त्वचेवरील केसांच्या मुळापाशी होणार्या वेदनाकारी गळूला केसतूड अथवा केसतूट म्हणतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंच्या संसर्गामुळे केसतूड होते. यात त्वचेतील केशपुटकाला म्हणजेच केसाचे मूळ, मुळाशी संबंधित ग्रंथी आणि इतर ऊती यांचा स्थानिक क्षोभ होतो. शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो किंवा ज्या भागावर अधिक घर्षण होते तेथील त्वचेवर केसतूड होण्याचा संभव अधिक असतो. म्हणूनच काख, जांघ, पाठ, मान, कुल्ले, गुदद्वाराभोवतीची जागा, बाह्यकर्णनलिका, नाक, डोळ्यांची पापणी या भागांतील केसांमध्ये केसतूड होते.
केसतूड ज्या भागात होते त्या केसाच्या मुळाशी सुरुवातीला एक लालसर कठिण फोड दिसू लागतो. हा फोड वाढत जाऊन तेथे वेदना होतात. काही वेळा तापही येतो. क्वचित प्रसंगी या अवस्थेत पू न होता केसतूड जिरून जाते. परंतु असे न झाल्यास सूज वाढते आणि वेदनाही वाढतात. फोडाच्या मध्यभागी केस असून त्याच्याभोवती पांढरट ठिपका दिसतो. या भागातील पांढर्या पेशी आणि रक्तद्रव एकत्र साचून पू तयार होतो. हळूहळू त्याभोवती काळसर लाल घट्ट भाग दिसू लागतो. या स्थितीत तेथील लसिका ग्रंथी दुखू लागतात. हे केसतूड फुटले की, केस व त्याच्या मुळाभोवती तयार झालेला पू बाहेर पडतो. लगेच वेदना थांबतात आणि जखम सावकाश भरून येते.
स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूंना प्रतिरोध करण्याची शक्ती कमी असलेली व्यक्ती, मुधमेहाचे रुग्ण व क्षयग्रस्त रुग्ण यांच्या शरीरावर वारंवार केसतुडे उठतात. केसतूड बरे होण्यासाठी कोरडा शेक, पोटीस किंवा लघुतरंग ऊतकतापन यांचा उपयोग करतात. अनेक वेळा शल्यविशारद केसतूड झालेल्या त्वचेचा भाग कापून तेथील पू व केस बाहेर काढतात. अशी शस्त्रक्रिया शल्यविशारदाने करावी लागते, अन्यथा जीवाणूंचा संसर्ग त्वचेच्या इतर भागालाही होतो.
केसतुडातील केस उपटून टाकल्यास घट्ट पुवाची ‘बी’ लवकर बाहेर पडून आराम मिळतो. केस उपटल्यावर दुखर्या भागावर हेक्झाक्लोरोफेन हे जीवाणुनाशक लावल्यास पुन्हा केसतूड होणे थांबते. वारंवार अथवा एकाच जागी केसतूड होत असल्यास प्रतिजैविकांचा वापर करतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियसपासून केलेल्या लशीचे अंत:क्षेपण (इंजेक्शन) दिल्यास केसतूड वारंवार होण्याची प्रवृत्ती नाहीशी होते.