तिलपुष्पी (डिजिटॅलीस पुर्पुरिया)

तिलपुष्पी ही द्विवर्षायू वनस्पती सपुष्प वनस्पतींच्या प्लान्टेजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव डिजिटॅलीस पुर्पुरिया आहे. ही वनस्पती मूळची यूरोपच्या उष्ण प्रदेशातील असून आता तिचा प्रसार सर्व उष्ण प्रदेशांत झाला आहे.

तिलपुष्पी हे शाकीय झुडूप असून सु. २ मी.पर्यंत उंच वाढते. पाने साधी, १०–३५ सेंमी. लांब आणि ५–१२ सेंमी. रुंद असून लांब देठावर सर्पिलाकार रचनेत असतात. पानांवर राखाडी-पांढरे मृदुरोम आणि ग्रंथियुक्त रोम असल्यामुळे पाने लोकरीसारखी दिसतात. पहिल्या वर्षी फुलांचे तुरे येतात. हे तुरे १–२ मी. उंच असून त्यांच्या टोकाला आकर्षक, घंटाकृती व जांभळी फुले येतात. फुलांच्या पाकळ्यांच्या (पुष्पनलिका) आतील बाजूला गडद ठिपके असतात. बोंडे फुटून त्यातील अनेक बिया वाऱ्यावर पसरतात. शोभेची वनस्पती म्हणून तिलपुष्पीची लागवड करतात.

तिलपुष्पी विषारी वनस्पती आहे. तिच्या पानांत, फुलांत व बियांत डिजिटॉक्सिन हे हृदय उत्तेजक असते. फुलांचे व बियांचे अतिसेवन केल्यास मनुष्याला आणि इतर प्राण्यांना ते प्राणघातक ठरू शकते. पाने खाल्ल्याने उलट्या व जुलाब होतात. तसेच अतिसेवनाने हृदय व वृक्कांची क्रिया बंद पडते. रेणवीय जीवशास्त्र या शाखेत डिजिटॉक्सिनाचा वापर डीएनए व आरएनए रेणू ओळखण्यासाठी करतात.