अन्नाची वाहतूक आणि साठवण या दोन्ही गोष्टी करीत असताना अन्न खाण्यायोग्य राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अब्जांश कणांचा वापर करून बनवलेल्या अन्नवेष्टनांचा आता मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. अब्जांश अन्नवेष्टनांची निर्मिती आणि विक्री हे उद्योग आता मोठे व्यवसाय झाले असून त्यात अनेक कंपन्या आघाडीवर आहेत. सन २००६ च्या अहवालानुसार जगामध्ये त्यावेळेस ४००-५०० प्रकारची अब्जांशवेष्टने व्यापारी तत्त्वांवर बाजारात उपलब्ध होती (Cientifica, 2006).

अब्जांश अन्न वेष्टनांची वैशिष्ट्ये : अब्जांश अन्नवेष्टनांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. व्यापारी तत्त्वावर उपलब्ध असलेली अब्जांश अन्नवेष्टने वजनाने हलकी पण मजबूत, टिकाऊ व आकर्षक असतात. त्यांचा वापर केल्याने अन्नपाकिटांची यांत्रिक हानी कमी प्रमाणात होते. वेष्टनांतील अब्जांश कण हे अन्नातील हानिकारक सूक्ष्मजीवांचा नाश करतात. ते उष्णता प्रतिरोधक व बुरशीनाशक असतात. तसेच अन्नपदार्थांमधील आर्द्रता टिकवून ठेवतात, त्यामुळे अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहण्यास मदत होते. हवा व आद्रता यांच्यामधील विनिमयास ते प्रतिबंध करतात. त्यामुळे अन्न खराब होत नाही व दीर्घ काळ खाण्यालायक राहते. वेष्टनांमधील अब्जांश कणांमुळे अन्न खराब झाल्यास वेष्टनांचा रंग आपोआप बदलतो व ते खराब झाल्याचे संकेत मिळतात. साहजिकच खराब झालेल्या अन्नाची पाकिटे खुल्या बाजारात विक्रीला जाणार नाहीत याची दक्षता वितरकांना घेता येते. अन्नवेष्टनामध्ये अब्जांश संवेदके बसवल्यास त्यांचेद्वारे अन्न सुरक्षित आहे किंवा नाही यांची पूर्वसूचना देण्याचे काम होते.

वापरले जाणारे अब्जांश कण आणि वापर : निर्मिती प्रक्रियेच्या वेळी अन्नवेष्टनांच्या प्लास्टिकमध्ये टिटॅनियम डाय-ऑक्साईड किंवा इतर योग्य अब्जांश पदार्थांचे कण मिसळतात. हे कण अन्नाचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. त्यामुळे अन्नाच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चांदी व झिंक ऑक्साईड यांचे अब्जांश कण जंतुनाशक असल्याने अन्नवेष्टने तयार करताना त्यांचाही वापर केला जातो. मांस, फळे, भाज्या, मिठाई, बेकरीचे पदार्थ इत्यादी अन्नपदार्थांवर सुमारे ५ नॅनो मीटर जाडीचा, उघड्या डोळ्यांनी न दिसणारा पण खाण्यायोग्य अब्जांश कणांचा पातळ थर वेष्टन निर्मिती प्रक्रियेच्या वेळी दिला जातो. हा थर आर्द्रता व हवा यांच्यातील विनिमय कमी करतो. परिणामतः अन्नावर बुरशी चढण्यास प्रतिरोध होतो. जैवप्लास्टिकपासून (Bioplastic) तयार केलेली अन्न पाकिटे व पिशव्या यामध्ये मजबूती आणण्यासाठी आता जीवाश्म (Fossils) वापरण्याऐवजी अब्जांश पदार्थांचा वापर वाढत्या प्रमाणावर होत आहे.

अन्न वेष्टनांमध्ये आता अब्जांश संवेदकांचाही वापर करतात. काही विदेशी कंपन्या कार्बन अब्जांश नलिकांचा वापर करून अब्जांश जैवसंवेदके (Nano-biosensors) बनवतात. यांचे वैशिष्ट्य असे की, अन्नामध्ये सूक्ष्मजीव व विषारी पदार्थ तयार होऊन ते अन्न खराब होत असल्यास ही संवेदके  त्याबाबतचे संकेत देतात. स्टॅफिलोकोकस ऑरियस (Staphylococcus aureus) यासारखे जिवाणू अन्नामध्ये विषारी पदार्थ तयार करतात. असे अन्न खाणा-यास विषबाधा होऊ शकते. क्वचित प्रसंगी जिवास धोका पोहोचू शकतो. या जिवाणूंचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अब्जांश तंत्रज्ञान आधारित अशी चाचणी विकसित केली आहे. या चाचणीने या विषारी जिवाणूंचे अन्नामधील प्रमाण अत्यल्प असले तरीही त्यांचा शोध घेता येतो व त्यामुळे अन्नसुरक्षा वाढते.

अब्जांश संवेदकांचा वापर (Nanosensors) : हल्ली अनेक कंपन्या अन्नवेष्टनांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक रसनेंद्रिये’ (Electronic tongues) बसवितात. त्यांमध्ये अब्जांश संवेदकें असतात. अशी इलेक्ट्रोनिक रसनेंद्रिये अन्न खराब होत असताना त्यामध्ये तयार होणाऱ्या रसायन व वायू यांच्या निर्मितीचे संकेत देतात. अत्यंत कमी वेळेत रोगजंतूंचा शोध घेणे हा अब्जांश संवेदकाचा मुख्य हेतू असतो.

अब्जांश तंत्रज्ञानाचे अन्नवेष्टन उद्योग क्षेत्रामध्ये मोठे योगदान असून भावी काळातही या क्षेत्रात या तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढतच राहणार आहे.

पहा : अब्जांश अन्नउद्योग, अब्जांश कण, अब्जांश संवेदके.

संदर्भ :

  • Bhattacharya S. J. Rapid Methods and Automation in Microbiology, 2007.
  • Garcia M., Aleixander M., Gutierrez J. and Horrillo M. C. Sensors Actuator B-Chemical, 2006.
  • Nanowerk: http://www.nanowerk.com/news/newsid=1852.php. (2007).
  • Nachay K. Food Technology, 2007.

समीक्षक – वसंत वाघ

प्रतिक्रिया व्यक्त करा