शरीरातील एखादे इंद्रिय निकामी झाले की, त्या इंद्रियाची सामान्य कार्ये घडून येण्यासाठी ते काढून टाकून त्याऐवजी कायमस्वरूपी साधने किंवा उपकरणे शरीरात बसवितात, अथवा त्या इंद्रियाचे कार्य तात्पुरते चालू राहण्यासाठी शरीराबाहेर काही साधनांचा उपयोग करतात. अशा साधनांना कृत्रिम इंद्रिये म्हणता येईल. रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किंवा विष प्राशन केलेल्या किंवा अनावधानाने विषबाधा झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील विष काढून टाकण्यासाठी कृत्रिम वृक्काचा (मूत्रपिंडाचा) उपयोग करतात. हृदयाच्या शस्त्रक्रियेवेळी वापरण्यात येणारे हृदय-फुप्फुस यंत्र हेदेखील एक कृत्रिम इंद्रिय आहे. कमजोर फुप्फुसातील कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकणे आणि शरीरातील सर्वांत मोठ्या शिरेत (नीलेत) रक्त शिरताना त्यात ऑक्सिजन मिसळणे, असे तात्पुरते कार्य करू शकणार्‍या ‘कृत्रिम फुफ्फुसाची’ चाचणी सध्या चालू आहे. काही पूर्ण बहिर्‍या व्यक्तींची श्रवणचेता जशीच्या तशी असल्यास त्यांच्या आंतरकर्णात इलेक्ट्रोड बसवून त्यांचा बहिरेपणा दूर करता येतो.

अलीकडे धमनीच्या (रोहिणीच्या) रोगग्रस्त भागाच्या जागी निरनिराळ्या कृत्रिम पदार्थांच्या नळ्या बसवितात. प्राण्यांचे प्रथिनमय तंतू आणि सिलिकॉन यांपासून भाजलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम त्वचा तयार केली गेली आहे. जैविकी (बायॉनिक्स) या तंत्रज्ञान शाखेत झालेल्या संशोधनामुळे दृष्टिपटल नसलेल्या व्यक्तींनाही दिसणे शक्य झाले आहे. दृष्टिपटलाच्या जागी एक लहानसा पडदा बसवून त्याची जुळणी मेंदूच्या दृष्टिकेंद्राशी केल्यानंतर अशा व्यक्ती रस्ता ओलांडणे, फोन करणे इ. कामे करू शकतात. यांपैकी काही शस्त्रक्रिया भारतातही होतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा