारी असतो. वेताळाची आई ही स्कंदानुचारी मातृका असून स्वतः वेताळही स्कंदानुचर आहे, असे निर्देश आढळतात. भागवत, मत्स्यपुराण आणि ब्रह्मांडपुराण ह्यांनी मात्र त्याला स्कंदानुचर न म्हणता शिवगण म्हटले आहे. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ही त्याची पर्यायी नावे त्याचे उग्र गुणविशेष दर्शवितात. शिवपुराण शतरुद्रसंहितेत म्हटले आहे, की वेताळ हा मुळात शंकरपार्वतीचा द्वारपाल होता. एकदा दारापाशी आलेल्या पार्वतीला त्याने दाराबाहेर येण्यास अटकाव केला, म्हणून ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप तिने त्याला दिला. तेव्हा वेताळरुपाने तो पृथ्वीवर आला. कालिकापुराणात म्हटले आहे, की वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा एक शिवदूत होता. महाकाल नावाचा त्याचा एक भाऊ होता. पार्वतीने शापिल्यामुळे ह्या दोघांनी पृथ्वीवर अनुक्रमे वेताळ व भैरव म्हणून चंद्रशेखर राजाची राणी तारावती हिच्या पोटी जन्म घेतला. तथापि हे दोघे चंद्रशेखराचे औरस पुत्र नव्हते. ते तारावतीला शंकरापासून झाले होते. चंद्रशेखर हा त्यांचा पालक-पिता होता. चंद्रशेखराने आपली सर्व संपत्ती आपल्या औरस पुत्रांमध्येच वाटून टाकली. त्यामुळे वेताळ व भैरव हे तप करण्यासाठी अरण्यात गेले. पुढे वसिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शिवाचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने त्यांना शिवगणात स्थान मिळाले.
अनेक गावांत एक ग्रामदेवता म्हणून वेताळाची पूजाअर्चा केली जाते. वेताळाच्या मूर्ती काष्ठाच्या वा पाषाणाच्या असतात. काही ठिकाणी तो तांदळ्याच्या स्वरुपातही आढळतो. हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन वेताळ मध्यरात्री गावातून हिंडतो, असा खेडोपाडी समज आहे. ह्या भ्रमंतीमुळे त्याचा वहाणा झिजतात म्हणून वेताळाला दरमहा नव्या वहाणा अर्पण करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते. वैशाख, मार्गशीष आणि माघ महिन्यांत वेताळाचे उत्सव व जत्रा होतात.