कागदी लिंबू हे महत्त्वाचे लिंबूवर्गीय फळ असून महाराष्ट्रात या फळपिकाखाली ३०,३२८ हे. क्षेत्र आहे. महाराष्ट्राचे अनुकूल हवामान, योग्य जमीन आणि ओलिताची उपलब्धता लक्षात घेता या फळपिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
हवामान : कागदी लिंबू या फळपिकास उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे. कमी ते मध्यम पर्जन्यमान आणि १०° से. ते ४०° से. तापमान असलेल्या भागात या झाडाची यशस्वीपणे लागवड करता येते.
जमीन : कागदी लिंबू बहुवर्षायू फळझाड असल्याने जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी व ६.५ ते ८.० सामू (आम्ल-विम्लता निर्देशांक) असलेली जमीन लिंबू लागवडीकरिता निवडावी. अतिभारी, पाणथळ, चोपण, रेताड व खडकाळ जमीन लिंबू लागवडीसाठी योग्य नाही.
पूर्वमशागत : लागवडीपूर्वी जमीनीची उभी-आडवी नांगरट करून व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.लागवड चौरस पद्धतीने ६.० X ६.० मीटर अंतरावर करावी. यासाठी उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात निवडलेल्या जमिनीत १ X १ X १ मी. आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डे उन्हाळ्यात १५ दिवस तापल्यानंतर चांगली माती किंवा पोयटा, ४ ते ५ घमेली शेणखत, १ किग्रॅ. निंबोळी पेंड पावडर, १ १/२ ते २ किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅ. क्लोरापायरीफॉस पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
सुधारित जाती : महाराष्ट्रात कागदी लिंबू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक जातीचीच लागवड केली जात असे. परंतु महात्मा फुले कृषि विद्यापीठाने साई-सरबती व फुले सरबती या दोन उत्कृष्ट जाती विकसित केल्या असून या जाती शेतकर्यांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत.
कागदी लिंबाची अभिवृद्धी : महाराष्ट्रात कागदी लिंबाची अभिवृद्धी प्रामुख्याने बी पासूनच करतात. बी पासून अभिवृद्धी करणे ही सोपी व स्वस्त पद्धत आहे.याचे बी बहुगर्भीय असल्याने एका बी पासून ३ ते ४ रोपे मिळतात. कागदी लिंबाची शाखोत्पत्तीने (खुंटावर डोळे भरून) अभिवृद्धी करता येते. परंतु यात योग्य खुंटाची व जातीवंत डोळ्याची निवड महत्त्वाची असते.
कागदी लिंबाची रोपे तयार करण्याकरिता जुलै-ऑगस्ट तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उत्तम वाढलेल्या निरोगी व भरपूर उत्पन्न देणाऱ्या झाडावरील पक्व झालेली मोठ्या आकाराची व कँकर विरहीत फळे निवडावीत.बी काढण्यासाठी फळ आडवे व गोलाकार हलकेच कापून दोन्ही हातांनी अलगद पिळून काप वेगळे करावेत. फळांतून बी काढून ते स्वच्छ पाण्यात टाकावे.पाण्यावर तरंगणारे बी फेकून द्यावे व तळाला गेलेले बी पेरणीकरिता वापरावे. एक किलो बिया २५ ग्रॅ. बाविस्टिन किंवा ब्लॉयटॉक्स चोळून २४ तास सावलीत सुकवाव्यात. असे ताजे बी २ मी X २ मी. आकाराच्या, भरपूर शेणखत वापरून तयार केलेल्या भुसभुशीत गादीवाफ्यात पेरावे. बी पेरताना दोन ओळीत ८ सेंमी. तर दोन बियांत २.५ ते ३.० सेंमी अंतर ठेवावे. बी उगवेपर्यंत म्हणजे ३ ते ४ आठवडे शक्यतो झारीने पाणी द्यावे व बी उगवल्यानंतर काळजीपूर्वक पाटपाणी द्यावे.
रोपांची निवड : महाराष्ट्रात कागदी लिंबूची लागवड बियांपासून केली जाते. रंगपूर लिंबू या खुंटावर डोळा भरून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरण्यास योग्य असतात. बियांपासून केलेली रोपे लागवडीच्या वेळेस पूर्णत: रोगमुक्त असतात. म्हणून महाराष्ट्राच्या हवामानात बियांपासून तयार केलेलीच रोपे लावावीत. रोपे नेहमी खात्रीशीर व नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच खरेदी करावीत.
लागवड : पावसाळा सुरू झाल्यानंतर रोपांची लागवड करावी. रोपांच्या मुळांचे आकारमान व वाढ लक्षात घेऊन खड्ड्यातली माती बाजूला करावी. रोप त्याच्या मूळ स्थितीत लावून मुळांना इजा होणार नाही अशा बेताने माती घट्ट दाबावी. रोप लावल्यानंतर आळे करून लगेच पाणी द्यावे. रोपे लागवडीच्या वेळी, शेंड्याकडील ४ ते ५ पाने ठेवून बाकी सर्व पाने काढून टाकावीत. तसेच लागवडीपूर्वी रोपे कोणत्याही एका आंतरप्रवाही कीटकनाशकात व कॉपर ऑक्सिक्लोराइडच्या द्रावणात बुडवून लावावीत.
लागवडीनंतरची काळजी : दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पन्न मिळण्यासाठी लिंबूच्या झाडांचे खोड मजबूत होणे आवश्यक आहे. तसेच झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी व हवा खेळती राहण्यासाठी झाडांना वळण देणे आवश्यक आहे. परंतु पहिली दीड वर्षे कसलीच छाटणी करू नये. रोपे दोन वर्षांची झाल्यावर वळण द्यावे. त्यासाठी आवश्यक तेवढीच छाटणी करावी. मुख्य खोडावर आलेली फूट अंकुर अवस्थेत असतानाच नियमित काढत रहावी. दाट झालेल्या व रोगट फांद्या आणि पाणसोट काढून टाकावेत. छाटणी केलेल्या जागेवर ताबडतोब बोर्डोपेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइडची पेस्ट लावावी. रोपांना नियमित पाणी द्यावे. तसेच शिफारस केल्याप्रमाणे औषध फवारणी करावी.
अन्नद्रव्यांचा पुरवठा : लिंबाच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी व अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी नियमित खत पुरवठा आवश्यक आहे. झाडाच्या वयोमानानुसार खालीलप्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात.
तक्ता : लिंबाच्या झाडाच्या वयोमानानुसार खतांच्या मात्रा.
झाडाचे वय | खतांची मात्रा देण्याची वेळ | ||
जून | ऑक्टोबर | फेब्रुवारी | |
प्रथम वर्ष | लागवडीपूर्वी शेणखत २० किग्रॅ., सिंगल सुपर फॉस्फेट २ कि.ग्रॅ., निंबोळी पेंड १ कि.ग्रॅ. | नत्र ५० ग्रॅ. | नत्र ५० ग्रॅ. |
दुसरे वर्ष | शेणखत २० कि., नत्र १०० ग्रॅ., निंबोळी पेंड २ किग्रॅ. | नत्र ५० ग्रॅ. | नत्र ५० ग्रॅ. |
तिसरे वर्ष | शेणखत ३० किग्रॅ., नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी १५० ग्रॅ. किंवा सुफला (१५:१५:१५) १ किग्रॅ., निंबोळी पेंड २ किग्रॅ. | नत्र १०० ग्रॅ. | नत्र १०० ग्रॅ. |
चौथे वर्ष | शेणखत ४५ किग्रॅ., सुफला (१५:१५:१५) २ किग्रॅ., नत्र २५० ग्रॅ., निंबोळी पेंड १.५ किग्रॅ., म्युरेट ऑफ पोटॅश ५०० ग्रॅ. | नत्र १५० ग्रॅ. | नत्र १५० ग्रॅ. |
पाचव्या वर्षापासून पुढे चौथ्या वर्षाची मात्रा कायम ठेवावी. त्याचबरोबर ५०० ग्रॅ. व्हॅम + १०० ग्रॅ. पीतसबी + १०० ॲझोस्पिरिलम + १०० ग्रॅ. ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे.याशिवाय जुलै व मार्च महिन्यात ०.५ % झिंक सल्फेट, ०.५ % मॅग्नेशियम सल्फेट, ०.५ % मँगॅनीज सल्फेट आणि ०.५ % फेरस सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन : कागदी लिंबूच्या झाडांना उन्हाळ्यात ८ ते १० व हिवाळ्यात १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी दुहेरी आळे पद्धतीचा अवलंब करावा. प्रमाणापेक्षा जास्त पाणी देऊ नये.
आंतरपिके : सुरुवातीच्या ३ ते ४ वर्षांच्या काळात, झाडाच्या बुंध्यापासून दोन्ही बाजूस एक मीटर अंतर सोडून राहिलेल्या जागेत भुईमुग, उडीद, श्रावण घेवडा, कांदा, लसूण, कोबी, कलिंगड, मेथी यांसारखी आंतरपिके घ्यावीत.
तणांचे नियंत्रण : लागवडीपूर्वी तणांचा नायनाट करावा. खुरपणी किंवा चाळणी करून लव्हाळा व हराळी सोडून इतर तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी. हराळी व लव्हाळा या तणांच्या नियंत्रणासाठी ग्लायफोसेट ४१ एस.एल. (०.४ ते ०.५ % क्रियाशील घटक) हे तणनाशक वापरावे. या तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर पहिली फवारणी व त्यानंतरच्या दोन फवारण्या गरजेनुसार तणांची पुनर्उगवण आढळून आल्यानंतर द्याव्यात. तणनाशकाचे द्रावण तयार करण्यासाठी १० लि. पाण्यात १००-१२० मिली. ग्याफॉसेट अधिक १००-१२० ग्रॅ. युरिया मिसळावा.
बहार व्यवस्थापन : कागदी लिंबूला वर्षभर फुले-फळे येतात. त्यामुळे कागदी लिंबूत विशिष्ट बहार घेणे शक्य होत नाही. कागदी लिंबूत हस्त बहार महत्त्वाचा असून हा बहार ऑक्टोबरमध्ये येतो. या बहारात फुलोऱ्याचे प्रमाण फक्त १५ ते १६ % असते. जून महिन्यात ५० पी.पी.एम. तीव्रतेचे जिब्रेलिक आम्ल, तर सप्टेंबर महिन्यात १००० पीपीएम तीव्रतेच्या सायकोसिलची आणि ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केल्यास हे प्रमाण वाढू शकते. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सायकोसिलचे १००० पी.पी.एम. तीव्रतेच्या दोन फवारण्या एका महिन्याच्या अंतराने देऊन ऑक्टोबरमध्ये एन.ए.ए. या संजीवकाचा २५ पी.पी.एम. तीव्रतेचा फवारा द्यावा. लिंबू पिकास विशिष्ट बहारासाठी ताण दिला तर अगोदरच्या बहाराची फळे अपक्व अवस्थेतच गळून पडतात.
कीड व रोग नियंत्रण : कागदी लिंबूवर अनेक रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- खैर्या रोग (कँकर) : लिंबू झाडाच्या सर्वच भागांवर देवीच्या व्रणासारखे खरबरीत ठिपके दिसून येतात. हा रोग झॅन्क्थोमोनास या अणुजीवांमुळे होतो. याच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅ. + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅ. १० लि. पाण्यात मिसळून ३ ते ४ फवारण्या महिन्याच्या अंतराने कराव्यात. पायकूज, मूळकूज व डिंक्या – हा रोग फायटोप्थेरा नावाच्या बुरशीमुळे होतो. याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब २० ग्रॅ. किंवा कॅप्टन २० ग्रॅ. किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड १० लि. पाण्यात मिसळावे व झाडाच्या खोडाशेजारी या द्रावणाचे गुळवणी (ड्रेचिंग) करावी. पावसाळ्यापूर्वी फोसेटाईल – अल या बुरशीनाशकाची (३० ग्रॅ.प्रति १० लि. पाणी) फवारणी करावी. पावसाळ्यानंतर खोडावर ६० ते ९० सेंमी. उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी.
- शेंडेमर : कोलेटोट्रीकस या बुरशीमुळे होणार्या या रोगाच्या नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी कार्बन्डॅझीम १० ग्रॅ. किंवा २० ग्रॅ. मॅन्कोझेब किंवा ३० ग्रॅ. कॉपर ऑक्सिक्लोराइड १० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- ट्रीस्टेझा : या विषाणुजन्य रोगामुळे पाने निस्तेज होऊन गळतात. याचा प्रसार मावा किडीमुळे होतो.
कीड :
- पाने खाणारी अळी : या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १० मिली. १० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
- पाने पोखरणारी अळी : या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड (२० एसएस) २.५ मिली किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) १० ग्रॅ. प्रति १० लि. पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- मावा : पानातील रस शोषून घेणारी ही कीड ट्रीस्टेझा रोगाचा प्रसार करते. याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मिली. किंवा क्विनॉलफॉस २० मिली. १० लि. पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- सिट्रस सायला : ही कीड नवीन पालवीतील रस शोषून घेते. त्यामुळे फूलगळती होते. याच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड (१७.८ एस.एल) ४ मिली. किंवा असिफेट (७५ ईसी) १५ ग्रॅ. १० लि. पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
- पिठ्या ढेकूण : या किडीच्या प्रादुर्भावामुळे पाने व फुले पिवळी पडून गळतात. याच्या नियंत्रणासाठी क्लोरापायरीफॉस (२० ईसी) २५ मिली. किंवा डायक्लोरोव्हॉस १० मिली किंवा व्हर्टीसिलियम लेकॅनी हे जैविक कीटकनाशक ४० ग्रॅ. १० लि. पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन-तीन फवारण्या कराव्यात.
- लाल कोळी : फळाच्या सालीतील व पानांतील रस शोषून घेणार्या या किडीच्या नियंत्रणासाठी डिकोफॉल १५. मिली किंवा पाण्यात विरघळणारी गंधकाची भुकटी ३० ग्रॅ. १० लि. पाण्यात मिसळून फवारावी.
फळांची काढणी व उत्पादन : कागदी लिंबूला साधारणत: चौथ्या किंवा पाचव्या वर्षापासून फळधारणा सुरू होते व वर्षातून ३ वेळेस बहार येतो. हंगामानुसार बहार आल्यापासून ५ ते ६ महिन्यात फळ तयार होते. पिवळसर झालेली फळे तोडावीत.फळे तोडल्यानंतर त्वरीत सावलीत आणावीत व आकारमानानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केलेली फळे कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करून बांबूच्या करड्यांमध्ये किंवा पोत्यामध्ये भरून विक्रीसाठी पाठवावीत.शास्त्रोक्त पद्धतीने बागेची निगा राखल्यास पूर्ण वाढलेल्या निरोगी झाडापासून प्रति वर्षी सरासरी दोन ते अडीच हजार फळे मिळू शकतात. साई-सरबती या जातीपासून प्रति वर्षी प्रति झाडापासून ३ ते ४ हजार फळे मिळतात.
समीक्षक – भीमराव उल्मेक.
छान आहे