(ॲसाफेटिडा/डेव्हिल्स डंग). दैनंदिन मसाल्यातील एक आवश्यक घटक. हिंग हा पदार्थ जगाच्या वेगवेगळ्या भागांत मसाल्यासाठी वापरला जातो. एपिएसी (अंबेलिफेरी) कुलातील फेरूला प्रजातीतील काही वनस्पतींच्या मूलक्षोडांपासून किंवा सोटमुळांपासून जो चीक मिळतो, तो वाळविला की त्याला हिंग म्हटले जाते. शेपू, कोथिंबीर, गाजर या वनस्पतीही एपिएसी कुलातील आहेत. फेरूला  प्रजातीत सु. १७० जाती आहेत. यातील काही प्रजातींपासून हिंग हा पदार्थ मिळतो; उदा., फेरूला फेटिडा, फे. ॲसाफेटिडा, फे. नार्थेक्स  इत्यादी. या नोंदीमध्ये फे. फेटिडा  या जातीच्या वनस्पतीचे वर्णन पुढे दिले आहे. ही वनस्पती मूळची इराण व अफगाणिस्तान येथील आहे.

हिंग (फेरूला फेटिडा ) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) हिंगाचे तुकडे.

फेरूला फेटिडा  ही वनस्पती १.५–२ मी. उंच वाढते. पाने संयुक्त, विभागलेली, एकाआड एक असतात; ती मोठी, सु. ४५ सेंमी. लांब असून खोडाच्या तळाकडील भागास वेढून टाकतात. फुलोरा चवरीसारखा असून फुले लहान व द्विलिंगी असतात; नर-फुले हिरवट पिवळसर, तर मादी-फुले हिरवट पांढरी असतात. फळांचा आकार अंड्यासारखा असून ती रंगाने लालसर तपकिरी असतात. फळात दुधी रस असतो. परागण कीटकांमार्फत होते. ही वनस्पती सावलीत वाढत नाही. साधारणपणे चार-पाच वर्षांनी या वनस्पतीची मुळे १२–१५ सेंमी. व्यासाची होतात. मार्च-एप्रिल महिन्यांत या वनस्पतीला फुले येण्यापूर्वी तिचे खोड कापून टाकले की, राहिलेल्या मुळातून (मूलक्षोडातून) दुधी चीक येतो. हा चीक हवेत सुकून घट्ट होतो. प्रथम त्याचा रंग लालसर तपकिरी असून कालांतराने काळसर होतो. हा काळसर चीक म्हणजे हिंग. चीक एकदा काढून घेतल्यावर मुळाला जखम करून पुन्हा चीक जमा करतात.

हिंग तिखट कडवट असून त्याला उग्र वास असतो. हा वास त्यामध्ये असलेल्या सल्फरयुक्त (गंधकयुक्त) संयुगामुळे येतो. हिंगाचे रासायनिक संघटन जटिल असते; त्यात रेझीन (राळ) ४०%, डिंक २५–३०%, बाष्पनशील तेल १०%, राख १.५–१०% असते. हिंगाच्या चिकामध्ये व्हॅनिलीन, फेरूलिक आम्ल आणि अंबेलिफेरॉन असते. बाष्पनशील तेलामध्ये गंधकयुक्त पदार्थ असतात. बाजारात विकल्या जाणाऱ्या हिंगामध्ये शुद्ध हिंग, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ व डिंक यांचे मिश्रण करून विकतात. दमा, खोकला, अपचन इत्यादी विकारांवर हिंग गुणकारी आहे. तसेच आतड्यांतील हानीकारक सूक्ष्मजीवांची वाढ रोखायला हिंग मदत करतो. हिंगाचा वापर मसाला म्हणून लोणची, आमटी, सांबर, डोसा इत्यादींमध्ये केला जातो. तो स्वादकारक आहे. भारतात दैनंदिन स्वयंपाकातील अनेक पदार्थांमध्ये फोडणी देण्यासाठी हिंग वापरतात. यूरोपात तसेच अमेरिकेत स्वादासाठी हिंग वापरतात. आयुर्वेदात कफदोष व वातदोष यांमध्ये हिंगाचा वापर केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा