नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. राम, कृष्ण, दत्त, खंडोबा इ. देवतांचेही नवरात्र-उत्सव असतात परंतु देवीच्या शारदीय नवरात्राचा उत्सव भारताच्या बहुतेक सर्व भागांत रूढ आहे.

नवरात्राचा उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. दुर्गा किंवा काली ही ज्याप्रमाणे ब्राह्मणांची कुलदेवता आहे, त्याप्रमाणे अनेक क्षत्रियांचीही कुलदेवता आहे. देवीच्या देवळातून सार्वजनिक रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करतात. लहानशा मातीच्या ढिगावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. कित्येक ठिकाणी घटावर तांत्रिक यंत्राचीही स्थापना करतात. नऊ दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालणे इ. विविध आचार वेगवेगळ्या कुळांत पाळले जातात.

दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी दुर्गेची महालक्ष्मीस्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्त्वाची रूपे आहेत. बंगालमध्ये काली देवीचे उपासक अधिक आहेत त्यामुळे तेथे हा नवरात्र-उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. या उत्सवास दुर्गापूजा वा पूजा-उत्सव म्हणतात. नवरात्रोत्सवाची समाप्ती नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी करतात. कित्येक ठिकाणी भाद्रपद वद्य अष्टमीपासूनही या उत्सवास सुरुवात होते.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा