
टोकफळ हा महावृक्ष फॅबेसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव अॅक्रोकार्पस फ्रॉक्झिनीफोलियस आहे. चिंच, गुलमोहर इत्यादी वनस्पतीदेखील या कुलामध्ये मोडतात. शेंगा फांद्यांच्या टोकाकडे येतात आणि त्या टोकदार असतात म्हणून कदाचित टोकफळ हे नाव पडले असावे. भारतात पूर्वेकडील राज्ये तसेच दक्षिण सह्याद्रीच्या वनांत हा वृक्ष आढळतो.
टोकफळ टोकफळ या वृक्षाचा आकार वेडावाकडा असून तो १५–२० मी. उंच वाढतो. अनुकूल परिस्थितीमध्ये सु. ५० मी. उंच वाढलेल्या या वृक्षांच्या नोंदी आहेत. खोडाचा व्यास ५०–१०० सेंमी. असतो. खोड गोल व गरगरीत असून साल करड्या तपकिरी रंगाची दिसते. पाने संयुक्त, मोठी, ५०–१२० सेंमी. लांब असून पिसांसारखी असतात. हिवाळ्यात पानगळ होते. वसंत ऋतूमध्ये लालसर नारिंगी रंगाची पालवी आणि फुले एकदम येतात. पालवीचा रंग नंतर पोपटी होऊ लागतो. फुलोरे कणिश प्रकारचे असतात. फुले लाल, लहान, एक– दोन सेंमी. लांबीची असून पाकळ्या पाच आणि पुं–केसर पाच ते दहा असतात. उन्हाळ्यात शेंगांचे घोस दिसू लागतात. शेंगा लांब, चपट आणि टोकदार असतात. बिया १०–१८ असून त्या फारच लहान व चपट्या असतात. बिया सहजपणे रुजतात. एक शोभिवंत वृक्ष म्हणून उद्यानांतून तसेच वनीकरणात तो लावला जातो.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.