नाग (नाजा नाजा)

सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील फणा असलेल्या विषारी सापांना सामान्यपणे नाग म्हणतात. आफ्रिका आणि दक्षिण व आग्नेय आशिया (फिलिपीन्ससह) या सर्व प्रदेशांत नाग आढळतात. ते वेगवेगळ्या अधिवासांत राहतात मात्र झाडांवर ते क्वचितच आढळतात. त्यांच्यापैकी काही मानवीवस्ती जवळही आढळतात. भारतात सर्वत्र आढळणाऱ्या नागाचे शास्त्रीय नाव नाजा नाजा आहे.

पूर्ण वाढ झालेल्या नागाची लांबी सु. १८० सेंमी. असते. शरीराची रुंदी बहुधा सारखी असते. शेपूट २० ते ४० सेंमी. लांब असते. भारतातील नागांचा रंग बहुधा काळा असतो; पोटाकडचा भाग पांढरा किंवा पिवळसर असतो. नागाचे खास लक्षण म्हणजे त्यांचा फणा. याच्या मानेवर लांब बरगड्या असून स्नायूंच्या आकुंचनामुळे दोन्ही बाजूंच्या बरगड्या फाकतात आणि त्वचा ताणली जाऊन फणा तयार होतो. नागाला कुणी डिवचले, तो चवताळला किंवा त्याला भीती वाटली की तो फणा काढतो. अनेक नागांच्या फण्यावर विशिष्ट खुणा असतात. या खुणा नागाने फणा काढला की स्पष्ट दिसतात. काही नागांच्या फण्यावर दोन काळ्या रंगाची वर्तुळे किंवा कडी असतात आणि ती एकमेकांना काळ्या वक्राकार रेषेने जोडलेली असतात. त्यामुळे ती दुरून १० च्या आकड्यासारखी दिसतात. महाराष्ट्रात या प्रकारचे नाग आढळतात. पश्चिम बंगालमध्ये आढळणाऱ्या नागांच्या फण्यावर अंडाकार काळी खूण असून त्याभोवती पांढरी वर्तुळे असतात. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात इ. ठिकाणी आढळणाऱ्या नागांच्या फण्यावर कोणतीही खूण नसते. नागाच्या वरच्या ओठावरील तिसऱ्या क्रमांकाचा खवला तेथील इतर खवल्यांच्या तुलनेत मोठा असतो. हा खवला नाकाच्या खवल्यापासून डोळ्याच्या खवल्यापर्यंतची जागा व्यापतो. नाग ओळखण्याची ही आणखी एक खूण आहे.

नाग (नाजा नाजा)

शरीराच्या मानाने नागाचे डोके लहान असून ते मानेपासून वेगळे नसते. नाकपुड्या उभ्या, मोठ्या आणि लंबगोलाकार असतात. डोळे मध्यम आकारमानाचे असून पापण्या नसतात. त्यांना दूरवरचे स्पष्ट दिसत नाही. त्यांची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. जीभ लहान, नाजूक आणि दुभागलेली असून तिची टोके काळी असतात. नाग आपली जीभ वरचेवर, जरी त्याचे तोंड बंद असले तरी, बाहेर काढतो. वास घेण्याच्या कामी जिभेची मदत होते. तसेच अन्न शोधण्यासाठी, नर किंवा मादी यांना हुडकण्यासाठी तसेच शत्रूचा माग काढण्यासाठी नागाला जीभ उपयोगी पडते. नागाच्या वरच्या जबड्यावर दातांच्या चार ओळी असतात तर खालच्या जबड्यावर दातांच्या दोन ओळी असतात. दात मागे वळलेले आणि अणकुचीदार असतात. वरच्या जबड्यावर मोठे, आत वळलेले व तीक्ष्ण अशा विषारी दातांची (विषदंत) एक जोडी असते. नागाच्या डोक्याच्या बाजूवर बदामाच्या आकाराची विषग्रंथी असते; तिच्यापासून निघालेली एक विषवाहिनी थेट विषदंतांत उघडते. नाग फणा मागे घेऊन शत्रूवर जोरात प्रहार करून दंश करतो. दंश आणि शरीरात विष सोडण्याची क्रिया एकाच वेळी घडते. नागाच्या विषाची मृत्युमात्रा १६–४५ मिग्रॅ. आहे. नाग एकावेळी दंश करताना ८–८५ मिग्रॅ. विष अंत:क्षेपित करतो. एकापाठोपाठ दोन-तीन वेळा दंश करण्याची त्याची सवय असते. नागाचे विष चेतापेशींवर परिणाम करते. त्यामुळे पक्षाघात होतो व श्वसन थांबते. नागाच्या विषातील हायल्युरोनिडेझ या विकरामुळे रक्तातील तांबड्यापेशी फुटतात, रक्तात गाठी होतात आणि श्वसन थांबल्याने हृदय बंद पडून मृत्यू ओढवतो. नागाच्या दंशामुळे मनुष्य उपचाराअभावी काही तासांत मरू शकतो. नागाच्या विषावर (अँटिव्हेनोम) सर्प प्रतिविष अंतःक्षेपण हाच एक उपाय असतो.

उंदीर, घुशी, बेडूक, पक्षी व लहान सस्तन प्राणी हे नागाचे भक्ष्य आहे. भक्ष्य शोधण्यासाठी तो रात्री बाहेर पडतो. पावसाळा हा नागाचा प्रजननकाळ आहे. नर आणि मादी जमिनीवर आडवे पडून मैथुन करतात. मैथुनानंतर ८–१० महिन्यांनी मादी १२–५६, पांढरी व लंबगोलाकार अंडी घालते. अंडी मातीत मिसळलेली असतात व मादी ती उबविते. मादी सतत अंड्यांभोवती राहते. दोन महिन्यांनी अंडी फुटून सु. २० सेंमी. लांबीची पिले बाहेर पडतात. पिलेही जन्मत:च विषारी असतात. जन्मल्यानंतर ती एका महिन्यात तीनदा कात टाकतात. साधारणपणे तीन वर्षांनी ती प्रौढ होतात. नाग इतर सापांप्रमाणे वरचेवर कात टाकतो.

नागाला कान नसतात. त्यामुळे त्याला ऐकू येत नाही. गारुड्याने पुंगी वाजविली की नाग डोलतो, असे मानतात पण ते चूक आहे. पुंगी वाजविताना गारुडी पुंगी हलवितो, हात किंवा पुंगी वर-खाली करतो. या हालचालीकडे नाग टक लावून पाहत असतो व त्यांच्या हालचालीनुसार नाग मानेची हालचाल करतो. या वस्तू हलविल्या नाहीत तर नागही डोलत नाही. नागाचे डोळे बांधून पुंगी वाजविली तर नागावर त्याचा काही परिणाम होत नाही.