एक आसनप्रकार. ‘मकर’ या शब्दाचा अर्थ मगर. ज्याप्रमाणे मगर पाण्यातून बाहेर येऊन किनाऱ्यावरील वाळूत पोटावर शांत पडून राहते, त्याप्रमाणे या आसनामध्ये संपूर्ण शरीराचा आकार मकराकृती भासतो व विश्रांतीला उपयुक्त ठरतो म्हणून या आसनाला मकरासन हे नाव दिले आहे. घेरण्डसंहितेत या आसनाची कृती संक्षिप्त स्वरूपात दिलेली आहे. मात्र हठप्रदीपिकेत या आसनाचा उल्लेख नाही.

कृती : जमिनीवरील आसनावर पालथे झोपावे. दोन्ही पाय पसरून त्यात साधारण २ फुटांचे अंतर ठेवावे. हात शरीराच्या बाजूला ठेवावेत. पायांची बोटे व पावले बाहेरच्या दिशेने राहतील. डाव्या हाताचा पंजा उजव्या काखेखालून न्यावा व तो उजव्या खांद्यावर ठेवावा. उजव्या हाताचा पंजा डाव्या हातावरून नेऊन डाव्या खांद्यावर ठेवावा. असे केले असता दोन्ही कोपरे डाव्यावर उजवा अशी एकमेकांवर येतील. त्यावर कपाळ टेकवावे. शांत पडून सर्व शरीर शिथिल ठेवावे. शरीराच्या कोणत्याही भागावर अनावश्यक ताण येणार नाही ते पहावे.

या स्थितीत छातीचा वरचा भाग किंचित वर उचललेला असतो. पायांमधील अंतर सुमारे तीन ते साडेतीन फुटांपर्यंत वाढवावे. डोळे मिटून शांतपणे विश्रांती घ्यावी. शरीराचे शिथिलीकरण अधिक व्हावे असे वाटत असेल तर कंबर व नितंब श्वसनामुळे वर खाली होत असतात, त्याकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे. याप्रमाणे या आसनात शरीराचे शिथिलीकरण १० मिनिटांपर्यंत साधता येते. आसन सोडताना क्रमाक्रमाने हात मोकळे करावेत. पाय एकत्र आणावेत. डोळे उघडावेत आणि हातांच्या आधारे उठून बसावे.

लाभ : मकरासनामुळे शरीराची उष्णता वाढते. या आसनात मेरुदंडाचा वरचा भाग मागे ताणला जातो, म्हणून मानेचा त्रास तसेच पाठदुखी असलेल्यांना या आसनाचा निश्चित लाभ होतो. श्वसनाच्या हालचालीमुळे नाभिप्रदेशावर (बेंबीवर) ॠण व धन दाब पडतात. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. या आसनात कटिप्रदेशाला (कमरेच्या भागाला) विशेष उत्तेजन मिळते, म्हणून लैंगिक समस्या असणाऱ्यांना हे आसन विशेष फायद्याचे आहे. कमी रक्तदाब असेल किंवा छातीत धडधड होत असेल, तर मकरासन करणे श्रेयस्कर ठरते. या आसनामुळे शरीराबरोबर मनाचेही शिथिलीकरण होते. साधकाला साधारणपणे २-३ मिनिटांत ताजेतवाने व उत्साहित वाटते.

विधिनिषेध : कोपरे एकमेकांवर ठेवणे शक्य होत नसेल तर हातांची सोपी आणि सुखकारक अशी रचना करून त्यावर कपाळ किंवा हनुवटी टेकवावी. कोपरांच्या खाली लहान वस्त्राची नरम घडी ठेवली तर कोपरे दुखत नाहीत. पोट मोठे असेल तर हे आसन करणे कठीण जाते. खांदे, मान, कंबर यांत तीव्र वेदना होत असतील, तसेच अंतर्गळ (Hernia) हा विकार असेल तर हे आसन करू नये.

पहा : शवासन.

 

 

समीक्षक – साबीर शेख

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा