माघ शु. सप्तमीला केले जाणारे हिंदूंचे एक सौर व्रत. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. शिवाय, मन्वंतराच्या प्रारंभी याच तिथीला सूर्याला रथ प्राप्त झाल्यामुळे हिला रथसप्तमी म्हणतात, अशी समजूत आहे. रथ म्हणजे रथस्थ सूर्य,असा अर्थ येथे अभिप्रेत असण्याची शक्यता आहे. कारण, रथ या शब्दाचा ‘वीर’ वा ‘योद्धा’ असाही अर्थ होतो. सूर्योपासनेमध्ये रथ ह्या संज्ञेला महत्त्वाचे स्थान आहे, एवढे मात्र नक्की. रथस्थ सूर्याचे चित्र काढणे, रथाची पूजा व दान करणे इ. व्रताचरणांवरून हे स्पष्ट होते.दक्षिणायनात रथहीन झालेला सूर्य उत्तरायणात रथस्थ होतो,अशी समजूत दिसते.शिवाय, सूर्यबिंबाचे रथचक्राशी साम्य असल्यामुळेच सूर्याचा रथ एकचाकी असल्याची पुराणकथा तयार झाली आहे. या पुराणकथेतून सूर्य व रथ यांचे तादात्म्य सूचित होते. तसेच, रथ वा रथाचे चाक हे सूर्याचे प्रतीक असल्याचेही सूचित होते. रथसप्तमीची भानुसप्तमी,भास्करसप्तमी, रथांकसप्तमी व रथांगसप्तमी ही नावे हेच दर्शवितात.भारतात सर्वत्र या व्रतानिमित्त सूर्योपासना केली जाते परंतु वेगवेगळ्या प्रांतांत व्रताचे नाव व व्रताचरणाचा तपशील या बाबतींत फरक पडतो. अचला, जयंती, माकरी, माघ, महा इ. नावांनी ही सप्तमी ओळखली जाते. ती रविवारी येत असेल तर विजया आणि त्या तिथीला सूर्याचे संक्रमण येत असेल तर महाजया म्हटली जाते.

महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात.षष्ठीला एकभुक्त्त राहून व्रताचा संकल्प करणे,सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजविलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखविणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ऊतू जाऊ देणे हे व्रताचे स्थूल स्वरूप असते.हळदीकुंकू व वायने वाटणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अनध्याय असतो आणि रात्री गायन,वादन,दीपोत्सव इ. कार्यक्रम असतात. वर्षभर सूर्योपासनेचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी, मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघसप्तमी, मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचलासप्तमी इत्यादींप्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान, असे काहींचे मत आहे. सर्व रोगांतून व पापांतून मुक्त्तता आणि सौभाग्य, पुत्र, धन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते. कंबोजच्या यशोधर्म राजाने हे व्रत केल्यामुळे त्याचा पुत्र रोगमुक्त्त झाल्याची कथा प्रसिद्ध आहे.

संदर्भ :

  • Kane, P. V. History of Dharmashastra, Vol. V. Part 1, Pune, 1974.
  • ‘ऋग्वेदी’, आर्यांच्या सणांचा प्राचीन अर्वाचीन इतिहास, वाई, १९७९.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा