बाबर, सरोजिनी : (७ जानेवारी १९२०‒२० एप्रिल २००८). मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक. जन्म बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) या गावी, कृष्णराव आणि गंगुबाई या दांपत्यापोटी झाला. कृष्णराव बाबर हे शिक्षण खात्यात नोकरीला होते. नोकरी फिरतीची होती. त्यामुळे सरोजिनींचे शिक्षण एका ठिकाणी न होता, इस्लामपूर, सातारा, अहमदनगर, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमधून झाले.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा काळ १९४०‒४२ चा, स्वातंत्र्ययुध्दाने भारलेला काळ. श्री. म. माटे यांच्यासारख्या उदारमतवादी शिक्षकांच्या छत्रछायेत शिक्षण घेताघेता तरण सरोजिनी स्वातंत्र्य चळवळीकडे ओढल्या गेल्या. राजकीय आंदोलनातल्या त्यांच्या सक्रिय सहभागाचा परिणाम त्यांना अटक होण्यातही झाला. मात्र स्वातंत्र्य संग्रामातल्या सहभागानंतरही त्यांनी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. बी.ए.च्या परिक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
वडील नोकरीनिमित्त कायम फिरतीवर असायचे. घरी लहान दोन बहिणी, शिवाय सर्वांत धाकटा भाऊ जवाहर बालपणीच मृत्यू पावल्यामुळे कायम दुःखी असलेली आई,अशा हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी घवघवीत यश मिळवून त्या पुढे बी.टी. झाल्या, आणि शिवाजी मराठा संस्थेच्या जिजामाता हायस्कुलमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.उच्च शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी अल्पकाळातच नोकरी सोडली आणि पुणे विद्यापीठात एम.ए.ची पदवी मिळवण्याकरिता त्या दाखल झाल्या.
एम.ए. तर त्या झाल्याच, पण पुढे पीएच.डी.ही झाल्या. ही पदवी प्राप्त करणाऱ्या त्या काळात मराठा समाजातली पहिल्या महिला होत. पुढे याच पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स-डी.लिट. ही सर्वोच्च बहुमानाची पदवी दिली आणि जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. दिली, तर राहुरी कृषी विद्यापीठाने डी.एस.सी. पदवी त्यांना प्रदान केली आहे.
शिक्षणक्षेत्रात अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करीत असतानाच त्या राजकारणात उतरल्या. सन १९५२ ते १९५७ या कालखंडात त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. सन १९६३ ते १९६६ या काळात त्या विधानपरिषदेवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या, तर सन १९६८ ते १९७४ या कालखंडात त्या राज्यसभा सदस्य होत्या.
८८ वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. शेवटची दीर्घ आजाराची काही वर्ष वगळता जवळजवळ पाऊण शतकाचा काळ त्या उद्योगरत होत्या. सन १९६१ ते १९९३ एवढा दीर्घकाळ त्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा होत्या. समितीच्या स्थापनेपासून त्यांना मिळालेला अध्यक्षपदाचा ३२ वर्षांचा काळ त्यांनी लोकसाहित्याचे संकलन-संपादन करण्यासाठी घालविला. डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, वामनराव चोरघडे असे लोकपरंपरेचे जाणते अभ्यासक या कालावधीत काहीकाळ लोकसाहित्य समितीचे साहाय्यक-सल्लागार झाले होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, दुर्गाताई देशमुख यांनी स्थापना केलेली अखिल भारतीय समाजकल्याण समिती, पुणे विद्यापीठ अधिसभा, नामदेवगाथा समिती, पुणे आकाशवाणीची सल्लागार समिती अशा वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले. पुणे मराठी ग्रंथालयाशीही त्यांचा निकटचा संबध राहिला. मराठी साहित्य परिषदेच्या त्या काहीकाळ अध्यक्षही होत्या.
त्यांची लोकसाहित्याची संपादने ग्रंथरूपाने प्रसिध्द आहेतच, पण समाजशिक्षणमालेची २७० संपादनेही त्यांच्या संपादनकार्यात समाविष्ट आहेत. समाजशिक्षणमाला ही त्यांचे वडील कृ. भा. बाबर यांनी सुरू केलेली पुस्तकमाला सर्वपरिचित आहे. शिक्षण, समाजकारण, लोकसाहित्य इत्यादी क्षेत्रांतली २८० लहानलहान पुस्तके या मालेद्वारे त्यांच्या वडिलांनी प्रसिध्द केली. प्रारंभापासूनच वडिलांना त्यांच्या लेखनकामात साहाय्य करणाऱ्या सरोजिनीबाईंनी वडिलांच्या निधनांतर २७० पुस्तकांची मालेत भर घातली. याशिवाय मी पाहिलेले यशवंतराव आणि वसंतदादा पाटील गौरवग्रंथ या दोन ग्रंथांची संपादने त्यांच्या नावे आहेत. कुमारवयीन मुलांसाठीही त्यांनी काही सहसंपादने केली होती.
कथा, कादंबऱ्या बालवाङ्मय इ. वाङ्मयप्रकारांचे त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केले आहे. ७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २६ ललितलेखसंग्रह, २ कवितासंग्रह आणि ४ नाट्यवाङ्मयाची पुस्तके आणि आत्मचरित्र अशी ५१ स्वतंत्र पुस्तके त्यांच्या ३०७ संपादित पुस्तकांच्या जोडीला ठेवली, तर त्यांच्या ग्रंथांची एकूण संख्या ३५८ आहे. याशिवाय ‘रानजाई’ या नावाने त्यांनी शांता शेळके यांच्यासह केलेली दूरदर्शन मालिकाही लोकसाहित्याकडे जनसामान्यांचे लक्ष वेधण्यात महत्त्वाची ठरली.त्यांची लोकसाहित्यविषयक महत्त्वाची संपादने अशी : एक होता राजा, दसरा-दिवाळी, जनलोकांचा साम्यवेद, साजाशिणगार, मराठीतील स्त्रीधन, वनिता सारस्वत, बाळराजे, कुलदैवत, राजाविलासी केवडा, लोकसंगीत, समाजशिक्षणमालेतील लोकसाहित्यविषयक पुस्तिका.
त्यांच्या ग्रंथसंपादनासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यांपैकी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, भद्रकाली ताराराणी पुरस्कार, गुरूवर्य बाबुराव जगताप पुरस्कार, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, पठ्ठे बापुराव पुरस्कार यांच्या जोडीला मराठा सेवा संघ विश्व गौरव पुरस्कार त्यांना मिळाला.
महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या कार्याला दिशा देऊन लोकसाहित्याच्या संकलनाचे भरीव काम त्यांनी केले आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासाचे महत्त्व त्यांच्या कामातूनच शासकीय आणि सामाजिक पातळीवर अधोरेखित झाले आणि या अभ्यासाला जनमानसात प्रतिष्ठा प्राप्त झाली. अनेक अभ्यासकांसाठी लोकसाहित्य संपादनाचे हे दस्तावेजीकरण मौलिक ठरले आहे.
दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
आक्कांवरील अप्रतिम लेख…! 👌👌👍👍🙏🙏