‘अब्जांश कृषिविज्ञान’ ही नव्याने उदयास आलेली अब्जांश तंत्रज्ञान या विषयाची एक शाखा आहे. ही शाखा अब्जांश तंत्रज्ञानाचे कृषिक्षेत्रातील वाढते महत्त्व स्पष्ट करते. बीजविज्ञान आणि पीक उत्पादन या संदर्भातील अब्जांश तंत्रज्ञानविषयक माहिती येथे दिली आहे.

बियाची अंतर्गत रचना, बियांमधील गर्भधारणा व कोंबापासून रोप तयार होईपर्यंतच्या विविध अवस्थांचा अभ्यास बीजविज्ञान या ज्ञानशाखेत केला जातो. अब्जांश तंत्रज्ञानाच्या आधारे चांगल्या प्रतीचे बियाणे विकसित करून पीक उत्पादन कसे वाढवता येईल यावर अनेक नवनवीन संशाधने चालू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सध्या अब्जांश कणांचा वापर पीक उत्पादन वाढ आणि संरक्षण यांसाठी केला जातो. त्यामध्ये अब्जांश धातू ऑक्साइड व कार्बन अब्जांशनलिका यांचा उपयोग बियांच्या रुजण्यामध्ये सुधारणा घडवून आण्यासाठी केला जातो. अब्जांश धातू ऑक्साइड व कार्बन अब्जांशनलिका यांचे वेगवेगळ्या संहतीचे द्रावण तयार करून त्यामध्ये काही तास बिया भिजत ठेवल्या जातात व त्यानंतर बियांची पेरणी केली जाते. अशाप्रकारे बीजप्रक्रिया केल्याने बियांच्या उगवण क्षमतेच्या टक्केवारीत वाढ होते.

टोमॅटो पिकाच्या बियांवर कार्बन अब्जांशनलिकांची प्रक्रिया केल्यास त्या बीजाच्या आवरणात प्रवेश करतात. त्यामुळे आवरणामध्ये सूक्ष्म छिद्रे तयार होतात. परिणामतः बीजाची पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढून बियांच्या उगवण क्षमतेच्या टक्केवारीत वाढ होते. अशाच प्रकारचे परिणाम मोहरी, मुळा, मका, भात, काकडी, गाजर, कांदा, लसूण, सोयाबीन, कापूस, पालक इत्यादी पिकांवरही आढळले आहेत. बियांवर झिंक, मँगॅनीज, प्लॅटीनम, सोने आणि चांदी यांच्या अब्जांश कणांचा लेप दिल्याने बियांचे संरक्षण होते कारण हे अब्जांश कण सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून कार्य करतात. यामध्ये प्रामुख्याने एकभित्तिका कार्बन अब्जांशनलिका, बहुभित्तिका कार्बन अब्जांशनलिका, एकभित्तिका गोळे (बकीबॉल) यांचा उपयोग केला जातो. बहुभित्तिका कार्बन अब्जांशनलिकांच्या वापरामुळे मोहरी, राय, मका, काकडी, मुळा, बीटी कापूस, कांदा इत्यादी पिकांच्या, तर पाण्यात विरघळणाऱ्या कार्बन अब्जांशनलिकांमुळे हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते. मोहरी, मका, कलिंगड, भोपळा आणि घेवडा या पिकांच्या रोपांना चांदीच्या अब्जांश कणांची २० ते १०० पीपीएम (एक पीपीएम म्हणजे एक लिटर पाण्यातील एक मिग्रॅ. अब्जांश कण.) एवढी नियमित मात्रा दिल्याने या पिकांच्या उत्पादनात वाढ होते. भुईमुगाच्या बियांना ०.१% झिंक ऑक्साइडाच्या अब्जांश कणांची प्रक्रिया करून पेरणी केल्यास त्याच्या उत्पादनात ३०% हून अधिक वाढ होते. तसेच या कणांचा उपयोग बुरशीनाशक किंवा कवकनाशक म्हणूनही केला जातो. सिलिका अब्जांश कणांमुळे उपद्रवी कीटकांचा समूळनाश होतो. तांब्याच्या अब्जांश कणांच्या वापरामुळे पिकाची रोगप्रतिकारकक्षमता वाढते व पर्यायाने पिकाची उत्पादनक्षमता वाढते. तसेच खतनिर्मितीमध्येही तांब्याच्या अब्जांश कणांचा वापर बुरशीनाशक व कवकनाशक म्हणून करतात.

पहा  : अब्जांश कण.

संदर्भ :

  • Khodakovskaya M., Dervishi E., Mahmood M., Xu Y., Li Z., Watanabe F. And Biris A. S.  Carbon nanotubes are able to penetrate plant seed coat and dramatically affect seed germination and plant growth  ACS Nano  3:3221-327, 2009.
  • Nalwade A. R. and Neharkar S. B. Carbon nanotubes enhance the growth and yield of hybrid Bt cotton Var. ACH-172-2. Int.  J.  Adv. Sci. Tech. Res. 6(3):840-846, 2013.

समीक्षक – वसंत वाघ

प्रतिक्रिया व्यक्त करा