कोणताही जैविक पदार्थ, ज्याचे रूपांतर ऊर्जेत करता येते किंवा ज्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर होऊ शकतो, अशा पदार्थाला जैव वस्तुमान म्हणतात. एखाद्या क्षेत्रातील सर्व सजीव (वनस्पती व प्राणी) आणि सजीवोद्भव यांचे एकूण वस्तुमानदेखील जैव वस्तुमान या संज्ञेने दाखविले जाते. जैव वस्तुमान वनस्पतिज किंवा प्राणिज असू शकते. यात वनस्पती, झाडांच्या सुकलेल्या फांदया, खोडांच्या ढलप्या, वेगवेगळ्या धान्यांची ताटे, वाया गेलेले किंवा खराब झालेले धान्य, फळे-भाज्यांचा कचरा, सुका तसेच ओला घरगुती कचरा अशा वनस्पतिज पदार्थांचा तसेच प्राण्यांची विष्ठा, प्राण्यांचे अवशेष अशा प्राणिज पदार्थांचा समावेश होतो.

जैव वस्तुमानाचे ऊर्जेत तीन प्रकारे रूपांतर करता येते: औष्णिक रूपांतरण, रासायनिक रूपांतरण आणि जैवरासायनिक रूपांतरण. जैव वस्तुमानाच्या थेट ज्वलनातून (औष्णिक रूपांतरण) उष्णता निर्माण होते, जैव वस्तुमानावर किण्वन प्रक्रिया (रासायनिक रूपांतरण) केल्यास एथेनॉल हे इंधन मिळते, तर जैव वस्तुमानावर जैवरासायनिक प्रक्रिया केल्यास कृत्रिम इंधन वायू (सिंथेटिक गॅस; कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन यांचे मिश्रण), मिथेन वायू आणि इंधन तेल निर्माण होतात. जैव वस्तुमानावर जीवाणूंची प्रक्रिया करून एथेनॉल, रसायने किंवा मिथेन वायू मिळविता येतो.

जैव वस्तुमानापासून निर्माण होणारी ऊर्जा इतर पारंपरिक ऊर्जा स्रोताहून अधिक सोयीची, मुबलक व किफायतशीर आहे. बहुतांशी ऊर्जा खनिज तेलापासून मिळविली जाते. परंतु खनिज तेलाचे साठे मर्यादित आहेत. खनिज तेलाच्या ज्वलनाने वातावरणात कार्बन डाय-ऑॅक्साइड सोडला जातो व त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. जैव वस्तुमान वापरले गेले तरी नव्याने तयार होत असणाऱ्या जैव वस्तुमानाने त्याची भरपाई होत असते. त्यांच्यापासून ते निर्माण होताना जेवढा कार्बन डाय-ऑक्साइड वायू वापरला जातो, त्यापेक्षा जास्त कार्बन डाय-ऑक्साइड तयार होत नाही. भविष्यातील ऊर्जेचा एक महास्रोत म्हणून जैव वस्तुमानाकडे पाहिले जाते.

जगभरात वर्षाला सु. १४६ अब्ज टन एवढ्या जैव वस्तुमानाची निर्मिती होत असते. भारतात एकूण प्राथमिक ऊर्जेच्या ३२% ऊर्जा जैव वस्तुमानापासून मिळविली जाते आणि देशातील ७०% हून अधिक लोक ऊर्जेसाठी या वस्तुमानावर अवलंबून असतात. जैव वस्तुमानापासून ऊर्जा मिळविण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रभावी तंत्रज्ञान उभारून विविध उपक्रम आखीत आहे. भारतात उसाची चिपाडे, भाताची तुसे, धान्याची ताटे, कापसाचे देठ, नारळाच्या करवंट्या, तेल काढल्यानंतर उरलेला चोथा, कॉफीची तसेच तागाची अपशिष्टे, भुईमुगाची फोलपटे, भुसा यांसारख्या जैव वस्तुमानापासून ऊर्जा मिळवितात. भारतात दरवर्षी सु. ५० कोटी टन जैव वस्तुमान उपलब्ध होते. तसेच कृषिक्षेत्रातून आणि वनक्षेत्रातून अतिरिक्त १२ – १५ कोटी टन जैव वस्तुमान उपलब्ध होते. या एकूण जैव वस्तुमानापासून सु. १८,००० मेगावॅाट ऊर्जा निर्माण होऊ शकते. याखेरीज देशातील सु. ५५० साखर कारखान्यांतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या चिपाडांपासून सु. ५,००० मेगावॅाट अतिरिक्त ऊर्जा मिळू शकते. सद्यस्थितीत, भारतात थेट ज्वलनातून वीजनिर्मिती करण्याचे किंवा साखर कारखान्यांमध्ये वाफेची निर्मिती करून त्या ऊर्जेचा उपयोग करण्याचे प्रयत्न चालू आहेत. जैव वस्तुमानापासून निर्मिती होणाऱ्या ऊर्जा क्षेत्रात उत्तर प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्ये आघाडीवर आहेत.