केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक असून या पिकाखाली ७३,५०० हे. क्षेत्र आहे. त्यामध्ये जळगाव जिल्हा आघाडीवर असून तेथे ४८,००० हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यांमध्येही केळीचे क्षेत्र वाढत असून त्यामुळे  बाजारपेठेच्या कक्षाही रुंदावत आहेत.

हवामान : केळी हे उष्ण कटिबंधातील पीक असून केळी पिकाच्या उत्तम वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी १०-४०० से. तापमान आवश्यक आहे.

जमीन : केळी पिकासाठी मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सर्वसाधारणपणे तीन फूट खोलीची जमीन लागवडीस योग्य असते.‍ जमिनीचा सामू ६.५ ते ८.o दरम्यान असावा. क्षारयुक्त चोपण जमिनी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर परिणाम करत असल्याने लागवडीस योग्य नाहीत.लागवडीपूर्वी जमिनीचे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेबाबत मृद परीक्षण करून घ्यावे. जमिनीची चांगल्या प्रकारे पूर्वमशागत करून जमीन भुसभुशीत करावी.

केळीचे वाण : महाराष्ट्रात प्रामुख्याने केळीच्या श्रीमंती आणि ग्रँड नैन या वाणांची लागवड केली जाते. स्थानपरत्वे सफेद वेलची, हरसाल, महालक्ष्मी, अर्धापुरी या स्थानिक वाणांचीही लागवड केली जाते. फुले प्राइड हा बुटका वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठाने २०१८ मध्ये प्रसारित केला आहे.

लागवडीचा हंगाम : जून-जुलै (मृगबाग) आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर (कांदेबाग) हे केळी लागवडीचे प्रमुख दोन हंगाम असले तरी बाजारपेठेची मागणी, रोपांची उपलब्धता यानुसार अतिथंडी व अतिउष्णतेचा कालावधी सोडून वर्षभर लागवड शक्य आहे.

लागवड : केळीची लागवड वाणानुसार योग्य अंतरावर खोली सरी काढून करावी. श्रीमंती वाणासाठी १.५ × १.५ मी. (हेक्टरी ४,४४४ झाडे), तर ग्रँड नैनसाठी १.७५ × १.७५ मी. (हेक्टरी ३,२६५ झाडे) अंतरावर लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. स्फुरदाची संपूर्ण मात्रा २५० ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट व १० किग्रॅ.शेणखत केळी लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

अभिवृद्धी : केळीची कंदांपासून अभिवृद्धी करताना लागवडीकरिता निरोगी व जातीवंत बागेतून २ ते ३ महिने जुने कंद (मुनवे) निवडावेत. ४५० ते ७५० ग्रॅ. वजनाचे, उभट किंवा नारळाच्या आकाराचे कंद  ३ ते ४ मिनिटे १ लि.जर्मिनेटर, ५०० ग्रॅ. प्रोटेक्टंट, १०० लि.पाणी या द्रावणात संपूर्णपणे बुडवून घ्यावेत. लागवडीकरिता ऊती संवर्धित रोपांचाही पर्याय उपलब्ध आहे.

खत व्यवस्थापन : केळीसाठी खोल व बांगडी पद्धतीने किंवा चर घेऊन खते देणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनातून खते दिल्यास खतांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. केळीसाठी ठिबक सिंचनातून खते देताना लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत ८२ ग्रॅ. युरिया, २५० ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८३ ग्रॅ. म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. नंतर ४५ दिवसांच्या अंतराने युरिया ८२ ग्रॅ. द्यावे. १६५ दिवस झाल्यानंतर ८२ ग्रॅ. युरियासोबत ८३ ग्रॅ. म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. २१० दिवसांनी युरियाची मात्रा कमी करून ती ३६ ग्रॅ. पुन्हा ४५ दिवसांच्या फरकाने द्यावी. २५५ दिवसांनंतर ३६ ग्रॅ.युरियासोबत म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅ.लागोपाठ दोन वेळा ४५ दिवसांच्या फरकाने द्यावे. खतांचे एकूण प्रमाण युरिया ४३५ ग्रॅ.,सिंगल सुपर फॉस्फेट २५० ग्रॅ., म्युरेट ऑफ पोटॅश ३३२ ग्रॅ. असे असावे. थंडीत फळांची योग्य वाढ होण्यासाठी पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट ०.५ %+ युरिया १ %+ स्टीकर एकत्र मिसळून घडांवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन : केळी पिकास एकूण १८०० ते २००० मिमी. पाणी लागते. केळी पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवदेनशील असून केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त ठरते. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होऊन तण नियंत्रण होते, तसेच केळी पिकाची वाढ जलद व जोमाने होऊन पीक तयार होण्याचा कालावधीही कमी होतो.बाष्पीभवनाचा वेग,जमिनीची प्रतवारी, वाढीची अवस्था इत्यादी बाबींवर पाण्याची गरज अवलंबून असते.

आंतरमशागत :१) केळीची बाग ४ महिन्यांची होईस्तव केळीची नियमित आडवी-उभी कुळवणी करून जमीन भुसभुशीत व तणविरहित ठेवावी; २) झाडाभोवती मातीची भर द्यावी; ३) मुख्य बुंध्याशेजारी येणारी पिल्ले पिकाशी अन्न, हवा, पाणी याबाबत स्पर्धा करतात. त्यामुळे धारदार कोयत्याने ही पिल्ले नियमितपणे कापावीत; ४) केळीची रोगग्रस्त व वाळलेली पाने संपूर्णपणे कापून नष्ट करावीत. झाडावरील कोणतीही हिरवी व निरोगी पाने कापू नयेत; ५) धूर करून कडक थंडीपासून बागेचे संरक्षण करावे; ६) पाण्याच्या मात्रेत बचत व्हावी म्हणून केळीच्या दोन ओळींमध्ये बाजरीचे सरमाड, उसाचे पाचट, जुन्या गव्हाचा भुसार, केळीची वाळलेली पाने, डाळवर्गीय पिकांचे काड अशा सेंद्रिय पदार्थांचे साधारणत: १५ सेंमी. जाडीचे आच्छादन करावे; ७) पानांतून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी केळी पिकावर उन्हाळ्यात (फेब्रुवारी-मे) १५ दिवसांच्या अंतराने ८ % (१० लि. पाण्यात ८०० ग्रॅ.) केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी; ८) घड निसविल्यानंतर घडाच्या ओझ्याने झाड पडू नये म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलिप्रॉपिलीनच्या पट्ट्यांच्या साहाय्याने झाडांना आधार द्यावा.

घड व्यवस्थापन : १) घड पूर्ण निसविल्यानंतर लगेच केळफूल कापावे; २) निर्यातीयोग्य केळी मिळण्यासाठी घडावर ६ ते ८ फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळ्याने कापून टाकाव्यात; ३) केळीचा घड पूर्ण निसविल्यानंतर व केळफूल तोडल्यानंतर घडावर ०.५ % पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट + १.० % युरिया + स्टीकर यांची एकत्रित फवारणी करावी. यामुळे फळांची लांबी व घेर वाढून वजनातही वाढ होते; ४) यानंतर केळीचा घड ०.५ मिमी. जाडीच्या ७५ × १०० सेंमी. आकाराच्या ६% सच्छिद्र पिशव्यांनी झाकावा. यामुळ घडाचे ऊन, पाऊस, धूळ, कीड यांपासून संरक्षण होऊन घडाची प्रत सुधारते व वजनातही वाढ होते.

घड अडकणे : निसवणीची अवस्था ही केळी पिकातील संवेदनशील अवस्था आहे. थंडीच्या काळात पानातील अंतर कमी होऊन पाने जवळजवळ येतात. त्यामुळे घड बाहेर पडण्याचा मार्ग आकसला जाऊन घड सामान्यपणे बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. या विकृतीस ‘घड अडकणे’ असे म्हणतात. घड खोडातच अडकतो किंवा काही वेळेस घड अनैसर्गिक रीत्या बुंधा फोडून बाहेर येतो. दांडा वेडावाकडा झालेला असतो. अशा घडांची वाढ होत नाही. कालांतराने दांडा मोडून घड खाली पडतो. महाराष्ट्रात लागवडीखाली असलेले बुटक्या (डॉर्फ) कॅन्व्हेडीश गटातील सर्वच वाण या शारीरिक विकृतीच्या बळी पडत असल्याने वेळीच योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

केळी पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खालील उपाय योजावेत : १) केळी बागेस रात्री किंवा पहाटे लवकर पाणी द्यावे. बागेभोवती रात्रीच्या वेळेस ओला व वाळलेला कचरा एकत्र मिसळून फक्त धूर होईल अशा पद्धतीने जाळावा. त्यामुळे तापमान वाढण्यास मदत होते; २) बागेची हलकी टिचणी करून माती हलवून भेगा बुजवून घ्याव्यात. त्यामुळे मुळांवर होणारा कमी तापमानाचा थेट परिणाम टाळला जाते. तसेच बुंध्याभोवती सोयाबीनचा भुसा किंवा शेतातील इतर सहज उपलब्ध साहित्य वापरून आच्छादन करावे; ३) घडांना १०० गेज जाडीच्या ६ सच्छिद्रता असलेल्या पॉलिथीन पिशवींचे आवरण घालावे; ४) केळीचे खोड मोडून लोंबकळत असलेल्या वाकलेल्या परंतु निरोगी पानांनी झाकावे; ५) बागेभोवती चारही बाजूस शेवरी, गजराज, बांबू, सुरु यासारख्या वारा प्रतिबंधक झाडांचे पट्टे दोन ओळीत लावावेत. त्यामुळे थंड वारे अडविले जाऊन केळी बागेचे संरक्षण होते.

विषाणुजन्य रोगांचे व्यवस्थापन : केळी पिकाच्या लागवडीत प्रामुख्याने पर्णगुच्छ (बंचिटॉप), इन्फेक्शीयस  क्लोरोसिस,  स्ट्रिक व्हायरस, ब्रॅक्ट मोझॅक यासारख्या विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. १) लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. लागवडीपूर्वी कंदावर शिफारस केल्याप्रमाणे कंद प्रक्रिया करावी. १०० लि. पाण्यात, १०० ग्रॅ. कार्बेन्डेझिम अधिक १५० ग्रॅ. ॲसिफेट मिसळून औषधी द्रावण करावे व या औषधी द्रावणात कंद कमीत कमी अर्धा तास बुडवून नंतरच   लागवड करावी; २) लागवडीसाठी विषाणू निर्देशांक तपासलेल्या प्रमाणित ऊतीसंवर्धीत रोपांचा वापर करावा; ३) केळी बागेत आंतरपिके म्हणून किंवा केळी बागेच्या आसपास काकडीवर्गीय पिकांची लागवड करू नये; ४) ऊस लागवड असलेल्या भागात केळीची लागवड टाळावी; ५) रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावीत; ६) परप्रांतातून  किंवा इतर जिल्ह्यातून कंद आणून लागवड करू नये; ७) बागेत रोगाची लक्षणे दिसल्यास ५०० ग्रॅ. कार्बेन्डॅझिम किंवा १२५० ग्रॅ. कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा १२५० ग्रॅ. मॅन्कोझेब किंवा ५०० मिलि. प्रॉपिकोनॅझोल यांपैकी एका बुरशीनाशकाची ५०० मिलि. स्टिकरसहित ५०० लि. पाण्यातून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने वरीलपैकी एका बुरशीनाशकाच्या २-३ फवारण्या कराव्यात; ८) लागवडीचे अंतर, योग्य खतमात्रा, पाण्याचे नियोजन, तणनियंत्रण आणि एकंदरीतच बागेचे व्यवस्थापन या गोष्टी रोगनियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

उत्पादन : केळी लागवडीपासून साधारणत: ७ ते ९ महिन्यात घड निसवतात. त्यानंतर वाण व हंगाम यानुसार घड परिपक्व होण्यास सर्वसाधारणपणे ९० ते १२० दिवस लागतात. घडातील केळी तयार होताना फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन तो फिकट पिवळसर होतो, फळावरील कडा नष्ट होऊन फळास गोलाई येते. फळांवर टिचकी मारली असता धातूसारखा आवाज येतो. म्हणजे घड तयार झाला आहे, असे समजावे. धारदार विळ्याने घडाचा दांडा झाडापासून वेगळा करून कमीत कमी हाताळणी करून घड इच्छित स्थळी न्यावेत. घडांची काढणी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी करावी. केळीचे सरासरी प्रती हेक्टरी ७० ते ८० मे.टन उत्पादन मिळते.

संदर्भ :

  • Haarer,A.E.Modern Babana production,London,1964.

समीक्षक – भीमराव उल्मेक

प्रतिक्रिया व्यक्त करा