
नरक्या हा मध्यम आकाराचा वृक्ष आयकॅसिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव नोथॅपोडाईट्स निम्मोनियाना आहे. या वृक्षाचा वास अत्यंत घाणेरडा असल्याने त्याला घाणेरा असेही नाव आहे. तो मूळचा चीनमधील आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत तो आढळतो. महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यांतील पश्चिम घाट परिसरांत आढळतो.
नरक्या हा वृक्ष ३–८ मी. उंच आणि सरळ वाढतो. त्याची साल करड्या रंगाची असते. खोडावर फांद्यांच्या शाखा व उपशाखा असून पानगळीनंतर पानांच्या देठांच्या खुणा आढळतात. पाने साधी, एकाआड एक, जाड व लंबवर्तुळाकार असून त्यांचा देठाकडील भाग पसरट तर टोकाकडील भाग टोकदार असतो. पानांतील पसरट भाग असमान असतो. उपशाखेच्या टोकाला पानांची गर्दी झालेली दिसते. पानांचे देठ ३–६ मिमी. लांब असतात. फुले द्विलिंगी, पिवळसर व गुच्छात येतात. फुलांना विशिष्ट घाणेरडा वास असतो. फुलांच्या पाकळ्यांवर आतील बाजूला रोम असतात. फळे लंबगोल, मऊ व पिकल्यावर जांभळ्या रंगाची होतात. फळांमध्ये एकच बी असते.
नरक्याच्या खोडात आणि सालीत कँप्टोथेसीन हे कर्करोगावर प्रभावी अल्कलॉइड असते. फुप्फुस, स्तन, गर्भाशय व योनिमुखाच्या कर्करोगांवरील औषधांमध्ये या अल्कलॉइडाचा वापर केला जातो. नरक्याची उपयुक्तता आणि दुर्मिळता लक्षात घेऊन त्याची बेकायदेशीर तोड आणि विक्री यांवर बंदी घातली आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.