अमीर खुसरौ : (१२५३–१३२५). फार्सी भाषेत रचना करणारा प्रख्यात भारतीय कवी व विद्वान.त्याचे संपूर्ण नाव अबुल-हसन यमीनुद्दीन अमीर खुसरौ देहलवी असे असून त्याचा जन्म एटा जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) पटियाली नावाच्या गावी झाला. त्याचे वडील अमीर सैफुद्दीन महमूद हे तुर्कस्तानातील सरदार होते. ते अल्तमशच्या काळात भारतात येऊन स्थायिक झाले.अमीर खुसरौची आई भारतीयच होती.खुसरौ दहा वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले.त्याच्या आजोबांनी (आईचे वडील) व आईने त्याचे पालनपोषण केले.लहान असतानाच खुसरौ निजामद्दीन औलिया या सत्पुरुषाचा अनुयायी बनला.त्याच्याबाबत खुसरौला नितांत आदर व प्रेम होते.

कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संपन्न प्रतिभा त्याला लाभली होती.त्याने लहानपणीच कविता करावयास सुरुवात केली आणि फार्सी,अरबी,तुर्की व हिंदी ह्या भाषा आत्मसात केल्या.दिल्ली येथील राजदरबारात राजकवी म्हणून त्याचे बरेच आयुष्य व्यतीत झाले.कैकुबाद ह्या सुलतानाने त्याला ‘मलिक-उश-शुअरा’ म्हणजे ‘कविसम्राट’ असा किताब बहाल केला होता. इराणातील फार्सी विद्वान त्याचा ‘तूती-ए-हिंद’ (भारताचा पोपट) म्हणून गौरव करीत. त्याने विपुल व दर्जेदार काव्यनिर्मिती केली आहे. तो फार्सीतील प्रख्यात कवी तर होताच परंतु भाषाशास्त्रज्ञ, संगीतकार, गूढवादी व अष्टपैलू विद्वान म्हणूनही त्याने कीर्ती संपादन केली. हिंदुस्थानी संगीतात त्याने उल्लेखनीय भर धालून ते अधिक समृद्ध केले. काही नवीन राग निर्माण करून ते लोकप्रिय केले. उदा., यमन-कल्याण, काफी, बहार, झीलफ, सांजगिरी इत्यादी. तसेच सतार हे वाद्य लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यालाच दिले जाते. त्याला संगीतज्ञांनी ‘नायक’ अशी मानाची पदवी बहाल केली होती. फार्सीतील थोर कवींच्या मालिकेत त्याची गणना केली जाते. त्याच्या काव्यात सखोल अनुभूती,कल्पनाशक्तीची झेप आणि खास भारतीय उपमा व अलंकार यांचा प्रत्यय येतो.त्यामुळेच त्याचे काव्य अतिशय लोकप्रिय झाले.त्याने काही गद्यही लिहिले असून त्यात त्याची स्वतंत्र शैली दिसून येते.भारताविषयी त्याला अपार प्रेम होते. त्याने भारताच्या उच्च व सहिष्णू संस्कृतीचा गौरव केला आहे. नुह सिपिहर या ग्रंथात त्याने इतर देशांच्या तुलनेने भारतीय ज्ञान व विद्या ह्यांना सर्वोच्च स्थान देऊन गौरविले आहे. त्याची ग्रंथनिर्मिती पुढीलप्रमाणे आहे :

पाच कवितासंग्रह (दीवान) : (१) तुहफतुल-सिगर (१२७२), वस्तुल-हयात (१२८५), (३) गुर्रतुल-कमाल (१२९४), (४) बकीया-ए-नकीया (१३१६) आणि (५) निहायतुल-कमाल (१३२४).

पाच ऐतिहासिक खंडकाव्ये (तारीखी मस्‍नवियाँ)  : (१) किरानुस-सअदेन (१२८९), (२) मिफताहुल-फुतूह (१२९१), (३) खिज्रर खाँ दवल रानी (१३१६) (४) नुह सिपिहर (१३१८) आणि (५) तुगलक नामा (१३२४). ही खंडकाव्ये राजांच्या व सुलतानांच्या प्रशंसापर आहेत.

इराणातील प्रसिद्ध फार्सी कवी निजामी-ए-गंजवी (सु.११४१–१२०३) याने ‘खम्सा ’ म्हणजे पाच मस्‍नवियाँ लिहिल्या आहेत. त्याचा आदर्श पुढे ठेवून खुसरौ यानेही १२९८ ते १३०१ या काळात पाच मस्‍नवियाँ लिहिल्या. समीक्षकांच्या मते त्या निजामीच्या रचनेपेक्षाही सरस उतरल्या आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे  होत : (१) मतलअ उ’ ल अनवार, (२) शीरिं खुसरौ, (३) मजनूँ लैला, (४) आईना-इ-सिकंदरी आणि (५) हश्त–बिहिश्त.

तीन गद्य ग्रंथ : (१) खजाइनु’ल फुतृह  (अलाउद्दीन खिलजीच्या काळाचा इतिहास), (२) इअजाजे खुसरवी  (स्फुट लेखांचा संग्रह) (३) अफजलु’ ल फवाइद  (निजामुद्दीन औलिया याच्या वचनांचा व उपदेशाचा संग्रह).

वरील फार्सी भाषेतील ग्रंथांव्यतिरिक्त त्याने हिंदीतही बरीच ग्रंथरचना केली असावी असे मानले जाते. तथापि ती आज उपलब्ध नाही. जवाहरे खुसरवी  नावाचा एक काव्यसंग्रह उपलब्ध असून त्यात त्याचे दोहे, गीत, पहेलियी (कूटकाव्य) आणि फार्सी-हिंदी-मिश्रित काही पदे यांचा समावेश आहे. तसेच खालिक बारी नावाचा त्याचा हिंदी गद्यग्रंथही उपलब्ध आहे. परंतु ह्या दोन्हीही ग्रंथांत इतरांनी मागाहून बरेच बदल केले असल्यामुळे, ते अधिकृत मानले जात नाहीत. एवढे मात्र खरे, की त्याने तत्कालीन हिंदी भाषेत काव्यरचना केली आणि त्यामुळे तो विशेष लोकप्रिय झाला म्हणूनच हिंदी खडी-बोलीचे प्रारंभिक काव्य अमीर खुसरौच्या रचनेत उपलब्ध होते असे मानले जाते.

संदर्भ :

  • Mirza, Wahid, Life and Times of  Amir Khusrau, Calcutta, 1935.

भाषांतरकार – भा. ग. सुर्वे

प्रतिक्रिया व्यक्त करा