त्वचेवर सर्पाकार पट्टा उमटून त्यावर उठलेल्या पुरळाला नागीण म्हणतात. चेतासंस्थेतील पृष्ठ-मूल गंडिकाच्या (डॉर्सल रूट गँग्लिऑन) दाहामुळे या गंडिका त्वचेच्या ज्या भागात चेतापुरवठा करतात, त्या भागात नागीण हा संसर्गजन्य रोग होतो. या रोगामुळे त्वचेचा भाग लाल होतो आणि पुरळ उठते. १९५३ साली थॉमस वेलर या वैज्ञानिकाने ‘व्हॅरिसेला’ विषाणूंमुळे नागीण होते, हे दाखवून दिले. या व्हॅरिसेला विषाणूंमुळे लहान वयात मुलांना कांजिण्या होतात. मात्र, नागीण हा कांजिण्यांप्रमाणे साथीचा रोग नाही. जसे वय वाढत जाते तसे नागीण होण्याची शक्यता वाढत जाऊन सामान्यपणे ६५ वर्षानंतर नागीण होण्याची शक्यता तरुण वयातील शक्यतेच्या तिपटीने वाढते.

नाग‍िणीचे पुरळ

बालवयात कांजिण्या होऊन बरे झाल्यावरही ‘व्हॅरिसेला’ विषाणूंचे शरीरातून पूर्णपणे उच्चाटन झालेले नसते. हे विषाणू चेता-गंडिकेत सुप्तावस्थेत असतात. वाढत्या वयात, शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे विषाणू पुन्हा क्रियाशील होतात. चेतातंतूंमार्फत ते त्वचेपर्यंत पोहोचतात. हे बधिर चेतातंतू त्वचेच्या ज्या भागात असतात, त्या भागात जळजळणारे पुरळ उठू लागतात. सुरुवातीला हे पुरळ लालसर असतात. त्वचेचा हा भाग हळवा, दुखरा व गरम झाल्यासारखा वाटतो. या भागात एखाद्या धारदार सुईने टोचल्यासारखे किंवा उकळते तेल पडल्यासारख्या वेदना होतात. २–३ दिवसांत पुरळ मोठे व पाणीदार होऊन फोड दिसू लागतात. ते फुटल्यास पाण्याप्रमाणे किंवा रक्तमिश्रित द्रव बाहेर येतो. साधारणपणे २–३ आठवड्यांत पुरळांमुळे झालेल्या जखमा भरून येतात. पुरळांवरून किंवा वेदनेच्या लक्षणांवरून नागीण झाल्याचे निदान करता येते. हे पुरळ व्हॅरिसेला विषाणूंच्या तीव्र संसर्गामुळे उठलेले आहेत हे ओळखण्यासाठी ‘झंकस्मियर’ चाचणी करावी लागते.

नागीण झाल्यामुळे त्वचेच्या विशिष्ट भागांतच पुरळ उठतात. डोळ्यांना पुरवठा करणाऱ्या चेता बाधित झालेल्या असतील तर हे पुरळ डोळ्यांमध्ये वाढून दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून चेहऱ्यावर नागीण झाल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला ताबडतोब घ्यावा. नागीणच्या ‘रॅमसे हंट सिंड्रोम’ या प्रकारात आननी चेता (कर्पर चेता क्र. ७) बाधित होते. यावेळी पुरळ कानाजवळ येतात व चेहेऱ्याचा अर्धा भाग दुर्बल झाल्याचे जाणवते.

नागीण या रोगावर प्रभावी इलाज होण्यासाठी त्याची लक्षणे दिसू लागताच ४८ ते ७२ तासांत औषधोपचार करावे लागतात. या कालावधीत व्हॅलसायक्लोव्हिर हे विषाणुरोधी औषध दिल्यास पुरळांबरोबर वेदनादेखील कमी होत जातात. वेदना होत राहिल्यास अ‍ॅस्पिरीन किंवा पॅरॅसिटॅमॉल देतात. यांशिवाय वेदनाशामके व मलमे वापरली जातात.

नागीण २–३ आठवड्यानंतर बरी होऊ लागते. परंतु काही वेळा पुरळ नाहीसे झाल्यावरही त्या भागात तीव्र वेदना होत राहते. याला नागीण पश्च किंवा मज्जाशूल (पोस्ट हर्पेटिक न्यूराल्जिया) म्हणतात. साधारण २०% लोकांमध्ये नागीण झाल्यानंतर हा त्रास उद्भवू शकतो. उरलेल्या ८०% लोकांमध्ये चार आठवड्यानंतर काहीही त्रास होत नाही.

वयाच्या साठीनंतर ‘हरपिझ झॉस्टर लस’ घेतल्याने नागीण होण्याची शक्यता कमी होते. नागीण झालेल्या रुग्णाशी संपर्क आलेल्या व्यक्तीला कांजिण्या झाल्याचे अनेकदा दिसते. याउलट कांजिण्या झालेल्या रुग्णाशी संपर्क आल्यास नागीण सहसा होत नाही.