मराठ्यांची मोगलांविरुद्ध झालेली एक इतिहासप्रसिद्ध लढाई. कर्नाटक राज्यातील म्हैसूरशेजारी चितळदुर्ग (चित्रदुर्ग) येथील दोद्देरीत (दोड्डेरी) मराठ्यांचे सेनापती संताजी घोरपडे व मोगल सरदार कासिमखान यांच्यात ही लढाई झाली (१६९५-९६). या लढाईत संताजीने आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविली.
कासिमखान हा म्हैसूर इलाख्याचा मोगल फौजदार होता. याच परिसरामध्ये संताजीदेखील वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. संताजीचा पूर्ण नाश घडवून आणण्याचे आदेश औरंगजेबाने कासिमखानला दिले होते. कासिमखानने पाऊल उचलण्याच्या आधीच संताजी मोगल सैन्याच्या जवळपास येऊन पोचला. कासिमखानने युद्धाची तयारी केली होती. रुहुल्लाखान व इतर सरदारदेखील त्याच्या मदतीला आले. मराठ्यांनी रुहुल्लाखानच्या तुकडीवर पाठीमागून हल्ला केला. सात–आठ हजार मराठा सैन्य रुहुल्लाखान आणि कासिमखान यांच्या सैन्यात घुसले. मराठ्यांच्या वेगवान हालचालींमुळे कासिमखान व रुहुल्लाखान यांचे सैन्य विभागले गेले. संताजीच्या सैन्यासमोर मोगलांच्या सैन्याचा निभाव लागेनासा झाला. मराठ्यांनी मोगलांचे साहित्य, अन्नसामग्री इ. नष्ट करून टाकली. माणसांना आणि जनावरांनादेखील खाण्यास अन्न उरले नाही. मोगलांनी ही रात्र कशीबशी जागून काढली.
दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच पुन्हा युद्धाला तोंड फुटले. मोगलांचा मातब्बर सरदार मिर्झा हसन आणि त्याचे सैनिक मराठ्यांकडून मारले गेले. मराठ्यांनी मोगल सैन्याचे तीन दिवस अतोनात हाल केले. यामुळे कासिमखानने माघार घेऊन दोद्देरी किल्ल्यात तळ ठोकला. पाठलाग करत पाठोपाठ मराठेदेखील दोद्देरीला पोचले. मोगलांना दोद्देरीच्या गढीत तात्पुरता आसरा मिळाला. संताजीने मराठी सैन्याचे तीन भाग केले. एक तुकडी मोगलांचे तंबू, राहुट्या व इतर सामानसुमान लुटण्यास पाठविली. दुसरी तुकडी आपल्या बरोबर घेऊन स्वतः संताजीने मोगलांवर चौफेर हल्ला चढविला. तिसरी तुकडी राखीव म्हणून संकटकाळी साहाय्य करण्यास ठेवली. कासीमखानला मराठ्यांचे सैन्य किती आहे याचा अंदाजच नव्हता. तो काही विचार न करता लढण्यासाठी पुढे आला. त्याच्या सैन्याची मराठ्यांनी प्रचंड कत्तल केली. हे पाहून खानजादाखान कासिमखानच्या मदतीला आला; पण मराठ्यांनी या दोघांचाही पराभव केला. कासीमखान, खानजादाखान, रुहुल्लाखान आणि सफशिकनखान यांनी दोद्देरीच्या गढीचा आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. गढीतील मोगल सैन्याने पराभूत मोगल सैन्याला गढीत घेण्यास नकार दिला. त्यांनी गढीचे दरवाजे लावून घेतले. कासीमखान, खानजादाखान, रुहुल्लाखन आणि सफशिकनखान यांनी मोठ्या कष्टाने गढीत प्रवेश केला.
दोद्देरीच्या गढीच्या शेजारी तलाव होता. तेथे आपला तळ ठोकून मराठ्यांनी मोगलांचे पाणी तोडले. संताजीने मोठ्या फौजेनिशी गढीला वेढा देऊन मोगल सैन्याला आत कोंडले. गढीत साठा करून ठेवलेले धान्य कासीमखानने मोगल सैन्यात वाटून टाकले. धान्य संपल्यावर सैन्यातील लोकांनी प्राणी मारून खायला सुरुवात केली. मराठ्यांवरील परतीच्या हल्ल्याने गढीतील मोगलांचा दारुगोळा संपला, प्राणी मृत पावले, रोगराई पसरली आणि मोगल सैन्याची दुर्दशा झाली.
मोगल सैन्याकडे पैसा मात्र भरपूर राहिला होता. मराठ्यांनी याचा फायदा घेण्याचे ठरविले. अन्नधान्य घेऊन मराठे गढीच्या भिंतीपर्यंत जात व मोगल सैन्याला चढ्या भावाने अन्नधान्य विकत असत. गढीतील लोक रुपयांच्या पुड्या तटावरून खाली सोडत आणि खाण्याच्या वस्तू वर ओढून घेत होते. काही अभ्यासकांच्या मते, मोगल सरदार कासिमखान याला अफूचे व्यसन होते. गढीत कोंडला गेल्याने त्यास अफू मिळाली नाही. शिवाय पराजयाचा तीव्र संताप त्याला झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मराठ्यांनी जोरदार हल्ला चढवून गढीचा एक बुरुजच उखडून टाकला. आपला जीवदेखील वाचणार नाही हे मोगलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मराठ्यांसमोर गुडघे टेकले. रुहुल्लाखान आणि इतर सरदारांनी तडजोडीची बोलणी करण्यास सुरुवात केली. बोलणी करण्यासाठी रुहुल्लाखानचा दिवाण, काही सरदार व मोगल फौजेत असलेला एक दखनी (दक्षिणेतील मुसलमान सरदार) हे सर्व संताजीकडे गेले आणि अटींच्या अधीन राहून तह झाला.
कासिमखानचे हत्ती, घोडे, जडजवाहीर, नगद, सोनेनाणे अशी सर्व संपत्ती संताजीला द्यावी लागली. मोगलांनी सर्व सरदारांवर मिळून दोन लाख होन म्हणजे सात लाख रुपये द्यावे व रक्कम वसूल होईपर्यंत सरदारांनी त्यांचे आप्त किंवा मातब्बर माणसे ओलीस ठेवावीत असे ठरले. तह झाल्यानंतर मराठ्यांनी गढीत कोंडलेल्या मोगल सैन्याला अभय दिले. त्यांना भाकरी आणि पाणी पुरविले. या लढाईत मोगलांनी त्यांची प्रतिष्ठा आणि सर्वस्व गमावले होते, तर संताजीने त्याच्या कारकीर्दीवर कळस चढविला होता.
संदर्भ :
- Kabiruddin, Ahmad; Woolsley, Haig, Ed., Khafi Khan : Muntakhab-ul-Lubab, Calcutta, 1860.
- Sarkar, J. N. History of Aurangzeb, 5 Vols., Calcutta, 1924.
- पगडी, सेतुमाधवराव, नियतीच्या विळख्यात औरंगझेब, हैदराबाद, २०१०.
- पगडी, सेतुमाधवराव, हिंदवी स्वराज्य आणि मोगल, हैदराबाद, २०१०.
- सरकार, जदुनाथ, साकी मुस्तैदखानकृत मासीर – इ- आलमगिरी, कलकत्ता, १९४७.
समीक्षक – सचिन जोशी