नागार्जुन : (दुसरे शतक). एक श्रेष्ठ बौद्ध आचार्य, माध्यमिक संप्रदायाचा प्रवर्तक व तत्त्ववेत्ता. सातवाहन राजा यज्ञश्री गौतमीपुत्र (कार.१६६–९६) हा नागार्जुनाचा समकालीन असून हे दोघे जवळचे मित्र होते. सुहृल्लेख नावाचे सध्या ग्रंथरूपात उपलब्ध असलेले पत्र नागार्जुनाने यज्ञश्रीलाच लिहिले होते, असा अनेक विद्वानांचा समज आहे. नागार्जुनाचा जन्म आंध्र प्रदेशात कृष्णा तीरावरील एका गावी किंवा काही विद्वानांच्या मते दक्षिण कोसल म्हणजे विदर्भात ब्राह्मण कुलात झाला. त्याच्या जन्मासंबंधी अनेक चमत्कारकथा प्रचलित आहेत. कुमारजीवाने ४०५च्या सुमारास लिहिलेले व चिनी भाषेत उपलब्ध असलेले नागार्जुनाचे एक चरित्र आहे.

तिबेटी ग्रंथांतही नागार्जुनासंबंधी काही आख्यायिका आहेत. त्याने संपूर्ण ‘त्रिपिटक’ ग्रंथ केवळ ९० दिवसांत वाचून काढले; पण त्याचे समाधान झाले नाही. म्हणूनच तो महायानाकडे वळला. हिमालयातील एका भिक्षूने महायानसूत्रांकडे त्याचे लक्ष वेधले. तिबेटी परंपरेनुसार तो नालंदा येथेही होता, असे दिसते; पण आंध्र प्रदेशात श्रीशैलम् पर्वतावरच त्याचे वास्तव्य अधिक काळ होते, असे दिसते. नागार्जुनाचे बहुतांश वास्तव्य धान्यकटक वा धरणीकोट (जि. गुंतूर) येथे होते व तेथे त्याने एक विहारही बांधला होता, असे तारानाथादी काही अभ्यासक मानतात. चिनी प्रवासी ह्युएनत्संग (सातवे शतक) ह्याने बौद्ध धर्माच्या ज्या चार तेजस्वी सूर्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यांत नागार्जुनाचा समावेश आहे.
नागार्जुनाची शिष्यपरंपरा : नागार्जुनाचा शिष्य आर्यदेव (दुसरे शतक) असून त्याचा उपलब्ध संस्कृत ग्रंथ चतुःशतक हा होय. नागार्जुनाच्या परंपरेतच पाचव्या शतकात कुमारजीव हा मोठा पंडित होऊन गेला. त्याने अनेक संस्कृत ग्रंथांची चिनी भाषेत भाषांतरे केली. संघरक्षिताचे बुद्धपालित व भावविवेक (पाचवे शतक) हे दोन प्रसिद्ध शिष्य. त्यांनी अनुक्रमे प्रासंगिक आणि स्वातंत्रिक पद्धतींचा अवलंब करून शून्यता सिद्धांताचे आपापल्या ग्रंथांत समर्थन केले. माध्यमिक तत्त्वज्ञानाचा प्रसिद्ध अध्वर्यू चंद्रकीर्ती (सहावे शतक) याने बुद्धपालिताच्या प्रासंगिक पद्धतीचा वापर करून आपल्या प्रसन्नपदा ह्या मूलमध्यमककारिकेवरील भाष्यात शुन्यतेचे समर्थन केले. चंद्रकीर्तीनंतरचा या परंपरेतील पंडित म्हणजे जयदेवशिष्य शांतिदेव (सातवे शतक) हा होय. ह्या परंपरेतील आचार्यांनी विविध ग्रंथ व टीका लिहून माध्यमिक मताचा विकास घडवून आणण्यास हातभार लावला.
बौद्धांच्या शून्यतावादाचा पुरस्कर्ता म्हणून नागार्जुनाचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात येतो. बौद्ध तत्त्वज्ञानात नागार्जुनाने स्वतःचे युग निर्माण करून त्या तत्त्वज्ञानास वेगळे वळण दिले. नागार्जुनाच्या योग्यतेचा द्वंद्वीयतावादी (Dialectician) जगाच्या इतिहासातही अन्य कुणी आढळत नाही, असा अभिप्राय अनेकांनी व्यक्त केला आहे.
ग्रंथरचना : नागार्जुनाच्या नावावर अनेक ग्रंथ मोडत असले, तरी त्यांतील प्रज्ञापारमितेवरील महाप्रज्ञापारमिता नावाची संस्कृतमध्ये लिहिलेली टीका व मूलमध्यमककारिका नावाचा एक संस्कृत ग्रंथ तसेच त्यावरील अकुतोभया नावाची टीका एवढेच ग्रंथ सर्वमान्य आहेत. त्याची मूळ महाप्रज्ञापारमिता आता नष्ट झाली असून तिचे कुमारजीवकृत चिनी भाषांतर मात्र उपलब्ध आहे. ह्या चिनी भाषांतराचे प्रा. लामॉत (१००पैकी १८प्रकरणांचे) यांनी फ्रेंचमध्ये भाषांतर केले आहे. अकुतोभया ही टीकाही आता संस्कृतमध्ये उपलब्ध नाही; तथापि तिचे तिबेटी व चिनी अनुवाद उपलब्ध आहेत.
तत्त्वज्ञान : नागार्जुनाच्या माध्यमिक संप्रदायाचे मत म्हणजे कोणत्याही वस्तूचे, संभवनीय अशा चारपैकी कोणत्या तरी एका प्रकारे, वर्णन करता येते किंवा चारपैकी एका प्रकारचे विधान करता येते, असे सर्व तत्त्वज्ञ मानतात. हे प्रकार वा ही विधाने म्हणजेच कोटी. नागार्जुनाच्या मते हे चार प्रकार, विधाने वा कोटींपैकी कोणताही प्रकार, विधान वा कोटी कोणत्याही वस्तूस लागू पडू शकत नाही. म्हणजे कोणत्याही वस्तूबद्दल कसलेही विधान करता येत नाही; वस्तू ‘चतुष्कोटिविनिर्मुक्त’ म्हणजे चार प्रकारच्या विधानांमध्ये सापडत नाही; असे नागार्जुन म्हणतो. त्या चार कोटी अशा : (१) ‘आहे’, असेही नाही; (२) ‘नाही’, असेही नाही; (३) ‘आहे व नाही’, असेही नाही व (४) ‘आहे’, असेही नाही किंवा ‘नाही’, असेही नाही. कोणतेही विधान न करता त्यासंबंधी कोणतेही निश्चित मत देता येणे शक्य नाही, अशी भूमिका बाळगणे हेच योग्य होय. नागार्जुनाला अभिप्रेत असणारे सत्य हे ‘चतुष्कोटिविनिर्मुक्त’ असते, असे म्हटले जाते. खरे म्हणजे त्याबाबत मौन पाळणे, हेच त्याचे खरे उत्तर होय.
नागार्जुनापर्यंत बौद्ध तत्त्वज्ञानात केवळ ‘पुद्गलशून्यता’च मानली जात होती. म्हणजे व्यक्तीच्या अंतर्यामी पुद्गल किंवा आत्मा नावाची चिरंतन अशी वस्तू नाही, असे मानले जाई. नागार्जुनाने पुद्गलशून्यता तर मान्य केलीच, पण याहीपुढे जाऊन ‘धर्म-शून्यता’ही मान्य केली. म्हणजे बाह्य जगात दिसणाऱ्या सर्व गोष्टी वा धर्म (असलेली वस्तू) यांनाही स्वतःचे अस्तित्व (स्व-भाव) नाही. म्हणजे त्या वस्तूंचे अस्तित्व अन्य वस्तूंवर अवलंबून आहे. म्हणजेच त्यांचे अस्तित्व सापेक्ष आहे, निरपेक्ष वा स्वतंत्र नाही. ह्या वस्तू ‘प्रतीत्यसमुत्पन्न’ आहेत किंवा त्यांना कारणभूत असणाऱ्या अन्य गोष्टींवर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. मनुष्यही पंचस्कंधात्मक असल्याने म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या स्कंधांवर त्याचे अस्तित्व अवलंबून असल्याने तोही प्रतीत्यसमुत्पन्नच आहे. याचाच अर्थ त्याला ‘स्व-भाव’ नाही, स्वतःचे असे स्वतंत्र, निरपेक्ष अस्तित्व त्याला नाही. पारमार्थिक दृष्ट्या त्याला अस्तित्व नाही. तो किंवा इतर सर्वच गोष्टी याप्रमाणे ‘स्व-भावशून्य’ आहेत.
शून्यतेचा अर्थ : स्थविरवादी बौद्धांनीही जेव्हा ‘शून्य’ शब्द वापरला, तेव्हा तो ‘आत्मा’ वा ‘आत्मीय’ नसल्यामुळे शून्य–आत्मशून्य–ह्या अर्थाने वापरला आहे. नागार्जुनाने हा शब्द जेव्हा बाह्य धर्मांच्या बाबतीत वापरला, तेव्हा तो स्व-भावशून्यता ह्या अर्थाने वापरला आहे. नागार्जुनाच्या ह्या ‘शून्यता’ शब्दामुळे अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. बाह्य जगत ‘शून्य’ आहे, असे नागार्जुन म्हणतो. तेव्हा त्याचा असाही अभिप्राय सांगता येतो : जगाला मुळी अस्तित्वच नाही, असा येथे त्याच्या म्हणण्याचा अर्थ नसून बाह्य जगाचे अस्तित्व हे सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही असेच त्याला म्हणायचे असते. अन्य कारणभूत गोष्टींवर बाह्य जगाचे अस्तित्व अवलंबून आहे. ह्या कारणभूत असलेल्या गोष्टीही अनित्य, विपरिणामधर्मी आहेत, चिरंतन नाहीत. म्हणून बाह्य जगतही चिरकाल न टिकणारे, विपरिणामधर्मी, क्षणोक्षणी बदलणारे असेच आहे. ज्याला प्रतीत्यसमुत्पाद किंवा कार्यकारणाचा दंडक म्हणतात, त्यालाच आम्ही शून्यता म्हणतो, असे आपल्या मूलमध्यमककारिकेत (२४·१८) नागार्जुनाने स्पष्ट केले आहे. हा प्रतीत्यसमुत्पादाचा दंडकच खरा अस्तित्वात आहे; हाच सर्व गोष्टींचे नियमन करणारा आहे आणि जगाच्या बुडाशी असलेले हेच परमतत्त्व आहे. नागार्जुनापूर्वीचे बौद्ध तत्त्वज्ञ जगाच्या बुडाशी बहुविध तत्त्वे आहेत, असे मानत होते. नागार्जुनाने त्या बहुविध तत्त्वांऐवजी एकच एक परमतत्त्व मानून बौद्ध तत्त्वज्ञानात क्रांती घडवून आणली.
परमार्थसत्य व संवृतिसत्य : शून्यतेचा विचार हा पारमार्थिक दृष्ट्या झाला. व्यावहारिक दृष्ट्या सर्वच लोकव्यवहार सुरळीतपणे चाललेले असतात. ते लोकसंमत असे सत्यच आहे. संवृतिसत्य म्हणजे लोकसंमत सत्य वा ‘व्यावहारिक’ सत्य. लोकसंमत सत्याच्या दृष्टीने जगताला अस्तित्व आहे. पारमार्थिक दृष्टीने मात्र जग शून्य आहे. पारमार्थिक सत्याचा उपदेश करतानाही लौकिक संकेतांचा किंवा लोकसंमत भाषेचा उपयोग केल्यावाचून भागत नाही, असे नागार्जुन आपल्या कारिकेत (२४·१०) म्हणतो.
पारमार्थिक दृष्ट्या सर्वच धर्म स्व-भावशून्य असल्यामुळे बाह्य जगत किंवा निर्वाण ही दोन्हीही एकाच मालिकेत येतात आणि त्यांत फरक मानण्याचे कारणही उरत नाही. ह्याचाच परिणाम म्हणून पुढे तांत्रिक बौद्ध धर्मात महासुख म्हणजेच निर्वाण होय, अशी कल्पना रूढ झाली. बौद्धांच्या महायान पंथातील माध्यमिक संप्रदायाचा नागार्जुन हा प्रणेता तर आहेच; पण ह्या संप्रदायातील सर्वश्रेष्ठ भाष्यकार, द्वंद्वीय पद्धतीच्या युक्तिवादाचा अवलंब करणारा असामान्य तर्कवेत्ता व बौद्ध तत्त्वज्ञानाचा जो वरवर भासणारा संशयवादी सूर आहे, त्याला भक्कम असा भावरूप अर्थ प्राप्त करून देणारा चिकित्सक तत्त्वज्ञही आहे. त्याचे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील कार्य भारतीय दर्शनांच्या इतिहासात अनन्यसाधारण असून भारतीय दर्शनांवर, विशेषतः आद्य शंकराचार्यांवर, त्याचा खूपच प्रभाव पडला आहे. चिनी व तिबेटी तत्त्वज्ञानावरही त्याचा प्रभाव विशेष आहे. त्याला ‘बोधिसत्त्व’ व ‘आर्य’ अशा उपाधी होत्या. त्याच्या काही मूर्तीही कोरलेल्या आढळतात. त्यांवरून त्याचे महत्त्वाचे व पूजनीय स्थान सूचित होते.
संदर्भ :
- Bhattacharya, Vidhushekhara; Ed. & Trans. Mahayanavimsaka, Calcutta, 1931.
- Murti, T. R. V. The Central Philosophy of Buddhism, London, 1955.
- Poussin, L. de La V Ed. Madhyamakavrtti (Mulamadhyamakakarikas), St. Petersburg, 1913.
- Venkat Raman, K. Nagarjuna’s Philosophy, Tokyo, 1966.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.