प्रभाकर : (१७६९?–१८४३). मराठी शाहीर. संपूर्ण नाव प्रभाकर जनार्दन दातार. मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे. काही काळ नासिकजवळील गंगापुरास त्यांच्या वडिलांचे वास्तव्य होते, तेथेच त्यांचा जन्म व विवाह झाला. पुढे हे कुटुंब पुण्यास स्थायिक झाले. पुण्यास त्यांचे  वडील पेशव्यांकडे कारकून होते आणि ते स्वतः रास्त्यांकडे कारकून होते. तेथून ते गंगू हैबती ह्या शाहिराच्या फडात शिरले. सवाई माधवरावांच्या काळात त्यांची लोकप्रियता पेशवे दरबारी वाढीस लागली आणि दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत ती कळसास पोहोचली. प्रभाकराला दुसऱ्या बाजीरावाचा आश्रय होता. बाजीरावाच्या विलासावर ह्यांच्या  ३०–४० लावण्या उपलब्ध आहेत. त्यांच्या लावण्या मुख्यतः शृंगारिक असेन कमालीच्या अश्लील आहेत. मार्मिक शब्दयोजना, रेखीव रचना आणि चित्तवेधक वर्णनशैली ही प्रभाकराच्या कवनांची वैशिष्ट्ये उल्लेखनीय असली, तरी त्यांत जिव्हाळा काहीसा कमीच आहे. पौराणिक कथांवर व देवदेवतांवरही–उदा., पंढरपूरच्या विठोबावर–त्यांनी  कवने रचिली आहेत. मात्र ह्या रचना आध्यात्मिक अंगाने केल्याचे दिसत नाही. प्रभाकराने विपुल पोवाडे रचिले आहेत. पेशवाईसंबंधी त्यांना  आपुलकी आणि निष्ठा वाटत होती. त्यामुळे खर्ड्याची लढाई, रंगाचा दरबार, सवाई माधवरावाचा मृत्यू, बाजीरावाचा राज्यनाश इ. विषयांवरील त्यांचे  पोवाडे अत्यंत सरस झालेले आहेत. पेशवाईच्या अस्तानंतर त्यांची  स्थिती अत्यंत हलाखीची झाली आणि ह्या काळात पोट भरण्यासाठी त्याने मुंबईतील शेठसावकार व अधिकारी ह्यांच्यावरही पोवाडे रचिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा