एक मांसाहारी सागरी प्राणी. सीलचा समावेश स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणात केला जातो. या गणातील ओटॅरिइडी तसेच फोसिडी कुलातील सु. ३२ जातीच्या प्राण्यांना ‘सील’ म्हणतात. मांसाहारी गणातील जलचर प्राण्यांना पिनिपीडिया या उपगणात समाविष्ट केले जाते. पिनिपीडिया या शब्दाचा अर्थ ‘जुळलेले वल्ह्यासारखे पाय’ असा होतो. सीलखेरीज वॉलरस हे जलचर प्राणीही पिनिपीडिया उपगणात येतात. फोसिडी कुलातील सील पाण्यात राहण्यासाठी ओटॅरिइडी कुलातील सीलांपेक्षा जास्त अनुकूलित झालेले आहेत. फोसिडींना बाह्यकर्ण नसतात, तसेच त्यांचे शरीर अधिक प्रवाहरेखीत असते. मात्र त्यामुळे त्यांना जमिनीवर सरपटावे लागते. अशा गुणधर्मामुळे या सीलांना ‘कर्णरहित सील’ किंवा ‘सरपटणारे सील’ म्हटले जाते. त्यांना ‘खरे सील’ असेही म्हणतात. याउलट ओटॅरिइडी कुलातील सीलांना बाह्यकर्ण असल्याने त्यांना ‘कर्णधारी सील’ म्हणतात. हे सील चारही पायांचा उपयोग करून जमिनीवर चालू शकतात. ते जमिनीवर कर्णरहित सीलांपेक्षा जास्त काळ वावरतात. अंगावर जादा लोकर असल्याने त्यांना ‘फर सील’ असेही म्हणतात.

लहान सील (पुसा सायबीरिका)

सील प्राण्यांच्या शरीराचा मध्यभाग फुगीर आणि अग्रभाग तसेच पश्चभाग निमुळते असतात. सर्वांत लहान सीलचे शास्त्रीय नाव पुसा सायबीरिका आहे. हा सील रशियातील बैकल येथील गोड्या पाण्याच्या सरोवरात आढळतो. म्हणून त्याला ‘बैकल सील’ असेही म्हणतात. त्याची लांबी सु. १.१–१.४ मी. असून वजन सु. ५०–३०० किग्रॅ. असते. सर्वांत मोठा सील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर आढळतो. त्याचे शास्त्रीय नाव मिरोउंगा अँग्युस्टिरॉस्ट्रिस आहे. त्याचे शरीर सु. ६.५ मी. लांब असून वजन सु. ३,७०० किग्रॅ. भरते. सीलचे पुढचे पाय शरीरापासून फार वेगळे दिसत नाहीत, पण मागचे पाय लांब असून बोटांसकट एक वल्ह्यासारखा अवयव तयार झालेला असतो. सीलच्या त्वचेखाली जाड थर असतो. यात मेदाच्या स्वरूपात अन्न साठविलेले असते. हा थर उष्णतारोधी असून शरीर अधिक तरणक्षम ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. लहान मासे, माकूल, नळ आणि खेकडे असे प्राणी सील खातो.

मोठा सील (मिरोउंगा अँग्युस्टिरॉस्ट्रिस)

सील जगातील सर्व महासागरात आढळतात; उत्तर गोलार्धातील ध्रुवीय महासागरात त्यांची संख्या जास्त आहे. सील उत्तम पोहणारे असून ते पाण्यात खोलवर बुडी मारून वर येतात. अंटार्क्टिका महासागरातील सील १५०–२५० मी. पाण्याखाली खोल जाऊ शकतात. समुद्रात जेथे हिमाचे तुकडे तरंगत असतात, त्यांवर राहणे किंवा वावरणे त्यांना जास्त आवडते. त्यांचा पोहण्याचा वेग डॉल्फिन, व्हेल यांच्यापेक्षा कमी असतो. पोहताना ते पुढच्या पायांच्या साहाय्याने पाणी बाजूला करतात, तर मागचे पाय वरखाली हलवून शरीर पुढे ढकलतात. मागच्या पायांचा उपयोग वल्ह्यासारखा केला जातो. मात्र जमिनीवर चालताना ते सरपटत चालतात.

प्रजननासाठी सील वर्षातून एकदा समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनीवर येतात. त्या वेळी ते कळप करून राहतात. काही वेळा हिमढिगाऱ्यावर त्यांचे कळप दिसून येतात. याच काळात त्यांच्या जोड्या जमतात व मीलन होते. काही वेळा कळपात एकच नर आणि अनेक माद्या असतात. नर आपले अधिक्षेत्र ठरवून घेतो आणि दुसऱ्या नराला अधिक्षेत्रात येऊ देत नाही. गर्भावधी ११ महिन्यांचा असतो. पिले हिमढिगाऱ्यावर जन्मतात. पिले आईच्या दुधावर पोसली जातात, मात्र स्तनपान काळात मादी (आई) अन्नग्रहण करत नाही; पिलांचा जन्म झाल्यावर लगेचच पुन्हा गर्भधारणा होते. सीलच्या दुधात ५० टक्के मेद पदार्थ असल्याने पिलाचे वजन झपाट्याने वाढते. मादी सील साधारणतः ३० ते ३५ वर्षांपर्यंत जगते, तर नर सील २० ते २५ वर्षांपर्यंत जगतो.

सीलची ‍शिकार करणाऱ्या प्राण्यांमध्ये किलर व्हेल (हिंसक देवमासा), हिम अस्वल, मोठे शार्क, मानव इत्यादींचा समावेश आहे. सीलची शिकार कातडी, लोकर व मांसासाठी केली जाते. त्वचेखाली असलेल्या मेदाच्या थराला ब्लबर (तिमिवसा) म्हणतात. त्यातील मेदासाठीही त्यांची शिकार केली जाते. त्यांच्या बेकायदेशीर शिकारीवर काही प्रमाणात निर्बंध आणल्याने धोक्यात असलेल्या काही सील प्रजातींची संख्या पुन्हा वाढली आहे. लहानपणापासून माणसाच्या सहवासात वाढलेले सील शिकू शकतात, तसेच माणसाच्या आज्ञा पाळतात. असे सील सर्कसमध्ये विविध कामे करून मनोरंजन करतात. ‘सील सर्कस’ हा जगातील एक लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे.

सील प्राण्यांचे बंदर सील, पट्टेदार सील, वलयांकित सील, हार्प सील, बीअर्डेड सील, करडा सील, फणाधारी सील व हत्ती सील इ. प्रकार आहेत.