जगातील सर्वच प्राथमिक धर्मांमध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते. भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे.वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात असावी. मोहें-जो-दडो येथील उत्खननातही नागमूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते.ऋग्वेदात नागाचा उल्लेख ‘अहि’ या शब्दाने केला असून तेथे त्याचे क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केले आहे. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले, तर त्यापासून भय राहणार नाही,या कल्पनेने यजुर्वेदात (१३·६–८) नागस्तुतिपर मंत्र आढळतात.नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात (३·६·२) नागमाता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे. सर्पवेद या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे.त्यात सर्पांचे विष उतरविण्यासाठी,त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत.कर्कोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे,असे एका प्रसिद्ध श्लोकात म्हटले आहे.नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबली,नागबली इ. विधी गृह्यसूत्रांमध्ये सांगितले आहेत. अशा प्रकारे नागांपासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली.
पौराणिक धर्मात प्रमुख स्थान मिळालेल्या शिव व विष्णू या दोन्ही देवतांशी नागांचा संबंध जोडला गेला. शिवाच्या गळ्यात व मस्तकावर नाग असतो, तर विष्णू शेष नावाच्या नागावर शयन करतो.त्यामुळे या दोन्ही देवतांच्या सर्व प्रकारच्या पूजाविधींमध्ये नागाची पूजा विहित आहे.बौद्ध व जैन धर्मांमध्ये नागांना महत्त्वाचे स्थान मिळाले असून त्यांसंबंधीच्या अनेक कथा त्या धर्मांच्या वाङ्मयात आढळून येतात. बुद्धाच्या जन्मानंतर नंद व उपनंद नावाच्या नागांनी त्याला स्नान घातले, अशी एक कथा आहे.जैन तीर्थंकर पार्श्वनाथ याला संकटातून वाचविण्यासाठी नागाने ज्या ठिकाणी त्याच्यावर फणा धरला,त्या स्थानाला अहिच्छत्रा असे नाव पडले.
भारतीय पौराणिक कथांनुसार नाग हे कश्यप व कद्रू यांचे पुत्र होत. नागांमध्ये अनंत, वासुकी, शेष यांसारखे काही नाग सौम्य मानले आहेत, तर तक्षक, कर्कोटक, कालिय यांसारख्या काही नागांना क्रूर समजले जाते. या सर्वांचा समावेश नागपूजेत होतो.निरनिराळ्या प्रांतांत नागपूजेचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात.बंगालमध्ये नागदेवता मनसादेवी हिची पूजा प्रचलित आहे. ओरिसात अनंताची पूजा करतात. केरळात काही लोकांच्या घरात ‘सर्पकावू’ नावाची स्वतंत्र जागा असते. तेथे नागप्रतिमा ठेवतात व वर्षातून एकदा तिची पूजा करतात.पंजाबातील सफीदोन हे महत्त्वाचे नागपूजाक्षेत्र असून तेथेच जनमेजयाने सर्पसत्र केल्याचे सांगतात.उत्तर भारतात तसेच छत्तीसगढ, बिलासपूर, भूज इ. ठिकाणी नागांची स्वतंत्र मंदिरेच आढळतात. नागपंचमी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी वारुळाला जाऊन नागाची पूजा करतात. यासंबंधीची अनेक लोकगीते महाराष्ट्रात रूढ आहेत. नागपंचमीला प्रत्यक्ष नागाचीही पूजा करतात. गारुडी लोक टोपल्यांत ठेवलेले नाग दारोदार फिरवितात. ‘नागस्तोत्र’ या नावाचे एक स्तोत्रही आहे. सकाळी व संध्याकाळी या स्तोत्राचा जो पाठ करतो, त्याला विषबाधा होत नाही, असे सांगितले आहे.
पाय व पंख नसताना हालचाल करणे, कात टाकणे, भेदक दृष्टीने पाहणे, चपळाईने क्षणात नाहीसे होणे या सापाच्या काही वैशिष्ट्यांबद्दल जगातील सर्वच लोकांना फार कुतूहल वाटत होते. यांतूनच सापांसंबंधी वेगवेगळ्या समजुती जगभर प्रचलित झाल्या. साप बिळात राहतो म्हणून तो भूमिगत धनाचा स्वामी आहे, असे मानले जाते. साप हा देवाचे प्रतीक आहे, ही कल्पना जपान, चीन इ. देशांत रूढ आहे. घरे, पूजास्थाने, थडगी यांचे रक्षण साप करीत असल्यामुळे ग्रीसमध्ये अशा ठिकाणी सापाच्या मूर्ती ठेवत. मृतात्मे हे सापाच्या रूपात घरामध्ये वावरतात, अशीही समजूत आहे. सापाला वार्धक्य येत नाही, तो लहान मुलांना त्रास देत नाही, ग्रहणाच्या वेळी तो सूर्याला ग्रासून टाकतो, त्याला दूध फार आवडते यांसारख्या अनेक समजुती वेगवेगळ्या समाजांत प्रचलित आहेत. साप पाण्यात राहतो यासंबंधीच्या अनेक कथा बॅबिलोनिया, ग्रीस, भारत इ. देशांतील प्राचीन वाङ्मयात आढळतात. या कथांचे साम्य कृष्ण व कालिय यांच्या कथेशी दिसून येते. अमेरिकेतील काही जमातींत सापाची प्रत्यक्ष पूजा केली जाते.
नागपूजक अशा एका अनार्य जातीलाही नाग वा नागा असे म्हणत. अशा नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी अर्जुनाने विवाह केला होता, असे महाभारतात (१·२१४) म्हटले आहे. आस्तिक नावाच्या ऋषीची आई नाग वंशातील होती. त्याने आर्य व नागलोक यांच्यातील संघर्ष मिटविला व नागलोकात प्रचलित असलेली नागपूजा आर्यांनी स्वीकारावयास लावली. तेव्हापासून नागपूजा प्राचारात आली, अशी कथा रूढ आहे. म्हणून साप व नाग यांपासून भय वाटत असेल, तर आस्तिक ऋषीचे स्मरण करतात.
संदर्भ :
- Deane, J. B. The Worship of Serpent traced throughout the World, London, 1833.
- Fergusson, J. Tree and Serpent Worship, London, 1868.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.