व्यक्तीचे सौंदर्य व मोहकता वाढविणे आणि सर्वसाधारणपणे व्यक्तीमत्त्वात सुधारणा करणे यांसाठी खासकरून तयार केलेल्या द्रव्यांना किंवा पदार्थांना सौंदर्यप्रसाधने म्हणतात. कालानुरूप सौंदर्यप्रसाधने व त्यातील घटक पदार्थ यामध्ये तसेच त्यांच्या वापरामध्ये बदल होत गेले आहेत. सध्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे सौंदर्यप्रसाधनविषयक शास्त्रांत अनेक संशोधने चालू आहेत. त्यामुळे नैसर्गिक (वनस्पतिज, प्राणिज इ.) सौंदर्यप्रसाधनांप्रमाणे आता अब्जांश सौंदर्यप्रसाधनांचा वापर ही सामान्य बाब झाली आहे. प्राचीन काळी सौंदर्यप्रसाधनांमध्ये अब्जांश कणांचा वापर होत असल्याचे सबळ पुरावे जगाच्या विविध भागांत सापडतात. सुमारे ४००० वर्षांपूर्वी ईजिप्तमधील लोक अब्जांश तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने तयार करीत होते. यामध्ये ऑलिव्ह तेल (Olive oil), मेण, मेंदी, गुलाबपाणी अशा पदार्थांमध्ये जस्त व लोह या खनिजांचे अतिसूक्ष्म कण मिसळून त्या मिश्रणाचा वापर केस रंगवणे, डोळ्याचे प्रसाधन, त्वचेचे प्रसाधन इत्यादींसाठी करत.
मूलद्रव्याचे अब्जांश कणामध्ये रूपांतर होताच त्यांच्या रंग, विद्राव्यता, पारदर्शकता, रासायनिक विक्रियाशीलता इत्यादी गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. अशा कणांच्या वापरामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते. हे कण त्वचेमध्ये जास्त खोलवर पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांचा प्रभावही जास्त काळ टिकून राहतो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये टिटॅनियम ऑक्साइड व जस्त ऑक्साइड यांच्या अब्जांश कणांचा वापर वातावरणातील अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याकरिता होतो, तर चांदीच्या अब्जांश कणांच्या सूक्ष्मजीव प्रतिबंधक गुणधर्मामुळे दंतरबडी, दंतमंजन, शांपू यांमध्ये त्यांचा वापर केला जातो. तसेच केसातील कोंडा, त्वचेवरील सुरकुत्या इ. समस्यांवर उपाय म्हणून वापरात येणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमध्येदेखील त्यांचा वापर केला जातो. याव्यतीरिक्त सोने, तांबे, ॲल्युमिनियम इत्यादी धातूंचे अब्जांश कणसुद्धा वापरात आहेत. शरीरावर शिंपडली जाणारी विविध प्रकारची सुगंधी द्रव्ये (Body spray, Deodorant, Perfume etc.), ओष्ठशलाका (Lipstick), केस व नखे ह्यासाठीची रंगद्रव्ये (Hair dye, Nail polish), त्वचेच्या सुरकुत्या कमी करून तिची लवचिकता वाढविणारी औषधे, विविध प्रकारची सौंदर्यवर्धक धावन द्रवे (Creams and lotions) इत्यादी उत्पादनांमध्ये अब्जांश कणांचा वापर केला जातो. नववधूसाठी वापरण्यात येणाऱ्या अब्जांश सौंदर्यप्रसाधनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अब्जांश सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे व्यक्तिमत्व आकर्षक दिसते. यामुळे अशा उत्पादनांना खूप मागणी असते.
याशिवाय पुष्कळ अब्जांश वाहकांची निर्मिती सौंदर्यप्रसाधनातील मुख्य घटकपदार्थ योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी करतात. असेंद्रिय पदार्थ, पॉलीमर्स आणि मेदाम्ल वापरून तयार केलेल्या अब्जांशनलिका, अब्जांश कण, अब्जांश-इमल्श्न (Nano-emulsion), अब्जांश-वेष्टने (Nanocapsules), लिपोसोम (मेदाम्ल व पाणी यांच्या मिश्रणाचे सूक्ष्मकण, Liposome) यांचा उपयोग अ, ड व क ही जीवनसत्त्वे तसेच प्रतिऑक्सिडीकारक (antioxidants) असे प्रमुख घटक पदार्थ विशिष्ट अवयवापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहक म्हणून करतात. अब्जांश-इमल्शन हा पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो.
अब्जांश कणांचा वापर करून तयार केलेली प्रसाधने ‘अब्जांश सौंदर्य प्रसाधने’ या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. जगभरातील अनेक सौंदर्यप्रसाधन उत्पादक कंपन्या या क्षेत्रात आघाडीवर आहेत. अब्जांश तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनातील विविध क्षेत्रांत ज्या वेगाने होत आहे त्या वेगाने त्यांच्या वापराच्या सुरक्षेबद्दलचा विचार झालेला नाही, हे कटू वास्तव आहे. अब्जांश पदार्थ त्यांच्या अतिसूक्ष्म आकारामुळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशी उत्पादने बाजारात येण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा चाचण्या करून घेणे उत्पादक कंपन्याना गरजेचे झाले आहे. अब्जांश सौंदर्यप्रसाधनांच्या वापरासंबंधी अमेरिका, युरोपियन युनियन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्राझील इत्यादी देशांमध्ये विविध कायदेशीर तरतुदी आहेत.
भारतामध्ये देखील सौंदर्यप्रसाधन व्यवसाय अतिशय जलद गतीने विकसित होत आहे, परंतु अब्जांश तंत्रज्ञानाचा उद्योगातील वापर अजून विकसनशील स्वरूपात आहे. अब्जांश पदार्थांच्या वापरामधील संभाव्य धोके आणि त्याबाबतीतील कायदेशीर तरतुदी या गोष्टींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
समीक्षक – वसंत वाघ