अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व किनाऱ्यावरील अटलांटिक महासागराचा एक फाटा. प्रत्यक्षात ही एक नदीमुख खाडी आहे. सस्क्वेहॅना नदी व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचे निमज्जन होऊन या उपसागराची निर्मिती झाली आहे. डेल्मार्व्हा द्वीपकल्पामुळे चेसापीक उपसागर अटलांटिक महासागरापासून वेगळा झाला आहे. उपसागराच्या मुखाजवळ उत्तरेस केप चार्ल्स आणि दक्षिणेस केप हेन्री ही दोन भूशिरे आहेत. उपसागराचा उत्तर भाग मेरिलंड राज्यात, तर दक्षिण भाग व्हर्जिनिया राज्यात आहे. या दोन्ही राज्यांच्या पारिस्थितिकी आणि आर्थिक दृष्टींनी या उपसागराला विशेष महत्त्व आहे. उपसागराची लांबी ३११ किमी., रुंदी ५ ते ४० किमी., क्षेत्रफळ ११,६०० चौ. किमी., सरासरी खोली ६.४ मी. आणि कमाल खोली ५३ मी. आहे. किनाऱ्याची एकूण लांबी १८,८०४ किमी. आहे.

चेसापीक उपसागराला सुमारे एक लाख ओढे आणि सुमारे १५० पेक्षा अधिक मोठ्या नद्या आणि प्रवाह येऊन मिळतात. या नद्या न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, डेलावेअर, मेरिलंड, व्हर्जिनिया आणि वेस्ट व्हर्जिनिया या सहा राज्यांचे आणि संपूर्ण वॉशिंग्टन डी. सी.चे जलवहन करतात. उपसागराला पश्चिमेकडून सस्क्वेहॅना, जेम्स, यॉर्क, रॅपहॅनक, पोटोमॅक, पटक्सट, सेव्हर्न, पटॅप्स्को या नद्या मिळतात, तर पूर्वेकडून वाइकामको, नँटिकोक, चापटँक आणि चेस्टर या नद्या मिळतात. अनेक नद्यांच्या मुखाशी नदीमुख खाड्या आढळतात. उपसागराचा पूर्व किनारा अनियमित, सखल आणि दलदलयुक्त, तर पश्चिम किनारा सरळ असून तेथे अनेक सागरी कडे आहेत. पूर्व किनाऱ्यावर अनेक बेटे आहेत.

फ्रान्सचा समन्वेषक जोव्हानी दा व्हेराझानो या यूरोपीय व्यक्तीने इ. स. १५२४ मध्ये पहिल्यांदा हा उपसागर पाहिला. त्यांना वाटले की, या समुद्रामार्गेच चीनकडे जाता येईल. इ. स. १६०७ मध्ये या उपसागरपरिसरात जेम्सटाऊन ही पहिली यूरोपीय वसाहत स्थापन झाली. त्यानंतर एक वर्षाने ब्रिटिश वसाहतकार कॅप्टन जॉन स्मिथ यांनी उपसागर आणि त्याच्या

चेसापीक उपसागर – नकाशा

किनाऱ्यावरील नदीमुख खाड्या यांचे समन्वेषण करून त्याचा नकाशा तयार केला. त्यामुळे सुरक्षित किनारे लाभलेल्या या उपसागर प्रदेशात वसाहतकऱ्यांना सहजसुलभ येणे शक्य होऊ लागले. १८१२ च्या अमेरिका आणि इंग्लंड युद्धात ब्रिटिशांनी या उपसागरातून येऊनच आक्रमण केले होते. सध्या उपसागर परिसरात सुमारे १७ दशलक्ष लोक वास्तव्यास असून सुमारे ३,६०० प्रकारचे प्राणी आणि वनस्पती उपसागरात व त्याच्या परिसरात आढळून येतात.

चेसापीक उपसागरात दोन पूल आहेत. त्यांपैकी मेरिलंड (Maryland)मधील अनॅपलीसजवळील सँडी पॉइंटपासून केंट बेटापर्यंतचा एक पूल बांधला आहे. उपसागराची रुंदी कमी असलेल्या ठिकाणी हा पूल बांधला असून मेरिलंडचा गव्हर्नर विल्यम प्रीस्टन लेन ज्युनि. यांची या पुलाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असल्यामुळे पुलास त्यांचेच ‘विल्यम प्रीस्टन लेन ज्युनि. मेमोरियल ब्रिज’ हे नाव दिले आहे. त्याची लांबी ६.९२ किमी. असून १९५२ मध्ये तो वाहतुकीस खुला करण्यात आला. १९७३ मध्ये त्या पुलाचा समांतर विस्तार करण्यात आला. १९६४ मध्ये उपसागराच्या मुखाशी २८ किमी. लांबीचा ‘चेसापीक बे ब्रिज-टनेल’ हा दुसरा पूल व बोगदामार्ग बांधण्यात आला. या पुलामुळे व्हर्जिनिया पुळण चार्ल्स भूशिराशी जोडली गेली आहे.

चेसापीक बे ब्रिज-टनेल

उपसागराच्या उत्तर भागात बॉल्टिमोर हे प्रमुख बंदर आहे. अगदी ईशान्य भागातील चेसापीक आणि डेलावेअर या २२ किमी. लांबीच्या कालव्यामुळे चेसापीक उपसागराचा शीर्षभाग डेलावेअर नदीमुख खाडीशी जोडला गेला आहे. १८२९ मध्ये तो बांधून पूर्ण झाला. त्यामुळे हा जवळचा सागरी मार्ग उपलब्ध झाला. सुरुवातीला त्यात जलपाशांचा वापर केला जाई; परंतु नंतर त्याची खोली आणि रुंदी वाढविल्यामुळे त्यातून नैसर्गिक रीत्या वाहतूक होते. नॉरफॉकच्या सभोवताली असलेल्या हॅम्प्टन रोड्स बंदर विभागातून कोळसा आणि तंबाखूची निर्यात केली जाते. नॉरफॉक येथे महत्त्वाचा नाविक तळ आहे. याशिवाय न्यूपोर्ट न्यूज, पोर्टस्मथ ही येथील प्रमुख बंदरे आहेत. चेसापीक उपसागर हा अटलांटिक किनाऱ्यांतर्गत जलमार्गांपैकी एक मार्ग आहे. किनाऱ्यावर अनेक पुळणी असून येथे अनेक पर्यटक भेटी देतात.

१९७० च्या दशकापासून उपसागराभोवतालच्या प्रदेशात वाढलेली वस्ती आणि कारखानदारी यांमुळे उपसागराच्या पाण्यात वाहितमल, औद्योगिक अपशिष्टे, कचरा इत्यादी मिसळून पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले. त्यामुळे १९७० च्या दशकात येथील व्यापारी मासेमारी बंद पडली होती; मात्र १९९० च्या दशकापासून प्रदूषण नियंत्रणाचे वेगवेगळे प्रकल्प व मार्ग अवलंबिले गेल्यामुळे २०१५ पासून परिस्थिती बरीच सुधारली आहे. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकापर्यंत सुरक्षित आणि भरपूर पोषणद्रव्ये असलेल्या या उपसागरात मासे, सकवच प्राणी मुख्यत: निळे खेकडे आणि इतर जलचरांची रेलचेल आहे. उपसागरात दरवर्षी सुमारे ५०० दशलक्ष व्यापारी मासेमारी केली जाते.

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा