ठळक गोशवारा : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएट युनियन आणि त्यांचे मित्रगट यांच्यात झालेला संघर्ष.

प्रास्ताविक : पहिले महायुद्ध (१९१४ ते १९१९) आणि दुसरे महायुद्ध (१९३९ ते १९४५) यांच्या दरम्यानच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय संबंधात लक्षणीय स्थित्यंतर घडून आले. त्यातील दोन दूरगामी बदल म्हणजे अमेरिकेने युद्धात प्रवेश करून आपल्या आंतरराष्ट्रीय घटनांपासून अलिप्त राहण्याच्या धोरणाचा त्याग केला आणि विश्वशांतीच्या निर्मितीसाठी ‘राष्ट्रसंघ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. दुर्दैवाने यूरोपमधील संघर्ष थांबले नाहीत आणि जगाला आणखी एका भयानक युद्धाला सामोरे जावे लागले.

एक प्रातिनिधिक चित्र

या कालावधीत आरंभ झालेल्या बदलांना दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक मूर्त स्वरूप प्राप्त झाले. त्यात खालील प्रमुख बदलांचा समावेश होता :

  • दुसऱ्या महायुद्धापश्चात आंतरराष्ट्रीय व्यवहारातील यूरोपच्या प्राथमिकतेला ग्रहण लागले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, फ्रान्स आणि इटली या देशांचा पराभव झाला होता, तर इंग्लंड आणि सोव्हिएट युनियनचा अतोनात विध्वंस झाला होता. त्याउलट, युद्धातील मित्र राष्ट्रांच्या विजयामध्ये अमेरिकेचा सिंहाचा वाटा होता आणि युद्धोत्तर कालावधीत एक नवी शक्ती या नात्याने ती उदयास आली होती. सोव्हिएट युनियनची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार होती. त्या देशाने हिटलरचा कडवा सामना केला होता. तेव्हापावेतो ‘यूरोपकेंद्रित’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगतात यूरोपीय देशांचे महत्त्व कमी होणार होते. अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या दोनच शक्ती आता प्रमुख भूमिका बजावणार होत्या.
  • युद्धाअखेरी यूरोपचे विभाजन झाले. सोव्हिएट युनियनने हस्तगत केलेला प्रदेश, प्रामुख्याने पूर्व यूरोप आणि अमेरिका, फ्रान्स व इंग्लंड यांनी पादाक्रांत केलेला प्रदेश या दोन्हींवर हे आधारित होते. दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशांवर ताबा ठेवायचा होता. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. जर्मनीचे रशियाच्या नियंत्रणाखालील पूर्व जर्मनी आणि अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांच्या नियंत्रणाखालील पश्चिम जर्मनी अशी वाटणी झाली. एवढेच नव्हे, तर बर्लिन ही राजधानीसुद्धा दोन भागांत वाटली गेली.
  • १९१७ मध्ये सोव्हिएट युनियनमध्ये झालेल्या राज्यक्रांतिपश्चात आंतराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करणारा एक नवीन घटक निर्माण झाला, तो म्हणजे पायाभूत विचारप्रणाली, भूमिका आणि परिणाम. भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन भिन्न जागतिक दृष्टिकोनांतील हा संघर्ष होता. पूर्व यूरोपमध्ये साम्यवादी विचारांचा प्रसार करून आपला प्रभाव पाडण्याचा सोव्हिएट युनियनचा प्रयत्न होता. उलट, पश्चिम यूरोपवरील अमेरिकेचा प्रभाव भांडवलशाहीवर आधारित होता. अमेरिका याला ‘स्वतंत्र लोकशाही’ म्हणत असे, तर सोव्हिएट युनियन त्याची ‘साम्राज्यवाद’ म्हणून निर्भर्त्सना करत असे.
  • संयुक्त राष्ट्रांची १९४५ मध्ये झालेली स्थापना हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टिने एक महत्त्वाचे पाऊल होते. संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना ‘राष्ट्रसंघाची’ जागा घेण्यासाठी निर्माण करण्यात आली होती.
  • दुसऱ्या महायुद्धापश्चात आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया आणि आफ्रिकेतील देशांत वसाहतवादविरोधी संघर्ष आणि स्वातंत्र्यवादी चळवळींचा उदय आणि त्यांचे काही प्रमाणातील यश होय. याचा परिणाम म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडांमधील बऱ्याच देशांची वसाहतवादातून मुक्तता झाली.

शीतयुद्धाची कारणमीमांसा आणि परिणती : अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमधील संघर्षामुळे शीतयुद्धाचा उदय झाला. शीतयुद्ध हा शब्दप्रयोग अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमधील अनेक वादांची परिमाणे व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. त्यांपैकी एक या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांचा आपापल्या प्रदेशांवर प्रभाव आणि नियंत्रण राखण्यासाठीच्या संघर्षाचा भूराजकीय पैलू आहे. दोघांनीही व्याप्त यूरोपवर आपली पकड आवळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सोव्हिएट युनियनच्या प्रभावाखाली असलेल्या प्रदेशात पूर्व जर्मनी, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया आणि अल्बेनिया या राष्ट्रांचा समावेश होता, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली नेदरलंड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीस आणि ब्रिटन हे देश होते. फिनलंडवर तटस्थ राहण्याचा दबाव आणण्यात आला होता. जेणेकरून अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमध्ये त्या भागात खटका उडू नये. राजकीय विचारप्रणाली हे दुसरे परिमाण होते. आपला प्रभाव बळकट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाई.

आरंभी या स्पर्धेचे परिमाण मुख्यत्वेकरून राजकीय होते, परंतु नंतर त्याने लष्करी स्वरूप धारण केले आणि शेवटी त्याला आर्थिक फाटे फुटले. सुरुवातीस शीतयुद्ध यूरोपपर्यंतच मर्यादित होते; परंतु नंतर ते आशिया आणि आफ्रिका खंडांतही पसरले. जरी या दोन महाशक्तींमध्ये कधीही युद्ध झाले नाही, तरी त्या दोघांमध्ये एक सातत्यपूर्ण तणाव राहिला. एखादी गौण आणि क्षुल्लक घटनासुद्धा युद्धाचे कारण होऊ शकली असती. त्याची परिणती अण्वस्त्रसंघर्षात होण्याच्या शक्यतेमुळे सर्व विश्वालाच ते महाभयंकर आव्हान होते आणि अनेक देशांची राखरांगोळी होण्याची संभावना त्यामागे दडली असल्याने सर्वत्रच एक अस्वस्थता धगधगत होती.

१९४५ मध्ये चालू झालेली इतिहासाची वाटचाल सोव्हिएट युनियनचे विभाजन झाल्यावर १९९१ मध्ये संपुष्टात आली. हा इतिहास सात टप्प्यांत विभागता येईल. पहिला टप्पा, १९४५ ते १९४९/५० पर्यंत आरंभ काळाचा. दुसरा टप्पा, १९४९/५० ते १९५९ या कालावधीतील आशियामध्ये शीतयुद्ध पसरण्याचा. तिसरा टप्पा, १९५९ ते १९६२ मधील संक्रमणाचा. १९६२ मध्ये तणावशिथिलनाचा [détente (देतांत)] पाया घातला गेला, हा चौथा टप्पा. १९७२ ते १९७९ दरम्यान ‘देतांत’चे संवर्धन झाले, तो पाचवा टप्पा. १९७९ ते १९८५ या कालावधीत एक नवीन शीतयुद्ध सुरू झाले, त्याला सहावा टप्पा म्हणता येईल. १९८५ ते १९९१ हा सातव्या आणि अंतिम टप्प्याचा कालावधी ‘गोर्बोचेव्ह एरा’ म्हणून ओळखला जातो. या टप्प्यात सोव्हिएट युनियनचे विघटन झाले. त्या दरम्यान शीतयुद्धाचा अधिकृत अंत झाला. या इतिहासाच्या वाटचालीचा सविस्तर मागोवा पुढील उपभागांत घेण्यात आला आहे.

संदर्भ :

  • Agwani, M. S. Ed. Détente : Perspectives and Repercussions, Delhi, 1976.
  • Brzezinski, Zbigniew, How The Cold War was Played, Foreign Affairs, vols. 51, Oct. 1972.
  • Calvocoressi, Peter, World Politics : Since 1945, London, 2000.
  • Goldblat, Jozef, Arms Control : The New Guide to Negotiations and Agreements, London, 1994.
  • Kissinger, Henry, Years of Upheaval, Boston, 1982.
  • Sonnenfeldt, Helmut, Russia, America and Détente, vols. 56 (1), Jan. 1978.

                                                                                                                                                                   समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा