मानवाने वसविलेली शहरे, नगरे आणि नागरी पट्ट्यातील पारिस्थितिकीय प्रणाली म्हणजे नागरी परिसंस्था होय. नगरांची उपनगरे व झालर क्षेत्रे तसेच नागरी पट्ट्यांलगतची कृषिक्षेत्रे आणि नैसर्गिक भूदृश्यांचाही समावेश नागरी परिसंस्थेत होतो.
नागरी परिसंस्था ही नागरी क्षेत्रातील जैविक आणि भौतिक घटकांतील आंतरक्रियांतून निर्मित झालेली असते. नागरी परिसंस्थेतील जैविक घटकांत लोकसंख्या, जनसांख्यिकीय वैशिष्ट्ये, संस्थात्मक संरचना, सामाजिक आणि आर्थिक साधने यांचा समावेश होतो. भौतिक घटकांत इमारती, वाहतुकीचे मार्ग, भूपृष्ठांमधील बदल आणि मानवी कृतींमुळे निर्माण झालेले पर्यावरणीय बदल तसेच ऊर्जा वापर आणि आयात पदार्थांचे रूपांतरण व निर्यात यांचाही समावेश होतो. ऊर्जा वापर आणि पदार्थांचे रूपांतरण या कार्यामुळे वाहतूक मार्ग व घरांची निर्मिती होते. परंतु त्याचबरोबर अपशिष्टे, प्रदूषण व अतिरिक्त उष्णता अशा अपायकारक घटकांची निर्मिती होते. सभोवतालच्या इतर परिसंस्थांपेक्षा नागरी परिसंस्था अधिक तापमानाच्या किंवा उबदार असतात. पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होत असल्यामुळे मृदेत पाणी कमी प्रमाणात झिरपते. शहरामध्ये धातू, कॅल्शियमयुक्त धूळ, खते, कीटकनाशके, औषधांशी निगडित दूषित द्रव्ये, वैयक्तिक वापरासाठीची उत्पादने अशी मानवनिर्मित संयुगे साठली जात असतात.
नागरी क्षेत्रांच्या विस्तारामुळे तेथील वने, आर्द्रभूमी, ओसाड भाग आणि लगतचे जीवसंहती क्षेत्र यांचे रूपांतरण निवासी, औद्योगिक, व्यापारी आणि वाहतूक मार्ग या क्षेत्रांत केले जाते. त्यामुळे या भागातील उर्वरित वन्य व ग्रामीण परिसंस्था खंडित होऊन त्या लहानलहान गटांत विभागल्या जातात. नागरी आणि ग्रामीण सीमांदरम्यानच्या प्रदेशात तुलनेने विविध प्रकारच्या अनेक परिसंस्था असतात. जलप्रदूषण, हवाप्रदूषण, सजीवांच्या परकीय जातींची घुसखोरी इ. समस्यांचा परिणाम नागरी परिसंस्थांवर होतो. नागरी परिसंस्थेतील प्राण्यांचा आकार इतर परिसंस्थांतील प्राण्यांच्या आकारापेक्षा लहान असतो. नागरी पर्यावरणांचा परिणाम तेथील प्राणी व पक्ष्यांच्या वर्तनावर होत असतो. शहरीकरणानुसार जैवविविधतेत घट होते. वेगवेगळ्या वनस्पती, मुंग्या, झुरळे, पक्ष्यांच्या जाती इत्यादींबाबत हे आढळून आले आहे.
नागरी परिसंस्थेमुळे भोवतालच्या परिसंस्थांवर जास्त विपरित परिणाम होतो. तो परिणाम टाळण्यासाठी शहरांचे नियोजन व बांधणी योग्य असणे आवश्यक आहे. नगरातील उष्ण बेटे कमी करण्यासाठी जैविक संतुलन साधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरी परिसंस्थांतील जैव-भू-रासायनिक चक्रे सामान्य स्तरावर आणली जाणे आवश्यक आहे. यादृष्टीने शहरी भूदृश्ये अधिक नैसर्गिक स्थितीत यावीत म्हणून काही नागरी गट कार्यरत आहेत, ही एक स्वागतार्ह बाब आहे.