पर्यावरणाने निवड केल्यानंतर आपले वेगळे अस्तित्व टिकवून धरणारा जातीसमूह त्याच जातीच्या उपजातीप्रमाणे मानतात. अशा जातीसमूहाला परिरूप म्हणतात. एकाच जातीची, वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये निर्माण झालेली त्यांची जनुकीय परिरूपे वेगवेगळी असतात. ही रूपे अक्षांश-रेखांश, अन्य जीवांमुळे होणारा ताण, स्थानिक मातीची गुणवत्ता, उपलब्ध प्रकाशाची तीव्रता, पाण्याबरोबरचे नाते, निरनिराळ्या उंचीवरील अधिवास, इत्यादींमधील फरकांना अनुसरून झालेले अलगीकरण, उत्परिवर्तन किंवा संकर यांमुळे निर्माण होतात. यांची बाह्य रूपे विभिन्न असतात. त्याच जातीच्या दुसऱ्या परिरूपाशी संकरणक्षम असली तरी ती परिरूपे जनुकीय अदलाबदल करू शकत नाहीत. बदललेले बाह्य रूप, बदललेल्या जैविक क्रिया, यांमुळे परिरूपे निराळ्या पर्यावरणाशी जुळवून घेतात, पण त्यांची बाह्य रूपे बदलत नाहीत. उदा., दुधी (Euphorbia thymifolia), टाकळा (Cassia tora), ओसारी (Aegiratum conyzoides), अंजन घास (Cenchrus ciliaris).
रामकृष्णन यांनी १९६० मध्ये दुधीच्या एका प्रकारामध्ये लाल व हिरव्या रंगांची दोन परिरूपे आहेत हे दाखविले. लाल परिरूपे (Calcicole) चुना असलेल्या व नसलेल्या दोन्ही जमिनीवर वाढतात, त्यात चुना सहन करणारी जनुके असतात. हिरव्या परिरूपात (Calcifuge) मात्र या जनुकाची जोडी अप्रकट असल्यामुळे चुनामिश्रीत जमिनीवर ती वाढू शकत नाही.चुनामिश्रीत मातीवर वाढणारे लिंडेनबर्गिया पॉलिअँथा आणि ती माती सहन न करणारी लिंडेनबर्गिया आर्टिसीफॉलिया (L. urticaefolia) या दोन जाती पूर्वीच्या वर्गीकरणाप्रमाणे वेगवेगळ्या समजल्या जात असत. प्रयोगांती या दोन वेगवेगळ्या जाती नसून एकाच जातीची दोन परिरूपे आहेत असे मिस्रा व शिवा राव यांनी १९४८ मध्ये दाखविले. ही दोनही परिरूपे आता लि. इंडिका (L. indica) या जातीच्या नावाने ओळखली जातात.
एखाद्या जातीची वेगवेगळी परिरूपे ओळखण्यासाठी अनेक निरीक्षणे व प्रयोग करणे जरुरीचे असते. बाह्य अवयवांचे (Morphology) निरीक्षण, गुणसूत्रांचा अभ्यास (Cytological behaviour), संकरण (Breeding experiments), एकमेकांच्या अधिवासात लागवड (Transplantation in reciprocal habitats), असे प्रयोग केले जातात.
परिरूपांची वैशिष्ट्ये : १) प्रत्येक परीरुपाचा अधिवास वेगळा असतो, २) परीरुपाची जनुकीय रचना कायमस्वरूपी असते, ३) दोन परीरुपांमधील फरक स्पष्ट असून ते ठळकपणे दिसून येतात, ४) एकाच जातीच्या दोन परीरुपांमध्ये जनुकीय फरक असला तरी संकर होऊ शकतो, ५) हे फरक केवळ पर्यावरणातील फरकांमुळेच होतात असे नाही, तर त्या त्या पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेल्या नैसर्गिक निवडीमुळे होतात. फरक होताना उत्परिवर्तन, संकर किंवा गुणसूत्रे यात बदल होऊ शकतात.
परिरूपांचे महत्त्व : १) वेगवेगळ्या अधिवासात वाढणार्या महत्त्वाच्या वनस्पती जातींची लागवड करण्यासाठी परिरूपांचा उपयोग होतो, २) अधिवासानुसार होणारे बदल त्या वनस्पती जातीच्या उत्क्रांतीसाठी मदत करतात.
परिरूपे ओळखण्याच्या पद्धती : परिरूपे ओळखण्यासाठी काही प्रयोग करतात. १) वनस्पतींच्या जातींच्या अवयवांचे वर्णन, २) त्यांचे संख्याशास्त्राप्रमाणे अँडर्सन स्कॅटर आकृतीच्या (Andersan’s scatter diagram) मदतीने विश्लेषण, ३) पेशीशास्त्रीय वागणूक, ४) दोन्ही जाती एकाच अथवा एकमेकांच्या अधिवासात वाढविणे, आणि ५) दोन्ही जातींमध्ये संकर करणे.
संदर्भ :
- http://www.biologydiscussion.com/ecology/gene-ecology-ecological-genetics-of-population/6758
- epgp.inflibnet.ac.in/epgpdata/…/5905-et-21-biosystematics-et.pdf
भाषांतरकार – शरद चाफेकर
समीक्षक – बाळ फोंडके