तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे. ती मूळची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या ८५०–१,००० जाती आहेत. भारतात या प्रजातीतील सु. १५० जाती आढळतात. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सु.१,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात, वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते. महाराष्ट्रात ही पश्चिम घाट, कोकण व दख्खनच्या पठारी भागांत वाढलेली आढळते.

तेरडा ही ३०–९० सेंमी. उंच वाढते. खोड मांसल असून फांद्या आखूड असतात. पाने साधी, सु.१५ सेंमी. लांब व भाल्यासारखी निमुळती असतात. पानांची मांडणी सर्पिलाकार व कडा दंतूर असून त्यांच्या देठावर ग्रंथी असतात. फुले गुलाबी, एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात. मात्र फुलांचे जांभळट, फिकट गुलाबी, तांबडे किंवा पांढरे असे प्रकारही असतात. परागण कीटकांमार्फत व पक्ष्यांमार्फत होते. बोंडे सु. एक सेंमी. जाड व लवदार असून त्यांना स्पर्श झाल्यास ती तडकून फुटतात.
तेरड्याच्या पानांत नॅफ्थॅक्विनोन, लॉसोन व लॉसोन मिथिल ईथर असे मुख्य क्रियाशील घटक असतात. बियांमध्ये कॅम्फेरॉल (फ्लॅवनॉइड) हा मुख्य घटक असतो. काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात. आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरतात. बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात. महाराष्ट्रात गौरीगणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पानेफुले वाहतात. म्हणून तेरड्याला गौरीची फुले असेही म्हणतात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.